For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पूजा सिंगकडून 14 वर्षांचा राष्ट्रीय विक्रम मोडीत

06:24 AM May 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
पूजा सिंगकडून 14 वर्षांचा राष्ट्रीय विक्रम मोडीत
Advertisement

यू-20 आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेतील उंच उडीत ऐतिहासिक सुवर्ण

Advertisement

वृत्तसंस्था 

नवी दिल्ली : हाँगकॉंग येथे सुरू असलेल्या ’आशियाई 20 वर्षांखालील अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये किशोरवयीन उंच उडीपटू पूजा सिंगने शुक्रवारी एक सनसनाटी कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 1.93 मीटरची नेत्रदीपक उडी मारत तिने सुवर्णपदक पटकावले आणि या प्रक्रियेत अनेक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केले. 19 वर्षीय पूज, या स्पर्धेतील महिलांच्या उंच उडी प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.

Advertisement

विक्रम मोडणाऱ्या आपल्या या कामगिरीसह तिने एका अविस्मरणीय दिवसाची शानदार सांगता केली. पूजाने 1.93 मीटरची उंची यशस्वीरीत्या पार करत केवळ सुवर्णपदकावरच नाव कोरले नाही, तर सहाना कुमारी हिने 14 वर्षांपूर्वी प्रस्थापित केलेला 1.92 मीटरचा वरिष्ठ राष्ट्रीय विक्रमही मोडीत काढला. असे करून या युवा खेळाडूने स्वत:ची ओळख भारताच्या ‘ट्रॅक अँड फील्ड’ क्षेत्रातील सर्वांत तेजस्वी आणि उदयोन्मुख प्रतिभावंतांपैकी एक म्हणून प्रस्थापित केली आहे.

पूजासाठी ही स्पर्धा एखाद्या स्वप्नवत अनुभवासारखी ठरली. सर्वप्रथम तिने 1.91 मीटरची उंची पार करत ’राष्ट्रीय 20 वर्षांखालील विक्रम’ सुधारला आणि सुवर्णपदक निश्चित केले. त्यानंतर आणखी वरची झेप घेत तिने वरिष्ठ राष्ट्रीय विक्रमही आपल्या नावे केला. 1.93 मीटरच्या या कामगिरीमुळे तिला 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आलेला 1.92 मीटरचा पात्रता निकषही पार करणे शक्य झाले. तथापि, भारतीय अॅथलेटिक्स महासंघ तिला या स्पर्धेसाठी विशेष सवलत देईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण राष्ट्रकुल स्पर्धेसाठीची अंतिम पात्रता फेरी असलेली फेडरेशन कप स्पर्धा यापूर्वीच पार पडली आहे.

पूजाची ही ऐतिहासिक कामगिरी भारतीय अॅथलेटिक्स क्षेत्रासाठी, विशेषत: उंच उडी प्रकारासाठी, एक मोठा दिलासा आणि प्रेरणा ठरली आहे. या प्रकारात जागतिक किंवा खंडीय स्तरावर एखाद्या दमदार कामगिरीची भारत गेल्या अनेक वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होता. या किशोरवयीन खेळाडूने संपूर्ण स्पर्धेदरम्यान कमालीचा संयम राखला आणि सर्वांत महत्त्वाच्या क्षणी आपली सर्वोत्तम कामगिरी सादर केली. ही कामगिरी तिच्या एका आशादायक आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुऊवात ठरू शकते.

Advertisement
Tags :

.