कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पोप फ्रान्सिस यांचे निधन

06:46 AM Apr 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रदीर्घ प्रकृती अस्वास्थ्यानंतर व्हॅटिकन येथे घेतला अखेरचा श्वास, गेली 10 वर्षे होते पदावर

Advertisement

वृत्तसंस्था / व्हॅटिकन सिटी

Advertisement

रोमन कॅथॉलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले आहे. ही घोषणा व्हॅटिकनकडून सोमवारी करण्यात आली आहे. इस्टरच्या सोमवारीच त्यांची प्राणज्योत मालविली. ते 88 वर्षांचे होते. गेली साधारणत: 10 वर्षे ते या सर्वोच्च धर्मगुरुपदावर कार्यरत होते. प्रदीर्घ आजारानंतर त्यांचे निधन झाले. त्यामुळे जगभरातील रोमन कॅथॉलिक समाज दु:खसागरात बुडाला आहे. ते दक्षिण अमेरिकेतील प्रथम आणि गेल्या 1,200 वर्षांमधील पहिलेच बिगर युरोपियन पोप होते, अशी माहितीही त्यांच्याविषयी व्हॅटिकनकडून देण्यात आली आहे.

त्यांच्या निधनाची घोषणा कार्डिनल फॅरेल यांनी सोमवारी केली. ‘पोप फ्रान्सिस हे देवाच्या घरी परत गेले आहेत,’ अशा शब्दांमध्ये त्यांनी ही दु:खद वार्ता प्रसिद्ध केली. त्यानंतर जगभरातून उच्चपदस्थांचे आणि मान्यवरांचे शोकसंदेश येण्यास प्रारंभ झाला. दया, सर्वसमावेशकत्व, मानवता आणि पर्यावरणाच्या संरक्षणाविषयी खोल आस्था ही त्यांच्या पोपपदाच्या कार्यकाळाची वैशिष्ट्यो ठरली आहेत.

दोन वर्षांपासून प्रकृती अस्वास्थ्य

पोप फ्रान्सिस हे गेली साधारणत: दोन वर्षे प्रकृतीअस्वास्थ्याशी संघर्ष करीत होते. त्यांच्या आतड्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांच्या स्वास्थ्यविषयक समस्या वाढत चालल्या होत्या. त्यांच्या श्वसनाची आणि मूत्रपिंडाची तीव्र समस्या होती. याच समस्यांमुळे अखेर त्यांचा मृत्यू झाला. मात्र, आजारी असतानाही त्यांनी ठामपणे चर्चचे नेतृत्व केले. मानवता आणि सुधारणा या दोन तत्त्वांवर त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक भर दिला होता.

चर्चव्यवस्थेत सुधारणा

पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या कार्यकाळात चर्चव्यवस्थेत व्यापक आणि कालसुसंगत सुधारणा घडवून आणल्या होत्या. चर्चव्यवस्थेत आर्थिक पारदर्शित्व यावे, चर्चव्यवस्थेत काम करणाऱ्यांची नितीमत्ता सुधारावी, चर्चव्यवस्थेने पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन यासाठी मोठे कार्य हाती घ्यावे आणि चर्चव्यवस्थेत सर्वसमावेशकत्व यावे, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. तृतियपंथीय व्यक्तींना समाजात सन्मान मिळावा यासाठीही त्यांनी मोलाचे कार्य केले. अशा व्यक्तींशी चर्चव्यवस्थेने संवाद साधून त्यांना सामावून घेतले पाहिजे, अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती. या विषयात त्यांनी कॅथॉलिक चर्चची पारंपरिक कर्मठ भूमिका टाळण्याला प्राधान्य दिले होते. नव्या काळाप्रमाणे चर्चने आपल्या विचारसरणीत सुधारणा घडवून आणणे आवश्यक आहे, असे प्रागतिक विचार रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.

अनेकदा रुग्णालयात

गेल्या वर्षभरात पोप फ्रान्सिस यांना अनेकदा रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. विशेषत: श्वसनाची समस्या ही त्यांच्यासाठी अतिशय त्रासदायक ठरली होती. यावर्षाच्या आरंभीच त्यांना दुहेरी न्यूमोनिया झाला होता. त्यामुळे अनेक दिवस ते रुग्णालयात होते. मात्र, बरे झाल्यानंतर त्यांनी पुन्हा चर्चच्या कामांना वाहून घेतले होते. अखेरीस वैद्यकीय उपचारांना उपयोग न झाल्याने त्यांना मृत्यू आला.

नव्या पोपची नियुक्ती लवकरच

पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे व्हॅटिकनमध्ये सात दिवसांचा शोक पाळण्यात येत आहे. फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारासाठी धार्मिक नियम आणि परंपरेनुसार सज्जता करण्यात येत आहे. तसेच याच शोककाळात नव्या पोपची नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेचाही प्रारंभ होणार असून जगभरातील कार्डिनल्सचा वृंद लवकरच यासंदर्भात व्हॅटिकन येथे बैठक घेणार आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे. व्हॅटिकन येथे पोप यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक येत आहेत.

पोप फ्रान्सिस यांचा अल्पपरिचय

पोप फ्रान्सिस यांचा जन्म अर्जेंटिना या देशात झाला. 2013 मध्ये त्यांची पोपपदी नियुक्ती करण्यात आली. ज्येसुईट पंथाचे ते प्रथम पोप होते. तर दक्षिण अमेरिका आणि एकंदरीतच अमेरिका खंडातील ते प्रथम पोप होते. त्याचप्रमाणे गेल्या 1,200 वर्षांमधील प्रथम बिगर युरोपियन पोप होण्याचा मानही त्यांना मिळाला होता. त्यांचे जन्मानंतरचे नाव जॉर्ज मारिओ बर्गोग्लिओ असे होते.

सुधारणावादी पोप

ड पोप फ्रान्सिस यांच्या कार्यकाळात चर्चव्यवस्थेत झाल्या अनेक सुधारणा

ड मानवता, दया, आपुलकी आणि सर्वसमावेशकत्व या तत्त्वांवरचे जीवन

ड नव्या पोपच्या नियुक्तीच्या प्रक्रियेचा प्रारंभ, लवकरच निर्णय होणे शक्य

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article