पर्वरी उड्डाणपुलावर अतिवेगाला लगाम; 10 दिवसांत 580 वाहनचालकांना दंड
पणजी : पर्वरी येथील उड्डाणपुलावर अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. स्पीड कॅमेरे बसवल्यानंतर अवघ्या दहा दिवसांत वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या 580 वाहनांची नोंद झाली असून संबंधित वाहनमालकांना एसएमएसद्वारे सूचना पाठवून चलन जारी करण्यात येत आहे.
11 सप्टेंबर रोजी वाहतुकीसाठी खुला झालेल्या या उड्डाणपुलावर आतापर्यंत चार अपघात झाले आहेत. त्यापैकी 13 सप्टेंबर रोजी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आणखी तीन अपघात झाले; मात्र त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
उड्डाणपुलावर ताशी 65 किलोमीटरची वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, अपघातांची मालिका सुरू असतानाही काही वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन होत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. वेगमर्यादेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी स्पीड कॅमेऱ्यांसह पोलिस कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत.
पहिल्या अपघातानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी उड्डाणपुलाची पाहणी केली. त्यानंतर 15 सप्टेंबर रोजी दोन स्पीड कॅमेरे बसवण्यात आले. तसेच अटल सेतूकडून पर्वरीच्या दिशेने उतरणाऱ्या मार्गावर आणखी एक कॅमेरा बसवण्यात आला आहे.
स्पीड कॅमेरे कार्यान्वित झाल्यापासून 25 सप्टेंबरपर्यंत 580 वाहने अतिवेगाने धावताना आढळली. संबंधित वाहनांच्या मालकांना मोबाईलवर एसएमएस पाठवण्यात आले असून त्यांच्याविरोधात चलनाची प्रक्रिया सुरू आहे. उड्डाणपुलावर सुरक्षित वेगाने वाहन चालवावे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.