टाकाळा ते दौलतनगर रस्त्याची दुरावस्था
कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
टाकाळा ते दौलतनगर या मार्गावरील रस्त्यात भलेमोठे खड्डे असल्याने रस्त्याची दैयनीय अवस्था झाली आहे. या रोडवरून उषाराजे हायस्कूल आणि महाराणी शांतादेवी गायकवाड गृहशास्त्र शिक्षणसंस्थेतील महिला आणि वालावकर शाळेतील विद्यार्थ्यांची रहदारी असते.तसेच सायबर चौक, शिवाजी विद्यापीठ, राजारामपुरी, आर. के. नगरला जाणाऱ्या वाहनांची या रस्त्याने रहदारी असते. मध्यवर्ती बसस्थानकाकडून येणारी वाहने गर्दी टाळण्यासाठी या मार्गाने ये-जा करीत असतात. मात्र या रस्त्यावरील खड्डे चुकवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडल्याने संपूर्ण शहरासह टाकाळा ते दौलतनगरपर्यंतचा रस्ता उखडला आहे. काही दिवसापूर्वीच डांबरीकरण केलेल्या या रस्त्यातील खडी निघून खड्डे पडले असून खडी विखुरली आहे. टाकाळा येथे इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. तर 14 व्या गल्लीत वालावलकर ही शाळा आणि महिलांचे वसतीगृह आहे. यामुळे शाळकरी विद्यार्थ्यासह अन्य नागरिकांना या खड्ड्यांचा त्रास होत आहे. यामुळे वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. या मार्गावरुन जाणाऱ्यांची हाडे खड्ड्यामुळे खिळखिळी होत आहेत. वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांना या रस्त्याचा त्रास होत आहे.
काही दिवसापूर्वी महापालिकेने टाकाळा येथील 8 व्या गल्लीचा रस्ता केला होता. पण रस्त्याचे हे काम किती निकृष्ट होते, हे दिसून आले आहे. मान्सूनपूर्व पावसातच शहरातील रस्त्यांची अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे जुलै महिन्यात शहरातील रस्ते शोधण्याची वेळ येणार आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहेत. महापालिका प्रशासनाकडून तात्पुरती मलमपट्टी केली असून पहिल्याच पावसात रस्त्याची चाळण झाली आहे. प्रत्येकवेळी डागडुजी केली जाते परंतु तीन चार महिन्यात पुन्हा खड्डे जैसे थे असतात. या रस्त्यातील खड्ड्यामुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोणावर, असा प्रश्न आहे.
वालावलकर प्रशालेसमोरील गतीरोधकाजवळ मोठा खड्डा आहे. या खड्ड्यात वाहने जावून लहान-मोठे अपघात होत आहेत. गॅस पाईपलाईनसाठी खोदाई केलेल्या रस्त्याच्या बाजूपट्ट्यांवर मुरूम टाकला होता. पावसामुळे हा मुरूम वाहून गेला असून खड्डे पडले आहेत. टाकाळा सिग्नलनजीकचा खड्डा एक महिन्यापुर्वी मुजवून मोठी खडी अन् डांबर टाकले होते. परंतु गेल्या आठवड्यात झालेल्या पहिल्या पावसातच पुन्हा खड्ड्याची अवस्था जैसे थे झाली आहे. या खड्यानजीक हॉटेल, टपऱ्या पंक्चर काढण्याचे दुकान आहे. येथील ड्रेनेजसुध्दा वारंवार फुटल्dयानंतर आणि पावसाचे पाणी साचल्यानंतर नजीकच्या दुकानात पाणी जाते.
- खड्ड्यामुळे अनेक अपघात
या रस्त्यावरील खड्डे गेल्याच महिन्यात मुजवले होते. महापालिकेकडून टाकण्यात आलेली मोठी खडी पुन्हा बाहेर आली असून ड्रेनेजही वारंवार फुटत आहे. पावसाने पाणी साचल्यानंतर पंक्चर काढणे मुश्किल होते. व्यवसाय झाला नाही तर घर कसे चालवायचे असा प्रश्न उपस्थित होतो.
- अब्दुल शेख