दिल्लीत प्रदूषण ‘गंभीर’ पातळीवर
‘एक्यूआय-440’ पार : सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल : शालेय विद्यार्थ्यांना मास्क अनिवार्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील प्रदूषण अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. शनिवारी सकाळी 7 वाजता दिल्लीतील दहाहून अधिक भागात हवा गुणवत्ता निर्देशांकाने (एक्यूआय) 400 ची पातळी ओलांडल्याची नोंद झाली आहे. जहांगीरपुरीमध्ये एक्यूआयने 445 ची सर्वोच्च पातळी गाठली. वाढत्या प्रदूषणामुळे आता दिल्लीत ‘ग्रॅब-3’मधील नियमांची अंमलबजावणी होणार आहे. हवा गुणवत्ता आणखी बिघडल्यास निर्बंध अधिक कडक केले जाणार आहेत.
वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आतिशी यांनी सरकारी कार्यालयांच्या नव्या वेळा जाहीर केल्या. केंद्र सरकारची कार्यालये सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत तर दिल्ली सरकारची कार्यालये सकाळी 10 ते सायंकाळी 6.30 आणि दिल्ली महानगरपालिकेची कार्यालये सकाळी 8.30 ते सायंकाळी 5 या वेळेत काम करतील. तसेच शाळांसाठीही सरकारकडून महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
वायू प्रदूषणाने पुन्हा एकदा दिल्ली-एनसीआरचा श्वास कोंडला आहे. शाळकरी मुलांचे आरोग्य लक्षात घेऊन दिल्ली सरकारने पाचवीपर्यंतच्या सर्व प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण दिले जाणार आहे. तसेच बांधकाम कामावर बंदी लागू होणार असून सार्वजनिक वाहतुकीवर भर देण्यात येणार आहे.
धुके आणि हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (ग्रॅब) स्टेज-3 ची मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत. एक्यूआय 440 हा हवा गुणवत्तेचा टप्पा ‘गंभीर’ श्रेणीत आला आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक ‘गंभीर’ पातळीवर पोहोचल्यामुळे ‘ग्रॅब’चा टप्पा 3 लागू केला जातो. त्यानुसार आता शिक्षण विभागाने इयत्ता 5 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग चालवण्याचा निर्णय घेतला. तर सहावीपासून पुढील वर्गाचे ऑफलाईन वर्ग सुरू ठेवण्यात येणार आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेत येताना मास्कची सक्ती करण्यात आली आहे. सहावी ते बारावीपर्यंतच्या शाळांना मास्क अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खासगी वाहनांवर निर्बंध
सरकारने लोकांना खासगी वाहने न चालवण्याचे आवाहन केले आहे. यासाठी 106 अतिरिक्त क्लस्टर बस आणि मेट्रोच्या 60 ट्रिप वाढवण्यात आल्या आहेत, खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक सुविधांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटनेही (सीएक्यूएम) हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून दिल्लीला येणाऱ्या बसेसना बंदी घातली आहे.
तोडफोडीवर बंदी, डिझेल वाहनांवर बंदी
दिल्ली-एनसीआरमध्ये बांधकाम, खाणकाम आणि पाडकामावर बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली, गुऊग्राम, फरिदाबाद, गाझियाबाद आणि गौतम बुद्ध नगरमध्ये बीएस-3 पेट्रोल आणि बीएस-4 डिझेलची चारचाकी वाहने धावणार नाहीत. तसेच उल्लंघन केल्याप्रकरणी 20 हजार ऊपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. बीएस-3 डिझेलच्या आपत्कालीन वाहनांव्यतिरिक्त या पातळीच्या सर्व मालवाहतूक गाड्यांवर दिल्लीत बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय अवजड वाहतूक असलेल्या मार्गांवर मशिनच्या मदतीने रस्ते स्वच्छ करण्याची वारंवारता वाढवली जाणार आहे.
उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचलमध्ये दाट धुके
पंजाब-चंदीगडमध्ये धुक्मयाचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानमध्ये दोन दिवस दाट धुक्मयाचा इशारा आहे. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये 18 नोव्हेंबरपर्यंत रात्री आणि सकाळच्या वेळी दाट ते खूप दाट धुके राहील. हरियाणा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंडमध्येही धुके राहण्याची शक्मयता आहे.