पोर्तुगालकडे नेशन्स लीग चषक
वृत्तसंस्था / म्युनिच
रविवारी येथे झालेल्या नेशन्स लीग चषक फुटबॉल स्पर्धेतील सुरशीच्या अंतिम सामन्यात ख्रिस्टीयानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनचा 5-3 असा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले.
या सामन्यात पोर्तुगालचा गोलरक्षक दियागो कोस्टाने पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनच्या अल्व्हारो मोरोटाचा फटका अडविला तर पोर्तुगालच्या रुबेन निव्हेसने आपल्याच संघाचा पाचवा गोल नोंदवून जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. तत्पूर्वी निर्धारीत वेळेत तसेच त्यानंतर अतिरिक्त कालावधीत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते. पेनल्टी शूटआऊट कालावधीत स्पेनच्या मोरोटाचा फटका गोलरक्षक कोस्टाने अडविल्याने स्पेनला पराभवाला सामोरे जावे लागले.
सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर मध्यंतराला केवळ काही सेकंद बाकी असताना मिकेल ओराझेबेलने स्पेनचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत स्पेनने पोर्तुगालवर 1-0 अशी आघाडी घेतली होती. 61 व्या मिनिटाला ख्रिस्टीयानो रोनाल्डोने पोर्तुगालला बरोबरी साधून दिली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील रोनाल्डोचा 138 वा गोल आहे. स्पेनचा दुसरा गोल झुबीमेंडीने केला. न्युनो मेंडीसने पोर्तुगालला बरोबरी साधून दिली.