दोन कोटीच्या उद्यानाचे निकृष्ट काम
आष्टा :
आष्टा नगरपरिषदेच्या हद्दीतील सांगली इस्लामपूर रोड लगत गौतम हौसिंग सोसायटी मधील सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या रोडलगत जे ज्यानाच्या विकास काम चालू आहे ते काम पूर्ण निकृष्ट दर्जाचे झाले असून त्या कामाच्या भिंतींची आता पडझड होत आहे. याचा अर्थ असा की या कामावर पूर्णपणे येणारा निधी खर्च केला नसल्यामुळे व या कामाला पाणी, सिमेंट योग्य प्रमाणात वापरलेले नसल्याने फक्त बाजूने विटाची भिंत रचल्यामुळे भिंत पडलेली आहे. या ठेकेदारावर कठोर कारवाई करताना पालिका प्रशासनाने त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची संचालक वैभव शिंदे यांनी केली आहे.
आष्टा पालिकेच्या वतीने चांगली इस्लामपूर रस्त्याचे शेजारी सर्वोदय साखर कारखान्याच्या रस्त्यालगत बगीचा तसेच सुशोभीकरण काम सुरू आहे. गुरुवारी या कामाच्या भिंती कोसळल्या. ही माहिती समजताच जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, शहराध्यक्ष शिवाजीराव चोरमुले, धनगर समाजाचे नेते अमित ढोले, शिवसेनेचे दिलीप कुरणे, राजकेदार आदुगडे, कुणाल काळोखे, संदीप माने यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मेट देऊन कामाची पाहणी केली.
यावेळी बोलताना वैभव शिंदे म्हणाले, आष्टा शहरात अनेक विकासाची कामे सुरू आहेत. चौदाव्या वित्त आयोगातून सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी सांडपाणी मोठ्या प्रमाणात साचत होते. या जागेचे सुशोभीकरण करावे अशी येथील नागरिकांची मागणी होती. त्यामुळे हे काम मंजूर झाले. यासाठी जवळपास दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे येऊनही निकृष्ट पद्धतीचे काम सुरू आहे. या ठिकाणी बांधलेल्या भिंतीचा कोपरा आज सायंकाळी ढासळला.
ठेकेदाराने तत्काळ डागडुजी करण्याचा प्रयत्न केला. आणखी असणारी भिंत दोन-चार दिवसात पडण्याची शक्यता आहे. पावसाळा सुरू झाला तर सर्वच काम ढासळण्याची शक्यता आहे. झालेल्या घटनेधा मी निषेध व्यक्त करतो. पालिका प्रशासनाने सदर ठेकेदाराला काळ्या यादी टाकावे. या ठेकेदारांनी ज्या ज्या ठिकाणी कामे केली ती निकृष्ट असण्याची दाट शक्यता आहे.
शिवाजीराव चोरमुले म्हणाले, आष्टा पालिकेच्या माध्यमातून काही भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली येथील सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. ठेकेदार माळी यांच्या माध्यमातून काम सुरू आहे. ठेकेदाराने हे काम पूर्णपणे निकृष्ट केले आहे. भाजपाचे पदाधिकारी शहराचा विकास सुरू आहे, असे म्हणत आहेत. मात्र शहराचा विकास सुरू नसून यांच्या बगलबच्च्यांचा विकास सुरू आहे. आष्टा शहर अधोगतीच्या वाटचालीकडे जात आहे. भाजपा पदाधिकारी आणि ठेकेदार माळी यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. पालिका प्रशासनाने या ठेकेदाराला काळ्या यादी टाकावे, यापुढील काळात त्याला कोणते काम दिले तर तीव्र संघर्ष करणार आहोत, असा इशाराही शेवटी त्यांनी दिला.
दिलीप कुरणे म्हणाले, दोन कोटी रुपये खर्च करून शासनाने सुशोभीकरणाचे काम सुरू केले आहे. मात्र ठेकेदार सुहास माळी यांनी है काम अतिशय निकृष्ट केले आहे. कोणतीही आपत्ती नसताना भिंती ढासळल्या आहेत. या ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता होती. सर्वच काम निकृष्ट झाले आहे. ठेकेदाराने डागडुजी सुरू केली आहे. पालिका प्रशासनाने त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार आहोत