तिसऱ्या रेल्वे उड्डाणपुलावरील दुरावस्था : म. ए. युवा समितीचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
बेळगाव : बेळगाव येथील तिसऱ्या फाटकावरील बांधलेल्या उड्डाण पुलाची वाताहत झाली असून आणि दुसऱ्या बाजूच्या पुलाच्या अपूर्ण कामासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांना युवा समितीच्या वतीने पत्रव्यवहार केला आहे. बेळगाव शहराला दक्षिण भागाशी जोडणाऱ्या तिसऱ्या रेल्वे फाटकावर वाहनांची कोंडी कमी करण्यासाठी व सुरळीत वाहतूकीसाठी उड्डाणपूल बांधण्यात आला. एका बाजूचा उड्डाणपूल ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्ण झाला आणि तो जनतेसाठी खुला करण्यात आला. तथापि, उद्घाटनानंतर काही दिवसातच रस्त्याची दूरर्दशा झाली त्यानंतर दक्षिण पश्चिम रेल्वेने कंत्राटदाराला दंड देखील ठोठावला होता. सध्या, या रस्त्यावर असंख्य खड्डे पडल्यामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून या रस्त्यावर प्रवास करीत आहे. शिवाय, अनेक वर्षे उलटून गेली तरी, पुलाच्या दुसऱ्या बाजूचे काम अपूर्ण आहे, ज्यामुळे वाहनचालकांना सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून त्यामूळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्ती साठी समाज माध्यमावर तसेच माजी नगरसेवकांनी आवाज उठविला तरीदेखील स्थानिक प्रशासनाने या कडे दुर्लक्ष केल्याने थेट रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहून उड्डाणपूलाची तात्काळ दुरुस्ती आणि दुसऱ्या बाजूचे अपूर्ण बाजूचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात संबंधित विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत अशी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पत्रात केली आहे.