फोंड्यातील मतदारांचा कौल भाजप-मगो युतीलाच
दामू नाईक व दीपक ढवळीकरांचा विश्वास : रितेश नाईक यांच्या विजयाची पूर्ण खात्री, अपप्रचारावर विश्वास नको
फोंडा : भाजप-मगो युतीचे उमेदवार रितेश नाईक यांनी आजवरच्या प्रचारकार्यात सर्व 45 बुथवर जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या असून मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांच्या कोपरा बैठका तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेला लाभलेला उदंड प्रतिसाद हे पाहिल्यास विजय निश्चित आहे, असा विश्वास भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केला आहे. मगो-भाजप युतीतर्फे काल मंगळवारी प्रचार संपण्यापूर्वी घेतलेल्या प्रचार परिषदेत दामू नाईक बोलत होते. यावेळी मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, फोंड्याचे नगराध्यक्ष विरेंद्र ढवळीकर, कुर्टीचे सरपंच नावेद तहसीलदार, फोंडा भाजपा मंडळाचे अध्यक्ष हरेश नाईक, नगरसेवक व भाजपाचे पदाधिकारी विश्वनाथ दळवी, नगरसेवक रॉय नाईक व कुर्टीच्या उपसरपंच साजिदा सय्यद उपस्थित होते.
केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आजवर झालेला चौफेर विकास तसेच माजी आमदार रवी नाईक यांनी फोंड्यासाठी आजवर केलेले कार्य यामुळे मतदारांचा कौल निश्चितच भाजपाच्या बाजूने असेल. प्रचार काळात फोंड्यातील मतदारांना दिलेल्या सर्व आश्वासनाची पूर्तता पुढील आठ महिन्यांत होणार असल्याचे दामू नाईक यांनी सांगितले. भाजप, मगोचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळावर ही जागा आम्ही निश्चित जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
दीपक ढवळीकर म्हणाले, युतीचा उमेदवार म्हणून मगो पक्षाने रितेश नाईक यांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. मुळात रवी नाईक यांच्या निधनानंतर रितेश नाईक यांनाच उमेदवारी देण्याची जाहीर मागणी पहिल्यांदा मगो पक्षातर्फे करण्यात आली होती. रितेश हे सुसंस्कारीत व उच्चशिक्षित उमेदवार असून त्यांनी निवडून आल्यानंतर पुढील आठ महिन्यामध्ये चांगले काम करावे. पुढची पाच वर्षेही त्यांचीच असतील, असे विधानही दीपक ढवळीकर यांनी केले. येत्या दोन दिवसात अनेक अफवा उठतील. युतीबद्दलही प्रश्न उपस्थित करणारा अपप्रचार होईल. मात्र त्यावर मतदारांनी विश्वास ठेवू नये. जास्तीत जास्त लोकांनी मतदानासाठी बाहेर पडून रितेश नाईक यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.