श्रीधरच्या मृतदेहाजवळ सापडली पूजाची दुचाकी
श्रीधरची आत्महत्या की घातपात : जॉब स्कॅम प्रकरणी वाढली गुंतागुंत
फोंडा : बेरोजगारांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ‘जॉब स्कॅम’ प्रकरणात लाखो ऊपयांना गंडा घालणाऱ्या पूजा नाईक हिच्याशी पैशाच्या देवाणघेवाणप्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेला सरकारी कर्मचारी श्रीधर कांता सतरकर (51, नाळ्ळे केरी, फोंडा) याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत कुंकळ्ये-म्हार्दोळ येथे आढळल्याने जॉब स्कॅम प्रकरणातील तो पहिला बळी ठरला आहे. मृतदेह ज्या ठिकाणी आढळला तेथे पूजा नाईकची दुचाकी आढळल्याने गूढ आणखी वाढले आहे. दिवसेंदिवस गुंतागुंत वाढत चाललेल्या या प्रकरणात आणखी किती सरकारी अधिकारी, राजकारणी गुंतलेले आहेत याची म्हार्दोळ पोलिसांनी कसून चौकशी सुरू केल्यामुळे संशयितांचे धाबे दणाणले आहेत.
मृतदेहाजवळ पूजाची दुचाकी
कुंकळ्यो येथे ज्या ठिकाणी सतरकर याचा मृतदेह सापडला त्या रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली एक दुचाकी आढळली. आश्चर्याची बाब म्हणजे सदर दुचाकी पूजा नाईक हिच्या नावावर नोंदणीकृत आहे. सतरकर याने पैशाचा तगादा पूजाकडे लावल्यामुळे पूजाने आपली दुचाकी त्याला दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
आत्महत्या की घातपात?
जॉब स्कॅम प्रकरणात पूजाने श्रीधर सतरकर याचे नाव घेतल्याने म्हार्दोळ पोलिसांनी त्याला दोन वेळा चौकशीसाठी बोलाविले होते. चौकशीलाही तो बऱ्यापैकी सहकार्य करीत होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अचानक या घटनेमुळे म्हार्दोळ पोलिसही बुचकळ्यात पडले आहेत. चौकशीच्या ससेमिऱ्याला कंटाळून की अन्य कुणी आपले नाव घेऊ नये, यासाठी त्याचा घातपात केला असावा काय, या दिशेनेही म्हार्देळ पोलिस तपास करीत आहे. पूजा नाईकशी पैशांची देवाणघेवाण करीत असलेल्या सर्वांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांना काहींचे संभाषण पूजा नाईक हिच्या मोबाईल फोनवर सापडले आहे. सरकारी नोकऱ्यांची विक्री होत असल्याचा आरोप सातत्याने गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केला होता. त्यात तथ्य असल्याचे या कृत्यामधून अधोरेखित होत आहे. या मालिकेची नाळ दूरपर्यंत पोचलेली आहे. जॉब स्कॅम प्रकरणात मास्टरमाईंड पूजा नसून अन्य एका मोठ्या वजनदार महिलेचा समावेश असल्याचा संशय असून सदर प्रकरण निवृत्त न्यायाधीशांची टिम नेमून एसआयटी स्थापन करून करावी अशी मागणी गोवा फॉरवर्डचे प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी केली आहे.