अन्नपूर्णेश्वरीनगर-वडगाव येथील रस्त्यांची दुरवस्था
बेळगाव : अन्नपूर्णेश्वरीनगर, वडगाव येथील क्रॉस क्र. 1 मधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पेव्हर्स उखडल्यामुळे मागील काही दिवसांपासून पावसामुळे संपूर्ण परिसर चिखलाने भरला आहे. यामुळे ये-जा करणेही अवघड झाले असून यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. अन्नपूर्णेश्वरीनगर परिसरात नव्याने रहिवासी वसाहत निर्माण होत आहे. मागील दहा ते पंधरा वर्षांपासून या ठिकाणी घरे बांधली जात असतानाही अद्याप पायाभूत सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी पेव्हर्स बसविण्यात आले. परंतु, त्यानंतर ड्रेनेजवाहिनी, गॅसवाहिनी यासह इतर कामांसाठी वेळोवेळी खोदाई करण्यात आल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सर्वत्र चिखल पसरला असल्याने चालत जाणेही अवघड झाले आहे. परिसरातील अन्नपूर्णेश्वरीनगर, केशवनगर, आनंदनगर या परिसरातील काही भागात रस्त्यांची वाताहत झाली आहे. पेव्हर्सचे रस्ते अवजड वाहनांमुळे खचले जात आहेत. त्यामुळे पावसाळ्यानंतर या ठिकाणी चांगल्या दर्जाचे रस्ते तयार करण्याची मागणी रहिवाशांमधून केली जात आहे.