सावंतवाडीच्या पूजा सावंत ठरल्या मिस आंदुर्लेच्या मानकरी
कुडाळ -
श्री देवी आंदुर्लाई ग्रामोत्कर्ष मंडळ (आंदुर्ले ) च्यावतीने आयोजित आंदुर्ले महोत्सवात साई जळवी फिल्म्स प्रस्तुत मिस आंदुर्ले या सुंदर व्यक्तिमत्त्व स्पर्धेच्या मानकरी सावंतवाडीची पूजा सावंत ठरल्या.या महोत्सवात साई दळवी फिल्म प्रस्तुत मिस आंदुर्ले ही सुंदर व्यक्तिमत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रसिकांच्या प्रचंड गर्दीत आणि उत्स्फूर्त प्रतिसादात सदर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला स्पर्धकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला.यात सिंधुदुर्गातील कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, देवगड,वेंगुर्ले अशा तालुक्यातून एकूण 16 निवडक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीत पारंपरिक वेशभूषा आणि परिचय, दुसऱ्या फेरीत स्पर्धकांमधील टॅलेंट आणि ट्विस्ट,तर तिसऱ्या फेरीत वेस्टर्न राऊंड आणि परीक्षक प्रश्नोत्तरे अशा एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या. त्या फेऱ्यांमधून बेस्ट कॅटवॉक, अचूक प्रश्नोत्तरे आणि सर्वोत्तम टॅलेंट याच्या जोरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक निवडण्यात आले. स्पर्धेतील तीनही फेऱ्या रसिकांची उत्कंठा वाढविणाऱ्या ठरल्या. अखेर या स्पर्धेमध्ये सावंतवाडीच्या पूजा सावंत यांनी बाजी मारली आणि त्या या वर्षीच्या मिस आंदुर्ले ठरल्या. द्वितीय क्रमांक भार्गवी पांगम आणि तृतीय क्रमांक नंदिनी बिले यांनी पटकावला. त्याचबरोबर बेस्ट स्माईल दुर्वा सावंत, बेस्ट पर्सनालिटी प्रदिप्ती कोटकर, बेस्ट रॅम्पवॉक स्नेहा जांभुरे आणि पूजा म्हाडदळकर यांची निवड करण्यात आली.या स्पर्धेतील प्रथम क्रमांक रोख 10 हजार रू .सन्मान चिन्ह, क्राऊन, द्वितीय क्रमांकासाठी रोख 6 हजार रु. व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकासाठी 3 हजार रु .व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच अन्य यशस्वी व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या मिस आंदूर्ले स्पर्धेचे परीक्षण दिग्दर्शक, फिल्म लाईन प्रोड्युसर तथा कोकण कला केंद्र अध्यक्ष साईनाथ जळवी तसेच आई कुठे काय करते, अबीर गुलाल मालिका फेम अभिनेत्री स्वाती कर्णेकर व नृत्य दिग्दर्शिका शरावती शेट्टी यांनी केले. सूत्रसंचालन अभिनेता अमर प्रभू व अभिनेत्री रुचिता शिर्के यांनी केले.बक्षीस वितरणप्रसंगी व्यासपीठावर आंदूर्ले महोत्सवाचे संकल्पनाकार आणि कुडाळ तालुका भाजपा अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, दिग्दर्शक साईनाथ जळवी, अभिनेत्री स्वाती कर्नेकर, नृत्य दिग्दर्शिका शरावती शेट्टी,आंदूर्ले सरपंच अक्षय तेंडोलकर, भाजप महिला मोर्चा कुडाळ तालुकाध्यक्षा आरती पाटील, अभिनेता तेजस पिंगुळकर, मयूर राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.