पोर्तुगीज नागरिकत्व घोषित करावे
विदेशी नागरिकाने मतदान केल्यास ती गुन्हेगारी ठरेल : मुख्य निवडणूक अधिकारी गोयल यांची माहिती माहिती
पणजी : पोर्तुगीज पासपोर्टधारक गोमंतकीयांनी स्वत:चे विदेशी नागरिकत्व अधिकृतपणे घोषित करावे, अन्यथा त्यांची ती कृती भारतीय कायद्यानुसार गुन्हेगारी स्वऊपाची मानण्यात येईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी दिली. रविवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी, एखाद्या व्यक्तीने एकदा पोर्तुगीज किंवा अन्य कोणत्याही देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर अशी व्यक्ती आपोआप तिचे भारतीय नागरिकत्व गमावते. त्यामुळे अशा व्यक्तींची नावे मतदारयादीतून वगळणे आवश्यक असते, असे सांगितले.
सध्यस्थितीत विदेशी नागरिकत्व स्वीकारल्यानंतरही भारतीय नागरिकत्वाचाही लाभ घेणाऱ्या अशा व्यक्तींना ओळखण्यासाठी आयोगाकडे कोणतीही कार्यक्षम प्रणाली उपलब्ध नाही. त्यामुळे अंमलबजावणी आव्हानात्मक बनते, असेही गोयल म्हणाले. अशा प्रकरणांचा शोध घेणे तसेच पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी अधिक मजबूत प्रणालीची गरज असल्याचे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी ओव्हरसीज सिटीझन्स ऑफ इंडिया (ओसीआय) मध्ये पात्र मतदारांची संख्या खूपच कमी असून ताज्या आकडेवारीनुसार सध्या केवळ 88 ओसीआय कार्डधारक गोव्यात मतदान करण्यास पात्र आहेत, असे सांगितले.
मतदारांचे 96.5 टक्के उजळणी अर्ज संकलित
निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या गोव्यातील मतदारांच्या विशेष फेरतपासणी (एसआयआर) अंतर्गत काल रविवारपर्यंत 96.5 टक्के (10.55 लाख) मतदारांचे उजळणी अर्ज संकलित झाले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी दि. 4 डिसेंबर ही शेवटची मुदत असून तत्पूर्वी सर्वांनी अर्ज सादर करावे, असे गोयल यांनी सांगितले.
मॅपिंग न झालेल्यांचीही होणार सुनावणी
2002 च्या मतदार यादीत सुमारे 2.20 लाख मतदार किंवा त्यांच्या पालकांची नावे नाहीत. अशा मॅपिंग न झालेल्या मतदारांसाठी सुनावणी घेण्यात येणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. सुमारे 90 हजार मतदारांचे अर्ज परत आले नसून त्यांची नावे मसुदा यादीत येणार नाहीत. मॅपिंग झालेल्या मतदारांचीही नावे मसुदा यादीत येतील, मात्र त्यांना नोटिस पाठवून त्यांची नावे पूर्वीही होती हे सिद्ध करण्यास सांगण्यात येईल. त्यावर नंतर सुनावणी घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे गोयल यांनी सांगितले.
मतदारयादीत नाव न आल्यास काय करावे?
अर्ज प्राप्त न झालेल्या मतदारांचा ‘एएसडीडी’ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. त्यात मृत, अनुपलब्ध, दुहेरी नावे किंवा पत्ता बदललेले मतदार यांचा समावेश आहे. दि. 9 डिसेंबर रोजी जारी होणाऱ्या मसुदा यादीत त्यांची नावे असणार नाहीत. अशा मतदारांची नावे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहेत. यापैकी एखाद्यास स्वत:चे नाव चुकीच्या पद्धतीने काढण्यात आल्याचे दिसून आल्यास त्यांनी 7 फेब्रुवारीपूर्वी अर्ज क्र. 6 भरून देणे आवश्यक आहे. अशा मतदारांना घोषणापत्रही द्यावे लागणार आहे. सर्व कागदपत्रे योग्य असल्यास त्या व्यक्तींची नावे अंतिम मतदारयादीत समाविष्ट करण्यात येतील, असे गोयल यांनी स्पष्ट केले.