उप्पार गल्ली खासबाग येथे निकृष्टदर्जाचे चेंबर बांधकाम
विटा-खडीचा भुसा घालून अल्पप्रमाणात सिमेंट वापरून बांधकाम
प्रतिनिधी/ बेळगाव
उप्पार गल्ली, खासबाग येथील एका बोळामध्ये मागील तीन महिन्यांपासून ड्रेनेज पाईपलाईन चेंबरला जोडण्याचे काम सुरू आहे. परंतु निकृष्टदर्जाच्या साहित्याचा यामध्ये वापर करण्यात येत आहे. बांधकामासाठी विटा आणि खडीचा भुसा घालून अल्पप्रमाणात सिमेंट वापरून बांधकाम करण्यात येत आहे. यामुळे हे बांधकाम किती दिवस टिकेल? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
सरकारी कामे योग्यप्रकारे केली जात नसल्याने बांधकामे जास्त दिवस टिकत नाहीत. हे अनेकवेळा दिसून आले आहे. असाच प्रकार सध्या उप्पार गल्ली, खासबाग येथे सुरू आहे. केवळ दिखाऊपणा करण्यासाठी नाममात्र सिमेंटचा वापर करून बांधकाम केले जात आहे. अतिशय निकृष्टदर्जाचे बांधकाम केले जात असल्याने चेंबर किती दिवस टिकतील, याची शाश्वती नाही.
चेंबरचे बांधकाम सुरू असतानाच पिण्याच्या पाण्याची पाईप फुटल्याने सर्व पाणी चेंबरमध्ये शिरत आहे. यामुळे चेंबर पाण्याने भरला असून केव्हा फुटेल हे सांगता येणार नाही. यामुळे येथील नागरिकांना दुर्गंधीचाही सामना करावा लागत असल्याने महापालिकेने या समस्येकडे लक्ष पुरविण्याची मागणी केली जात आहे.