प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पोलिसांना ‘दूषण’?
नरकासुराच्या रात्री आवाज प्रदूषणाचा मुद्दा
पणजी : दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुर दहनाच्या वेळी आवाजाचे प्रदूषण नियंत्रणाबाहेर गेल्यासंबंधी कोणत्याही तक्रारी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पोहोचलेल्या नाहीत. तरीही त्यासंबंधी कोणत्याही तक्रारी आल्यास कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांची होती व तसे स्पष्ट निर्देश त्यांना देण्यात आले होते, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुर दहनाच्या वेळी कर्णकर्कश संगीत वाजवून रात्र जागविण्याचे प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहेत. मात्र त्यामुळे ज्येष्ठ आणि वयोवृद्धांना प्रचंड मनस्ताप सहन करावे लागतात. हे वाढते प्रकार बंद व्हावे अशी आर्जवे, याचना करून लोक थकले. तरीही सरकारच्या कानापर्यंत तो ‘आवाज’ काही जात नाही. दरम्यानच्या काळात काही लोक न्यायालयातही गेले व तरीही समस्येचे निराकरण होत नसल्याचे पाहून हल्लीच पणजीतील काही लोकांनी मानव अधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या आयोगाने पोलिसांना स्पष्ट निर्देश देताना रात्री 10 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत ‘डीजेवाल्या बाबूंना’ आवरण्यास सांगितले होते.
परंतु सुस्तावलेल्या यंत्रणेच्या कार्यपद्धतीचा गैरफायदा घेताना अनेक ठिकाणी डीजेवाल्यांनी हैदोस घालायचा तो घातलाच. त्यातून न्यायालयाच्या आदेशाचे पार धिंडवडेच निघाले, आणि या सर्वांवर कहर म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळानेही सरळ सरळ पोलिसांकडेच बोट दाखवून त्यांच्या कार्यक्षमतेबाबत लोकांच्या मनात असलेला संशय दृढ होण्यास हातभारच लावला. प्रदूषण नियंत्रण मंडळातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आवाज प्रदूषणासंबंधी तक्रारींवर कारवाई करणे हे पोलिसांचे काम आहे. त्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक यंत्रणा आहे. त्याकामी गरज भासल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळ पोलिसांना मदत करू शकते, मात्र कारवाई पोलिसांनीच केली पाहिजे, असे ते म्हणाले. त्याशिवाय आवाज मर्यादेचे उल्लंघन होत आहे की नाही, याची खातरजमा करणे ही जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, असेही मंडळाने म्हटले आहे.