जागतिक व्यापारात योगदान देणारे केरळातले बंदर
देशातील माल इतर देशांमध्ये पोहचवण्यासाठी बंदरांची भूमिका ही महत्त्वाची राहिली आहे. जागतिक व्यापारात वृद्धी नोंदवण्यामध्ये बंदरे अधिक योगदान देत आहेत. देशात पाहता 13 मोठी बंदरे कार्यरत आहेत. यामध्ये पश्चिम बंगालमधील कोलकाता पोर्ट, ओरीसातील पॅरादीप पोर्ट, आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टण पोर्ट, तामिळनाडूतील कामराजर पोर्ट, चेन्नई पोर्ट व तुटीकोरीन पोर्ट, केरळातील कोचीन पोर्ट, कर्नाटकातील न्यू मंगळूर पोर्ट, गोव्यातील मार्मुगोवा पोर्ट,महाराष्ट्रातील मुंबई पोर्ट, जवाहरलाल नेहरु पोर्ट, गुजरातमधले कांडला पोर्ट व अंदमान निकोबार मधील पोर्ट ब्लेअर पोर्ट यांचा समावेश आहे. यानंतर आता केरळातील विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदर हे अलीकडेच चर्चेत आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या बंदराच्या कार्याला सुरुवात झालेली आहे. विदेशातील व्यापारासाठी हे बंदर महत्त्वाचे योगदान देण्यासाठी सज्ज झालेले आहे.
9 जून 2025 हा दिवस भारतातील समुद्री इतिहासासाठी महत्त्वाचा राहिला आहे. जगातील सर्वात मोठे कंटेनर जहाज एमएससी इरीना पहिल्यांदाच भारतामध्ये पोहोचले होते. केरळमधील नव्याने बनलेल्या विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदरावर ते पोहोचले आहे. पहिल्यांदाच एवढे मोठे जहाज दक्षिण आशियातील बंदरावरती पोहोचल्याचे पहायला मिळाले आहे. विझिंजम बंदरासाठी हा एक ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. या बंदराचे नाव देशांतर्गत पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आता चर्चेमध्ये येऊ लागले आहे.
एमएससी इरीना हे एक अल्ट्रालार्ज कंटेनर जहाज असून 400 मीटर लांबी आणि 61 मीटर रुंदी याची आहे. एका फुटबॉल मैदानाच्या आकाराच्या चार पट आकाराचे हे मोठ्या आकाराचे जहाज आहे. एकवेळ हे जहाज वीस फूट लांबीचे कंटेनर नेऊ शकते. 2023 मार्च मध्ये लॉन्च झालेल्या या जहाजाने आपला पहिला प्रवास एप्रिल 2023 मध्ये सुरू केला होता. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम पासून जवळ असणारे नव्याने उभारण्यात आलेले विझिंजम हे बंदर भारतातले पहिले अत्यंत खोल असणारे बंदर मानले जाते. सदरचा प्रकल्प हा हरीत प्रकल्प असून सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीतून बनवण्यात आला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि अदानी पोर्टस यांनी हे बंदर एकत्रितरित्या विकसित केले आहे. 2015 मध्ये या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली होती. 8900 कोटी रुपयांच्या खर्चातून हे बंदर विकसित करण्यात आले आहे. जे 2 मे 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले आहे. हे बंदर अशाठिकाणी बनलेले आहे जिथे तिथली पाण्याची खोली ही 18 ते 20 मीटर इतकी आहे. या ठिकाणी जगातील कोणतेही मोठे जहाज कोणत्याही अडथळ्याविना सहज थांबू शकते. युरोपकडून आशियाकडे येणारी जहाजे या बंदरावरती आरामात आता थांबू शकतात. या बंदरामुळे भारताचा व्यापार येणाऱ्या काळात कैकपटीने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जुलै 2024 पासून प्राथमिक पातळीवरती बंदराची सुरुवात करण्यात आली असून डिसेंबर 2024 पासून प्रत्यक्षामध्ये बंदर व्यावसायिकतेसाठी वापरण्यास सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत या बंदरावर 349 हून अधिक जहाजांचे आगमन झालेले असून 7.33 लाख कंटेनर आलेले आहेत.
जहाजामार्फत होणाऱ्या वाहतुकीच्या बाबतीत भारताचे योगदान यापूर्वी फार कमी पाहायला मिळत होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षात बंदरांच्या विकासात जातीने लक्ष घातले जात आहे. आत्तापर्यंत भारताची जहाजाची वाहतूक ही कोलंबो, सिंगापूर आणि दुबई यांच्यामार्फत 75 टक्के होत होती. या मार्फत होणाऱ्या वाहतुकीनुसार प्रत्येक कंटेनरमागे सहा हजार ते आठ हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च येत होता. हा खर्च विझिंजम बंदरामुळे वाचला जाणार आहे. या बंदरादरम्यान असणाऱ्या वाहतुकीच्या नियोजनाची जबाबदारी आयआयटी मद्रास यांच्याकडून आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीने सांभाळली जात आहे. समुद्री व्यापाराच्या बाबतीमध्ये भारत आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनातून पुढचे पाऊल टाकत आहे.
जागतिक बाजारामध्ये यायोगे भारताची समुद्र व्यापाराच्याबाबतीतील उपस्थिती अधिक वाढणार आहे. या बंदरापासून तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ 16 किलोमीटर अंतरावर आहे तसेच राष्ट्रीय महामार्ग 66 सुद्धा जो चार पदरी आहे तो सुद्धा या बंदरापासून जवळच आहे. त्यामुळे जहाजामार्फत या बंदरावर पोहचणारा माल दक्षिण, पश्चिम भागातल्या राज्यांमध्ये लवकर पोहचवणे शक्य होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये हे बंदर भारतासह जागतिक पटलावर वेगळी ओळख निर्माण करणार आहे. अमेरिका, युरोप, आफ्रिका व पूर्व आशिया देशातील मालवाहतुक या बंदरापर्यंत येणे शक्य होणार आहे.
-दीपक कश्यप