‘प्रदूषण नियंत्रण’च्या अधिकाऱ्यांना तेरवाड बंधाऱ्यावर घेराव
कोल्हापूरः
तेरवाड (ता. शिरोळ) येथील पंचगंगा नदीच्या बंधाऱ्यावर काळेकुट्ट, दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू झाला. मृत माशांचा खच साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील तेरवाड बंधाऱ्यावर दूषित पाण्याचे नमुने घेण्यासाठी आले होते. यावेळी, स्वाभिमानी संघटनेचे बंडू पाटील, विश्वास बालीघाटेसह शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घालून तीव्र आंदोलन केले.
जोपर्यंत प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत अधिकाऱ्यांना सोडणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेत प्रश्नांची सरबत्ती केली. दरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळाची उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी प्रदूषित पाण्याचा सविस्तर अहवाल प्राप्त करून प्रदूषित घटकावर त्वरित कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती निवळली.
पंचगंगा नदीत मृत मासे मिळून आल्याने या ठिकाणी प्रत्येक वेळी पाण्याचे नमुने घेऊन जाणारे अधिकारी कोणताच अहवाल देत नाहीत की कार्यवाही करत नाहीत शासन बघ्यची भूमिका घेत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी आणि पंचगंगा नदीवर आधारित असणाऱ्या पाणी योजनेच्या गावातील ग्रामस्थातून उपस्थित होत आहे.
यावेळी बोलताना बंडू पाटील म्हणाले की पंचगंगा नदी प्रदूषित करून जनतेच्या आरोग्याशी खेळ करण्राया दोषींवर कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. जबाबदार घटकांवर कठोर कारवाई केली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.