क्रोएशियाला 2-1 ने नमवून पोर्तुगालची आगेकूच
वृत्तसंस्था, टोरंटो : वयाच्या 41 व्या वर्षी क्रिस्तियानो रोनाल्डोला पोर्तुगालच्या जर्सीमध्ये आणखी एक सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. हे त्याने मारलेली पेनल्टी, गोन्सालो रामोसने ‘स्टॉपेज टाइम’मध्ये मारलेला हेडर आणि ’व्हीएआर’च्या एका निर्णयामुळे शक्य झाले. गुऊवारी रात्री झालेल्या या सामन्यात रामोसने ‘हेडर’वर निर्णायक गोल केला आणि पोर्तुगालने क्रोएशियाचा 2-1 असा पराभव केला.
सामन्याचा शेवट अतिशय नाट्यामय होता. यात अंतिम शिट्टी वाजण्यापूर्वी क्रोएशियाचा एक गोल ‘ऑफसाइड’ ठरवून रद्द करण्यात आला. या सामन्यात चाळीशीतील दोन दिग्गज खेळाडू आमनेसामने होते. सहाव्यांदा विश्वचषक खेळणारा रोनाल्डो आणि स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचा पाचव्यांदा प्रयत्न करणारा क्रोएशियाचा लुका मॉड्रिच यांचा त्यात समावेश होता.
रोनाल्डोने महत्त्वपूर्ण गोल केलेला असला, तरी रामोसनेच पोर्तुगालला विजय मिळवून दिला आणि 16 संघांच्या फेरीमधील स्थान निश्चित केले. ‘मला अशा प्रकारचे क्षण आणि असे सामने खूप आवडतात. मला प्रत्येक सामना अशाच प्रकारे खेळायचा आहे, असे रामोस नंतर म्हणाला. आता पोर्तुगालचा सामना सोमवारी स्पेनशी होणार आहे.
रामोसने गोल केल्यानंतर परिस्थिती काहीशी विचित्र झाली. पोर्तुगाल आणि त्यांचे चाहते त्याच्या गोलच्या आनंदात मग्न असतानाच अगदी शेवटच्या क्षणी क्रोएशियाने सामना 2-2 असा बरोबरीत आणल्याचे वाटले. मात्र अडीच मिनिटांच्या विलंबानंतर मारिओ पासालिचला ‘ऑफसाइड’ ठरवण्यात आले आणि व्हीएआरद्वारे तो गोल नसल्याचा निर्णय देण्यात आला. या निर्णयाचा निषेध म्हणून क्रोएशियाच्या चाहत्यांनी मैदानावर बाटल्या फेकल्या आणि शिट्ट्या वाजवल्या. 53 व्या मिनिटाला इव्हान पेरिसिचने जोसिप सानिसिचच्या क्रॉसवर गोल करत क्रोएशियाचे खाते उघडले.
मोड्रिचच्या नेतृत्वाखाली क्रोएशियाने 2018 आणि 2022 मध्ये अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले होते. या सामन्यात दोन अनुभवी खेळाडूंचे भवितव्य आणि विश्वचषक जिंकण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न या गोष्टींना विशेष महत्त्व होते. मोड्रिच आता 40 वर्षांचा आहे.
रोनाल्डोकडून विश्वचषकाच्या बाद फेरीतील पहिल्या गोलाची नोद
68 व्या मिनिटाला पेनल्टी किकद्वारे रोनाल्डोने सामना बरोबरीत आणला. यामुळे या मेगास्टारला विश्वचषकातील बाद फेरीतील आपला पहिला गोल नोंदवता आला. त्यानंतर 81 व्या मिनिटाला त्याला मैदानाबाहेर बोलावण्यात आले. प्रत्येक वेळी चेंडूला स्पर्श करताना क्रोएशियाच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर हुर्यो ऐकणाऱ्या रोनाल्डोला ‘स्पॉट किक’ची संधी मिळाली. कारण ‘बॉक्स’मध्ये निकोला व्लासिचने प्रतिस्पर्धी खेळाडूला पकडून ठेवण्याचे फाऊल केले होते. रोनाल्डोने पेनल्टी हाणण्यासाठी धाव घेताना क्षणभर पाऊल रोखले आणि गोलरक्षक उजवीकडे झेपावलेला असताना चेंडू थेट मधून जाळीत मारला.