पूजा राणीचे पदक निश्चित
वृत्तसंस्था/लिव्हरपूल (ब्रिटन)
येथे सुरू असलेल्या विश्व मुष्टीयुद्ध पुरूष आणि महिलांच्या चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची 34 वर्षीय महिला बॉक्सर पूजा राणीने 80 किलो वजन गटात उपांत्य फेरीत प्रवेश मिळवत आपले पदक निश्चित केले आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पूजा राणीने पोलंडच्या इमिलीया कोटेर्सस्काचा 3-2 अशा गुण फरकाने निसटता पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. पूजा राणीचे विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेतील पदार्पणातून तिने आता पदार्पणातच पदक निश्चित केले आहे. महिलांच्या 80 किलो वजन गट हा ऑलिम्पिक स्पर्धेत खेळविला जात नाही. मात्र विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळविण्यात आलेल्या या गटात एकूण 12 स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शविला होता. पूजा राणीच्या या विजयामुळे भारताची तीन पदके निश्चित झाली आहेत. तिचा उपांत्य फेरीचा सामना ब्रिटनच्या इमेली अॅसक्वेतशी होणार आहे.
आशियाई विजेती महिलांच्या 57 किलो वजन गटातील जस्मिन लंबोरीया तसेच महिलांच्या 80 किलो वरील गटात नुपूर शेरॉनने यापूर्वीच उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. या स्पर्धेत पुरूषांच्या विभागात मात्र भारताची निराशा झाली आहे. पुरूषांच्या 65 किलो वजन गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जॉर्जियाचा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता लेशा गुरूलीने भारताच्या अभिनाश जमवालचा 4-1 अशा गुणफरकाने पराभव करत उपांत्य फेरी गाठली. या पराभवामुळे जमवालचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. आता 50 किलो वजन गटात भारताचा जादुमणी सिंग याचे आव्हान अद्याप जिवंत आहे. त्याचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना कझाकस्तानच्या ताशकेनबेशी होणार आहे.
ताश्कंदमध्ये यापूर्वी झालेल्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या दीपक भोरीयाने 51 किलो गटात, मोहम्मद हुसामुद्दीनने 57 किलो गटात तर निशान देवने 71 किलो वजन गटात कांस्यपदके मिळविली होती. तर भारताने यजमानपद स्वीकारलेल्या गेल्या स्पर्धेमध्ये महिलांच्या विभागात भारताने 4 सुवर्णपदकांची कमाई केली होती. नितू घंघासने 48 किलो गटात, लवलिना बोर्गोहेनने 75 किलो गटात तर स्वीटी बोराने 81 किलो गटात सुवर्णपदके मिळविली होती.