For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोर्शे कार अपघात प्रकरण : आरोपीच्या आजोबांना अटक, ड्रायव्हरला धमकावल्याचा आरोप

01:20 PM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
पोर्शे कार अपघात प्रकरण   आरोपीच्या आजोबांना अटक  ड्रायव्हरला धमकावल्याचा आरोप
Advertisement

पुणे : आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. ड्रायव्हरवर दबाव टाकून त्याला धमकावल्या प्रकरणी सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सुरेंद्रकुमार अग्रवालांविरोधात येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

अपघात प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखा करणार 

पोर्शे कार अपघात प्रकरणाचा तपास सहा दिवसानंतर आता पुणे गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. 19 मे 2024 रोजी झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. आरोपी अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार चालवून एक बाईकला धडक दिली होती. या अपघातात बाईकवरील अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. निष्पांपाचा जीव गेल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. वाढत्या दबावामुळे आता पुणे गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यात आला आहे. अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे या प्रकरणाचा तपास करणार आहेत.

Advertisement

आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी शुक्रवारी (24 मे 2024) सर्व सहा आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल, कोझी हॉटेलचा मालक प्रल्हाद भुतडा, कोझी हॉटेलचा व्यवस्थापक सचिन काटकर, संदीप सांगळे ब्लॅक बारचा मालक, हॉटेल कर्मचारी नितेश शेवाणी आणि जयेश गावकर अशी आरोपींची नावे आहेत.

दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई

दरम्यान तपासामध्ये दिरंगाई केल्याबाबत तसेच अपघाताची माहिती वेळेमध्ये वरिष्ठ पोलिसांनी न दिल्याचा ठपका ठेवत दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

Advertisement
Tags :

.