For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंबोली मुख्य धबधब्यावरील सुरक्षा व्यवस्थेची दुरवस्था

12:18 PM Jun 21, 2026 IST | अनुजा कुडतरकर
आंबोली मुख्य धबधब्यावरील सुरक्षा व्यवस्थेची दुरवस्था
Advertisement

पर्यटन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली मुख्य धबधबा हा राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक असून दरवर्षी हजारो देशी-विदेशी पर्यटक येथे भेट देतात. विशेषतः पावसाळ्यात धबधब्याचे नयनरम्य सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, या पर्यटनस्थळी उभारण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेची दुरवस्था पाहता पर्यटकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.पर्यटन विभागाने धबधब्याच्या परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उभारलेले बांबूचे सुरक्षा कवच अनेक ठिकाणी मोडकळीस आले असून काही ठिकाणी ते तुटलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. त्यामुळे ही सुरक्षा व्यवस्था केवळ नावालाच उरल्याची भावना पर्यटकांमधून व्यक्त होत आहे. अनेकांनी या परिस्थितीची तुलना “वेशीवर टांगलेल्या लक्तरांशी” करत पर्यटन विभागाच्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त केली आहे.याशिवाय धबधब्याच्या परिसरात स्वच्छतेचाही अभाव जाणवत आहे. प्लास्टिक कचरा, खाद्यपदार्थांचे अवशेष आणि इतर टाकाऊ वस्तूंमुळे परिसराचे सौंदर्य मलिन होत आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत स्वच्छता आणि देखभालीसाठी आवश्यक उपाययोजना होत नसल्याची टीका स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून केली जात आहे.आंबोली हे सिंधुदुर्गच्या पर्यटनाचे प्रमुख आकर्षण मानले जाते. त्यामुळे येथील सुरक्षा कवच, संरक्षक रेलिंग, सूचना फलक आणि स्वच्छता व्यवस्था तातडीने दुरुस्त करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच सिंधुदुर्ग पर्यटन विभाग आणि सिंधुदुर्ग वनविभाग यांनी संयुक्तपणे परिस्थितीची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.पर्यटकांची सुरक्षा आणि आंबोलीच्या पर्यटन प्रतिमेचे जतन ही प्रशासनाची जबाबदारी असून, या प्रसिद्ध पर्यटनस्थळाची होत असलेली दुरवस्था तात्काळ थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.