‘लुटेरी दुल्हन’मध्ये पूजा गौर
अभिनेत्री पूजा गौर आता नवी वेबसीरिज ‘लुटेरी दुल्हन’मध्ये दिसून आली आहे. या सीरिजमध्ये तिने पोलीस उपनिरीक्षक संध्या यादव ही भूमिका साकारली असून ती एक निडर अन् साहसी अधिकारी आहे. याच्या कहाणीत मध्यप्रदेशात होत असलेल्या काही विचित्र गुन्ह्यांचा तपास दाखविण्यात आला आहे.
विवाहानंतर स्वत:च्या पतीला लुटुन रात्रीच्या रात्री गायब होणाऱ्या वधूंची कहाणी या सीरिजमध्ये आहे. या रहस्यमय प्रकरणांचा पर्दाफाश संध्या यादव करत असल्याचे यात दाखविण्यात आले आहे. ही भूमिका मला अत्यंत पसंत पडली कारण यात अनेक भावना जोडल्या गेलेल्या आहेत. संध्या बाहेरून जितकी कठोर आणि निर्भय दिसते, आतून ती समाजाचे टोमणे, लोकांच्या अपेक्षा आणि स्वत:ला सिद्ध करण्याच्या दबावाला सामोरी जात आहे. ती केवळ एक प्रकरण सोडवत नसून पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या जगात महिलांना कमी लेखण्याच्या मानसिकतेच्या विरोधात स्वत:च्या ओळखीची लढाईही लढत असल्याचे पूजाने म्हटले आहे.
लुटेरी दुल्हन ही सीरिज हंगामा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. यात पूजा गौर, संविका, मनमोहन तिवारी आणि राजीव पांडे हे कलाकार दिसून येणार आहेत. पूजा गौरला यापूर्वी ‘मन की प्रतिज्ञा’ या मालिकेमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली होती. तसेच ती यापूर्वी साकिब सलीम याच्यासोबत ‘कप्तान’ या सीरिजमध्ये दिसून आली होती.