प्रदूषणाची पातळी धोकादायक; ठोस उपाययोजनांची गरज
कोल्हापूर :
कोल्हापूर शहरातील स्वच्छ हवेची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. रुक्ष हवा, वाढत्या वाहनांची संख्या, खराब रस्ते बांधणीमुळे धुलीकणांची वाढ आदी कारणाने प्रदूषणात दिवसगणित भर पडत आहे. या प्रदूषणामुळे कोल्हापूरकरांच्या शरीरात श्वसनाद्वारे सरासरी अडीच सिगारेटच्या धुराएवढा घातक धूर शरीरात जात आहे. म्हणजे अडीच सिगारेट ओढल्यानंतर जेवढा धूर फुफ्फुसांत जमा होतो तेवढाच धूर प्रदूषणामुळे शरीरात शोषला जात आहे. कोल्हापूरकरसाठी ही धोक्याची घंटाच आहे.
एक सिगारेट म्हणजे पीएम 2.5 चे 22 मायक्रॉन प्रतिघनमीटर प्रमाण होय. दिवसभरात 22 मायक्रॉन प्रतिघनमीटर प्रदूषित हवा श्वसनातून फुप्फुसात जाणे म्हणजे एक सिगारेट ओढण्यासारखे आहे. गेल्या आठवड्यात कोल्हापूरच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 135 पीएम 2.5 एवढा नोंदवण्यात आला होता. या हवेत श्वास घेणे म्हणजे दिवसभरात अडीचपेक्षा अधिक सिगारेट ओढण्यासारखे होते. आठवड्यातील सोमवार, मंगळवार आणि बुधवार या गर्दीच्या दिवशी तर कोल्हापुरातील मोजक्या ठिकाणी दिवसात चार सिगारेट ओढण्यासारखे होते. काही ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक तब्बल दूप्पट 270 गेला होता. पार्टीकल मॅटर 2.5 चे सरासर प्रमाण 270 व पार्टीक्युलर मेटर 10 ते सरसरी प्रमाण 212 इतके गंभीर होते.
काही शहरात प्रदुषण कमी करण्यासाठी रस्त्यावर पाण्याचे फवारे मारण्याचे काम केले जाते. कोल्हापुरात मोजक्या चौकात सुक्ष्म पाणी फवारणी यंत्र बसवले आहे. मात्र ते बसल्यापासून काही मोजकं तासच सुरू होते. वाढत्या प्रदूषणाच्या तुलनेत महापालिकेला मोठ्या स्तरावर उपाययोजना कराव्या लागणार आहेत. गेल्या काही वर्षापासून कोल्हापूरच्या प्रदूषणात भर पडत असून, वाहनांची वाढलेली संख्या, वाहतुकीची कोंडी, खराब रस्ते बांधणी म्हणजे खराब दर्जाचे डांबर वापरुन केलेली रस्त्यांमुळे रसायनयुक्त धुळीचे प्रमाण वाढले आहे. जळणारा कचरा कोल्हापूरकरांच्या जीवावर येत आहे. देशात दिल्लीनंतर हवा प्रदुषणाच्याबाबत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आरटीओतील आकडेवारीनुसार कोल्हापुरात गतवर्षी कोल्हापुरात 11 लाख 60 हजार 155 वाहने होती. यंदाच्या वर्षी ती संख्या 12 लाख 44 हजार गेली. 84 हजार 622 वाहनांची त्यात नव्याने भर पडली. यामध्ये 9 लाख 81 हजार 185 दुचाकी आहेत. या वाहनांतून निघणारा धूर अधिक धोकादायक आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करताना त्या पद्धतीने आखल्या जाव्यात. कारण हवेतील प्रदूषण म्हणजे केवळ धूळ नव्हे, याकडे अभ्यासकांनी लक्ष वेधले आहे. सल्फर, नायट्रोजन, कार्बन डाय ऑक्साइडसारखे विषारी वायू कोल्हापूरकरांच्या शरीरात जात आहेत. रोजच्या कचऱ्यात किमान 30 टन प्लॉस्टिकचा कचरा असतो. अनेक सफाई कर्मचारी कचरा जाळतात. झूम प्रकल्प येथे पेटणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात धुराचे लोट हे कायमचे चित्र आहे. परिणामी मिथेनसारखे विषारी वायुंची मात्रा वाढत आहे. त्वचेचे विकार, किडनीचे आजार, कॅन्सर, घसा व ताणतणाव आदी आजारांना निमंत्रण मिळत आहे.
न्यायालयाच्या निर्देशानुसार एमपीसीबी, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, एनजीओ व इतर सरकारी कार्यालयांनी एकत्र येऊन कचरा जळीत प्रकरणी भरारी पथकाव्दारे वॉच ठेवण्यास सांगितले आहे. खासगी किंवा सार्वजानिक ठिकाणी कचरा जाळल्यास संबंधित संस्था किंवा व्यक्तीला पहिल्या टप्यात एक हजारांपासून 25 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र असे कोणतेही पथक नेमलेले नाही. किंवा कारवाई होताना दिसत नाही.
रुग्ण संख्या वाढतेय..!
प्रदूषण म्हणजे पीएम 2.5 आणि पीएम 10 या दोन विभाग वर्गवारीत मोजले जाते. त्याच्या सरासरीनुसार, हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक काढला जातो. हिवाळा आरोग्यदायी असतो. अलीकडे शहरे प्रदूषित झाल्यामुळे हिवाळा प्रदूषणामुळे आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे. भौगोलिकदृष्ट्या संथ हवा आणि कमी तापमान हे जास्त प्रदूषणास कारणीभूत ठरतात. सूक्ष्म धूलिकण (2.5 आणि 10) नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड, अमोनिया प्रत्येक प्रदूषकांची स्वतंत्र नोंद वेगळी असते. परंतु, हवेच्या गुणवत्तेचा दर्जा सर्व प्रदूषके मिळून सरासरी काढली जाते. प्रदूषणामुळे दमा, टीबी, कॅन्सर, सर्दी, खोकला, डोळे, त्वचा आणि हृदय रोगांचे रुग्ण वाढत आहेत.