For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव, चिकोडीत 7 मे रोजी मतदान

06:58 AM Mar 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव  चिकोडीत 7 मे रोजी मतदान
Advertisement

लोकसभा निवडणुकीचा शंखनाद : देशात 19 एप्रिलपासून 1 जूनपर्यंत सात टप्प्यात मतदान : आचारसंहिता लागू

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. देशातील लोकसभेच्या 543 जागांसाठी 19 एप्रिल ते 1 जून 2024 दरम्यान सात टप्प्यात निवडणुका होणार असून 4 जून रोजी मतमोजणी केली जाईल. निवडणूक कार्यक्रमानुसार, महाराष्ट्रात पाच तर कर्नाटकात दोन टप्प्यात निवडणुका घेण्यात येतील. बेळगाव, चिकोडी-सदलगा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे. 18 व्या लोकसभेच्या स्थापनेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर देशात तत्काळ प्रभावाने आचारसंहिता लागू झाली आहे. आता मतदारांच्या निर्णयावर प्रभाव टाकणारा कोणताही धोरणात्मक निर्णय सरकार घेऊ शकणार नाही.

Advertisement

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विज्ञान भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून शेवटचे मतदान 1 जून रोजी होणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये 7 टप्प्यात मतदान होणार आहे. तर महाराष्ट्र, जम्मू-काश्मीरमध्ये पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा, मणिपूर या चार राज्यांमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे, तर छत्तीसगड आणि आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान होईल. त्याचप्रमाणे ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंडमध्ये चार टप्प्यांत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकच टप्पा

21 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदानाचा एकच टप्पा होणार आहे.  त्यात अऊणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, चंदीगड, दादरा नगर हवेली, दिल्ली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, केरळ, लक्षद्वीप, लडाख, मिझोराम, मेघालय, नागालँड, पुदुच्चेरी, सिक्कीम, तामिळनाडू, पंजाब, तेलंगणा आणि उत्तराखंड यांचा समावेश आहे.

19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान

पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार असून, त्यात 21 राज्यांतील 102 जागांवर मतदान होणार आहे. तर 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांतील 89 जागांवर मतदान होणार आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी 12 राज्यांतील 94 जागांवर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 13 मे रोजी चौथ्या टप्प्यात 10 राज्यांतील 96 जागांवर, 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात 8 राज्यांतील 49 जागांवर, 25 मे रोजी सहाव्या टप्प्यात 7 राज्यांतील 57 जागांवर मतदान होणार आहे. 1 जून रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 8 राज्यांमध्ये 57 जागांसाठी मतदान होणार आहे.

100 वर्षांवरील 2.18 लाख मतदार, 88.5 लाख दिव्यांग मतदार

लोकसभा निवडणुकीतील सुमारे 97 कोटी मतदारांपैकी 49.70 कोटी पुऊष तर 47.15 कोटी महिला मतदार आहेत. देशात सुमारे 21.5 कोटी युवा मतदार आणि 1.82 कोटी नवीन मतदार आहेत, अशी माहिती सीईसी राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या लोकसभा निवडणुकीत 100 वर्षांवरील 2.18 लाख मतदार आहेत, तर 88.5 लाख दिव्यांग मतदार आहेत. तसेच 85 वर्षांवरील एकूण 82 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

55 लाख ईव्हीएमचा वापर होणार

लोकसभा निवडणुकीत 55 लाख इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) वापरण्यात येणार आहेत. देशभरात सुमारे 1.5 लाख मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून तेथे मतदारांसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी यासाठी 1.5 कोटी मतदान अधिकारी तैनात केले जातील.

चार राज्यांमध्ये लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका

सिक्कीम, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्रप्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकांसोबतच विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. आंध्रप्रदेशात 18 एप्रिलला अधिसूचना निघेल आणि 13 मे रोजी मतदान होईल. अऊणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये 20 मार्च रोजी अधिसूचना आणि 19 एप्रिल रोजी मतदान होईल. तर ओडिशात 18 एप्रिलला पहिली अधिसूचना आणि 13 मे रोजी पहिला टप्पा होईल. त्यानंतर 20 मे, 25 मे आणि 1 जून असे पुढील तीन टप्प्यात मतदान होईल, असे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाचे आवाहन

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, आम्ही सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करतो. कारण हा तुमचा धर्म आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा हा एक उत्सव आहे. यादरम्यान राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारात वैयक्तिक हल्ले टाळावेत, असा महत्त्वपूर्ण सल्लाही निवडणूक आयोगाने दिला.

कर्नाटकात दोन तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान

गोव्यातील दोन्ही मतदारसंघातही 7 मे रोजी मतदान

उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगालमध्ये सातही टप्प्यात मतदान

स्टार प्रचारकांसाठी आयोगाची नियमावली

सोशल मिडीयाचा वापर काळजीपूर्वक करा

प्रचारात आरोप-भाषेचा घसरता स्तर रोखा

फूकट वाटल्या जाणाऱ्या आमिषांवर नजर

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत इशारा

द्वेषपूर्ण वक्तव्ये पूर्णपणे टाळण्याचे निर्देश

सट्टाबाजी व्यवहारसंदर्भात बँकांना आदेश

गुन्हे, गुंडगिरीविरुद्ध कठोर पावले उचलणार

मसल पॉवर, मनी पॉवर रोखण्यावर भर देणार

निवडणुकीत पैशाच्या बळावर कडक कारवाई

‘सोशल’ अफवांचा फैलाव रोखण्याचे आव्हान

आकडे बोलतात...

10.5 लाख        एकूण मतदान केंद्रे

1.5 कोटी          मतदान कर्मचारी

55 लाख ईव्हीएमचा वापर

97 कोटी          नोंदणीकृत मतदार

1.82 कोटी      नवमतदार

21.50 कोटी    युवा मतदार

88 लाख          65 वर्षांवरील मतदार

2 लाख              100 वर्षांवरील मतदार

मतदान प्रक्रिया...

टप्पा        मतदान तारीख      जागा

पहिला     19 एप्रिल                   102

दुसरा       26 एप्रिल                   89

तिसरा     7 मे                    94

चौथा        13 मे                   96

पाचवा     20 मे                  49

सहावा     25 मे                  57

सातवा     1 जून                 57

Advertisement
Tags :

.