For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गाजणारं नाव - कुप्पूस्वामी अण्णामलाई

06:24 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
गाजणारं नाव   कुप्पूस्वामी अण्णामलाई
Advertisement

? कुप्पूस्वामी अण्णामलाई हे नाव गेल्या दोन वर्षांमध्येच प्रकाशात आले आहे. हे भारतीय जनता पक्षाचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष आहेत. ते इंजिनिअर आणि आयपीएस असून कर्नाटकात पोलीस प्रशासकीय सेवेत होते. अडीच वर्षांपूर्वी त्यांनी ‘सोन्याचे घास’ देणाऱ्या नोकरीचा त्याग केला आणि ते भारतीय जनता पक्षात समाविष्ट झाले. तामिळनाडूत हातपाय पसरण्याच्या या पक्षाच्या प्रयत्नांना त्यांच्या परिश्रमामुळे आणि नियोजनबद्ध कार्याने उठाव आल्याचे राजकीय तज्ञ मान्य करतात. भारतीय जनता पक्षाला ‘दुष्प्राप्य’ असणाऱ्या या राज्यात या पक्षाची भक्कम पायाभरणी करायचीच, असा निर्धार त्यांनी केलेला दिसून येतो.

Advertisement

? राहुल गांधी यांच्या पदयात्रेची आणि नंतर बस-कम पदयात्रेची चर्चा खूप झाली आहे. पण या मिडिया चमचमाटात एक पदयात्रा दुर्लक्षित राहिली. ती होती अण्णामलाई यांची. त्यांनी तामिळनाडूमधील सर्व 242 विधानसभा मतदारसंघांतून पदयात्रा काढली असून 10 हजार किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास गेल्या 2 वर्षांमध्ये केला आहे. त्यांच्या पदयात्रेला आणि भाषणांना खेडोपाडी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची वृत्ते अनेकदा थडकली आहेत. अण्णामलाई यांच्याच जीवावर भारतीय जनता पक्ष तामिळनाडूत काही जागा पदरात पाडून घेण्याशी आशा बाळगत आहे. त्यांना या राज्याच्या कोईंबतूर मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे.

? त्यांच्या विरोधात द्रमुकने माजी महापौर गणपति राजकुमार यांना उतरविले आहे. खरे तर ही जागा 2019 मध्ये सीपीएमने जिंकलेली होती. पण अण्णामलाईंचा प्रभाव पाहता या पक्षाला ही जागा जड जाईल, अशा समजुतीने द्रमुकने ती यंदा आपल्याकडे घेतली आहे. तसेच गणपति राजकुमार यांच्या रुपाने तगडा प्रतिस्पर्धीही दिला आहे. अण्णामलाई सध्या आपल्या या मतदारसंघासह राज्यातील अन्य पाच मतदारसंघांमध्ये जीव तोडून प्रयत्न करीत आहेत. त्यांचे बालपण आणि शिक्षण ग्रामीण भागात झाले. ते एका शेतकरी कुटुंबात जन्मले. ज्या पक्षाला तामिळनाडूत काहीही स्थान नाही, असा पक्ष त्यांनी स्वीकारण्याचे धाडस केले.

Advertisement

? या त्यांच्या धाडसासाठी त्यांचे कौतुक होत आहे. तथापि, या कौतुकाचे रुपांतर विजयासाठी पुरेशा मतांमध्ये होणार का, हा कळीचा प्रश्न आहे. ते केवळ 39 वर्षांचे असल्याने पुढचा बराच काळ राजकीय क्षितीजावर चमकत राहतील, हे त्यांचे विरोधकही मान्य करतात. यावेळी त्यांच्या विजयाची शक्यता अगदीच नाही असे म्हणता येणार नाही. अनेक सर्वेक्षणांमध्ये ते आघाडीवर असल्याचे दर्शविण्यात आले आहे. पण नेमके काय होणार याचे खरे उत्तर 4 जूनलाच मिळेल. तोपर्यंत तर्कवितर्क आणि अनुमाने काढली जात राहतील. पण त्यांच्या रुपाने तामिळनाडून नगण्य असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला एक आशास्थान मिळाले हे निश्चित.

Advertisement
Tags :

.