फोंडा पोटनिवडणूक 9 एप्रिलला
उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून : संपूर्ण दक्षिण गोव्यात आचारसंहिता लागू
फोंडा : फोंडा मतदारसंघ विधानसभा पोटनिवडणूक दि. 9 एप्रिल रोजी होणार आहे.केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काल रविवारी सायंकाळी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसह फोंडा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर केली. दि. 9 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीची आचारसंहिता संपूर्ण दक्षिण गोव्यात लागू झाली आहे. ही पोटनिवडणूक फोंडा मतदारसंघात होत असली तरी संपूर्ण गोव्याचे लक्ष त्याकडे लागून राहिले आहे. भाजपा आणि काँग्रेस पक्षाने फोंड्याची ही जागा जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. दोन्ही पक्षांनी आपले संभाव्य उमेदवार निश्चित केले असून येत्या दोन दिवसांत उमेदवारांची नावेही जाहीर होणार आहेत. पुढच्या वर्षी 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
नवीन नेतृत्वाला संधी देणारी निवडणूक
फोंडा मतदारसंघाचे आमदार तथा माजी कृषीमंत्री रवी नाईक यांचे गेल्या 15 ऑक्टोबर रोजी निधन झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. फोंडा मतदारसंघाच्या राजकारणाला कलाटणी देणारी तसेच नवीन नेतृत्वाच्या उदयाला संधी देणारी ही निवडणूक म्हणून त्याकडे पाहिले जाते. या मतदारसंघाचे राजकारण आणि येथील समाजकारणावरही रवी नाईक यांचा आजवर प्रभाव होता. वर्ष 1984 मध्ये फोंडा मतदार संघातून पहिल्यांदा आमदार बनलेले रवी नाईक हे गेली चाळीस वर्षे फोंड्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू बनून राहिले होते. मध्यंतरी 1989 मध्ये मडकई मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली तरी 1999 च्या विधानसभा निवडणुकीपासून फोंडा मतदारसंघात तब्बल पाचवेळा आमदार म्हणून त्यांची कारकीर्द राहिली आहे. विशेष म्हणजे मागील 2022 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपातर्फे उमेदवारी करीत, फोंडा मतदारसंघावर पहिल्यांदाच भाजपाचा झेंडा रोवला होता. केवळ फोंडाच नव्हे तर गोव्याच्या राजकारणातील प्रभावशाली नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या निधनामुळे फोंडा मतदारसंघाचे राजकारण नवीन वळण घेत आहे. नवीन नेतृत्वाच्या उदयाला संधी देणारी ही पोटनिवडणूक असेल.
भाजपा व काँग्रेसचे उमेदवार दोन दिवसांत होणार जाहीर
भाजपाने आपला उमेदवार अद्याप जाहीर केलेला नसला तरी, विविध माध्यमातून प्रचारकार्याला यापूर्वीच जोरात सुऊवात केली आहे. रवी नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रितेश नाईक हे भाजपाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची सध्या जोरात चर्चा आहे. माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विश्वनाथ उर्फ अपूर्व दळवी हेही अन्य एक दावेदार आहेत. काँग्रेस पक्षानेही पोटनिवडणुकीसाठी वेगळी रणनिती आखत फोंड्यातील धडाडीचे समाजकार्यकर्ते डॉ. केतन भाटीकर यांना पक्षात प्रवेश देत, जोरदार तयारी केली आहे. डॉ. भाटीकर हेच काँग्रेसचे उमेदवार असण्याची अधिक शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत काँग्रेस आपला उमेदवार जाहीर करणार असल्याचे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केले आहे. ही पोटनिवडणूक काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार की, अन्य पक्षांसोबत युती करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मगो पक्षाने आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली असून रवी नाईक यांच्या मुलाला उमेदवारी देऊन बिनविरोध निवडून आणण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे, असे म्हटले होते. आम आदमी पक्षानेही येणाऱ्या 2027 च्या निवडणुकीची तयारी म्हणून फोंडा मतदारसंघात कार्याला सुऊवात केली आहे. पोटनिवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुऊ असून एकदोन नावेही चर्चेत आहेत. डॉ. भाटीकर यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर काँग्रेस पक्षातील काही नाराज कार्यकर्त्यांनी आपमध्ये प्रवेश केला आहे.
एसआयआर नंतर एकूण 27,927 मतदार
मतदार पडताळणी (एसआयआर) नंतर फोंडा मतदारसंघात होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने त्याचा परिणाम मतदानावर दिसून येण्याची शक्यता आहे. एसआयआर नंतर मतदार यादीतून 4230 मतदारांची नावे वगळण्यात आल्याने 27,927 मतदार राहिले आहेत. 2022 मधील निवडणुकीच्या मतदार यादीत एकूण मतदार संख्या 32,157 होती, जी चार हजारांनी कमी झाली आहे.
निवडणूक प्रक्रियेचे वेळापत्रक
- उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ-सोमवार 16 मार्चपासून
- उमेदवारी स्वीकारण्याचा शेवटचा दिवस-सोमवार 23 मार्च
- अर्जांची छाननी-मंगळवार 24 मार्च
- अर्ज मागे घेण्याचा दिवस-गुरुवार 26 मार्च
- मतदानाचा दिवस-गुरुवार 9 एप्रिल
फोंडा पोटनिवडणुकीचा अधिवेशनावर परिणाम?
फोंडा पोटनिवडणूक जाहीर झाल्यामुळे विधानसभा अधिवेशनावर आता परिणाम होणार आहे. निवडणूक आयोगाने फोंडा मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर केली असली तरी देखील आचारसंहिता मात्र संपूर्ण दक्षिण गोव्याला लागू आहे. सध्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. सरकारला कोणत्याही नव्या योजना जाहीर करता येणार नाहीत किंवा राज्य विधानसभेत कोणतीही महत्त्वाची आश्वासनेही देता येणार नाहीत किंवा घोषणा देखील करता येणार नाहीत. त्यामुळे अधिवेशनाच्या एकंदरीत कामकाजावरच गंभीर परिणाम होण्याची शक्मयता आहे.
विरोधी पक्ष या परिस्थितीची दखल घेऊन सरकारला अडचणीत आणण्यासाठी व्यूहरचना तयार करील. फोंडा मतदारसंघाला बाजूला काढून इतर सर्व 39 मतदार संघासाठी एखादी योजना किंवा आमदारांनी सूचित केलेल्या सूचना मान्य करतो, असे आश्वासन देणेदेखील शक्मय होणार नाही. एकंदरीतच विधानसभा अधिवेशनाची यामुळे हवाच निघून जाईल. किंवा विधानसभेत मंत्री घोषणा करतात ते कामकाज विधानसभेपुरतेच मर्यादित आहे व त्यात दुसरा कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही असे देखील म्हणता येणार नाही. त्यामुळेच सरकारची थोडीफार तारेवरची कसरत होईल आणि विरोधकांना सरकारच्या विरोधात आवाज उठवण्याची नामी संधी प्राप्त झालेली आहे.
यावर पर्याय म्हणून संपूर्ण अर्थसंकल्प एका दिवसात संमत करून अधिवेशन गुंडाळता येईल. याव्यतिरिक्त चार महिन्यांसाठी लेखानुदान मागण्या संमत करून घेऊन उर्वरित मागण्या पावसाळी अधिवेशनात पूर्ण करता येतील. मात्र सरकार अधिवेशन गुंडाळणे हाच पर्याय स्वीकारू शकते.