निकृष्ट खते, कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त
केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची चिंता : जमिनीचे आरोग्य मानवी आरोग्याइतकेच महत्त्वाचे
बेंगळूर : निकृष्ट दर्जाची खते आणि कीटकनाशके शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करत आहेत, असे केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सांगितले. यलहंका येथील राष्ट्रीय कृषी कीटक संसाधन ब्युरो (आयसीएआर) चा 33 वा स्थापना दिन समारंभ आणि तिसऱ्या कृषी कीटक जैविक नियंत्रण प्रदर्शनाचे उद्घाटन करून ते बोलत होते. कुमारस्वामी पुढे म्हणाले, जमीन मानवतेसाठी खूप महत्त्वाची आहे, हे आपण विसरू नये. जमिनीचे आरोग्य मानवी आरोग्याइतकेच महत्त्वाचे आहे. तथापि, निकृष्ट दर्जाची खते आणि कीटकनाशके मानवासह आणि जमिनीचे आरोग्य नष्ट करत आहेत, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. किडीच्या प्रादुर्भावाने राज्यातील नारळ उत्पादक अडचणीत आहेत. माझ्या स्वत:च्या बागेला या समस्येचा फटका बसला आहे. नारळाच्या झाडांची पिसे सुकत आहेत. मी स्वत: संकटात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीवर खूप भर दिला आहे.
अकरा वर्षांच्या कारकिर्दीत कृषी क्षेत्राला खूप प्रोत्साहन मिळाले आहे. देश शेतीमध्ये मोठी कामगिरी करत आहे. पंतप्रधान शेतकऱ्यांबद्दल खूप चिंतेत आहेत आणि त्यांना आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना डाळींचे उत्पादन घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. केवळ तांदळापासून पोषण मिळू शकत नाही. त्यामुळे द्विदल धान्यातून पोषक तत्वे मिळू शकतात. या पार्श्वभूमीवर मोदी द्विदल धान्याच्या उत्पादनाला अधिक प्रोत्साहन देत आहेत. यासाठी त्यांनी 35,000 कोटी ऊपयांची योजना जाहीर केली आहे, असेही मंत्री कुमारस्वामी म्हणाले. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे, बेंगळूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सी. एन. मंजुनाथ, आयसीएआर संचालक डॉ. सुशील यांच्यासह अनेक कृषी शास्त्रज्ञ आणि विविध जिल्ह्यांतील शेतकरी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दरम्यान, प्रगतीशील आणि निसर्गप्रेरित शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचा केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. याशिवाय उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शास्त्रज्ञांच्या शोधांचे अनावरण करण्यात आले.