For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पर्वरी उड्डाणपूल 2026 अखेर वाहतुकीस खुला होणार

12:16 PM Jan 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
पर्वरी उड्डाणपूल 2026 अखेर वाहतुकीस खुला होणार
Advertisement

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची माहिती

Advertisement

पणजी : पर्वरीचा उड्डाणपूल या वर्षीच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर 2026 पर्यंत वाहतुकीस खुला होणार असल्याची माहिती पर्वरीचे आमदार व पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली आहे. पुलासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले असून त्याचे परीक्षण चालू आहे. जर त्यामुळे काही समस्या व अडचणी उद्भवत असतील तर संबंधित खाते प्रमुखांशी बोलून उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, डिसेंबर 2025 मधील पर्यटकांचे प्रमाण चांगले होते. दक्षिण गोव्यावर पर्यटकांचा अधिक भर होता तर उत्तर गोव्यात काहीसे प्रमाण कमी राहिले.

बर्च अग्नितांडव प्रकरण आणि त्यातील बळी तसेच अनेक विमाने (इंडिगो) रद्द होणे ही त्याची प्रमुख कारणे असल्याचा दावा खंवटे यांनी केला आहे. पर्यटकांच्या आकडेवारीचा तपशील मिळवण्याचे काम चालू असून गोव्यात इतरत्र राज्यातील वाहने मोठ्या प्रमाणात आली होती याकडे त्यांनी लक्ष वेधले. टॅक्सी सेवा, कचरा व्यवस्थापन, खड्डेमय रस्ते, भटकी गुरे या समस्या पर्यटकांना जाणवल्या असून त्यावर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधितांची बैठक घेणार असल्याचे खंवटे यांनी नमूद केले.  चिंबलमधील युनिटी मॉल प्रकल्पास सर्व प्रकारचे परवाने मिळाले असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने निकाल लागताच जास्त बोलेन, असा खुलासा खंवटे यांनी केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.