नूतन मंत्र्यांना आज खातेवाटप
मुख्यमंत्र्यांची माहिती : काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल शक्य
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
नूतन मंत्र्यांचा शपथविधी होऊन आठवडा उलटला आहे. मात्र, त्यांना अद्याप खातेवाटप झालेले नाही. मंगळवारी नूतन मंत्र्यांना खातेवाटप केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले आहे. दरम्यान, काँग्रेस हायकमांड खातेवाटपाची यादी मंगळवारी सकाळी शिवकुमार यांच्याकडे पाठवून देणार आहे. त्यामुळे खातेवाटपाविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.
मागील आठवड्यात 19 नूतन मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य काँग्रेसमध्ये उद्भवलेली नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न झाले. तर दुसरीकडे नूतन मंत्र्यांनी अमुक खातीच हवी असा आग्रह मुख्यमंत्र्यासमोर धरला. या पार्श्वभूमीवर डी. के. शिवकुमार यांनी रविवारी सायंकाळी नवी दिल्लीला धाव घेऊन वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. त्यानंतर सोमवारी सकाळी त्यांनी राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ते सकाळीच बेंगळूरला परतले. वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे मंगळवारी खातेवाटपाची यादी पाठविली जाणार असून ते लागलीच राज्यपालांना पाठविण्यात येणार आहे.
खातेबदलाचीही शक्यता
पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारावेळी 13 मंत्री शपथबद्ध होऊन त्यांना खातेवाटप करण्यात आले होते. मागील आठवड्यात दुसऱ्यांदा मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यामुळे एक-दोन मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तीन मंत्र्यांची समाजकल्याण खात्यावर नजर असून सार्वजनिक बांधकाम खाते सांभाळणारे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आपल्याला समाजकल्याण खाते द्यावे, अशी मागणी केल्याचे समजते. त्यांच्यासोबत मंत्री शिवराज तंगडगी आणि नरेंद्रस्वामी यांनी देखील समाजकल्याण खात्याची जबाबदारी देण्याची मागणी केली आहे.
त्याचप्रमाणे आरोग्य मंत्री यु. टी. खादर आणि नगरविकास मंत्री डॉ. यतिंद्र सिद्धरामय्या यांच्याही खात्यात बदल होण्याची शक्यता आहे. डॉ. यतिंद्र यांना आरोग्य खाते आणि यु. टी. खादर यांना नगरविकास खाते बदलून देण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळात किरकोळ बदल अधिवेशनानंतरच?
मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या आमदारांचे समाधान करण्यासाठी मंत्रिमंडळात किरकोळ बदल करण्याचा विचारही करण्यात आला होता. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन गुरुवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे नवीन मंत्र्यांना खातेवाटप करणे अपरिहार्य आहे. त्यामुळे काँग्रेसश्रेष्ठींनी आधी मंत्र्यांना खातेवाटप करण्याचे निर्देश दिले आहेत. बहुतेक अधिवेशनानंतर मंत्रिमंडळातील एक-दोघांना वगळून नाराज आमदारांना मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे.
सवदींना ‘सहकार’?
बेळगाव जिल्ह्यातून मंत्री बनलेले लक्ष्मण सवदी यांना सहकार आणि साखर खाते मिळण्याची शक्यता आहे. तर मराठा समुदायातून मंत्रिपद संतोष लाड यांना कामगार खाते मिळण्याची शक्यता आहे. या दोन्ही मंत्र्यांनी पूर्वी या खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या अनुभवाचा विचार करून खातेवाटप होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
अधिवेशनापूर्वी खातेवाटप
नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी राज्य मंत्रिमंडळात किरकोळ बदल करण्यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. नवीन मंत्र्यांना उद्या (मंगळवार) खातेवाटप होणार आहे. याबाबत कोणीही चिंता करू नये. अधिवेशनानंतर उर्वरित मंत्रिपदाबाबत निर्णय घेतला जाईल. मंत्रिमंडळातील किरकोळ बदलासंबंदी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
- डी. के. शिवकुमार, मुख्यमंत्री