For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजस्थान विधानसभेसाठी 70 टक्क्यांवर मतदान

06:58 AM Nov 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
राजस्थान विधानसभेसाठी 70 टक्क्यांवर मतदान
Advertisement

199 जागांवर निवडणूक : 1863 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद

Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर

राजस्थानमध्ये विधानसभेच्या 199 जागांसाठी शनिवारी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. काही अपवाद वगळता राज्यात शांततेत मतदान झाल्याचे सांगण्यात आले. दिवसअखेरपर्यंत राज्यात 70 टक्क्यांवर मतदानाची नोंद झाली आहे. अंतिम मतदान टक्केवारीची घोषणा निवडणूक आयोगाकडून रविवारी होणार आहे. विधानसभेच्या 200 पैकी 199 जागांवर एकूण 1,863 उमेदवार रिंगणात असून सर्वांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. आता राज्यात 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Advertisement

काँग्रेस उमेदवाराच्या निधनामुळे करणपूर विधानसभेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आमदार गुरमीत सिंह कुन्नर यांच्या निधनामुळे 200 पैकी 199 मतदारसंघात शनिवारी मतदान घेण्यात आले. मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे, सचिन पायलट, राज्यवर्धनसिंह राठोड आणि दिया कुमारी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. संध्याकाळी 5 वाजता राज्यात 68.24 टक्के मतदान झाले होते. त्यानंतरही अनेक लोक मतदान केंद्रांवर रांगेत उभे होते. मतदानाची वेळ सायंकाळी 6 वाजेपर्यंत असल्याने एकूण टक्केवारी 70 टक्क्यांच्या वर जाणार आहे. तसेच सर्व आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर मतदानाचा आकडा आणखी वाढू शकतो.

 

भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 3 वाजेपर्यंत 55.63 टक्के मतदान झाले आहे. जैसलमेरमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली होती.  सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान पार पडले. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षांचा प्रचार गुऊवारी थांबला होता. शनिवारी झालेल्या मतदानादरम्यान काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, दगडफेक आणि संघर्षाची स्थिती दिसून आली. मात्र, कोणत्याही ठिकाणी मतदान थांबल्याच्या किंवा निवडणूक स्थगित केल्याचे प्रकार न झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

राजस्थानमध्ये मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे. 1993 मध्ये भाजप सत्तेत आल्यापासून येथे दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा आहे. या काळात केवळ काँग्रेस आणि भाजपचीच सरकारे स्थापन झाली आहेत. त्यामुळे यंदाही हीच परंपरा कायम राहिल्यास सत्तेचा लगाम भाजपच्या हाती येईल, अशी आशा भाजप नेत्यांना आहे. त्याचबरोबर जवळपास तीन दशकांपासून चालत आलेली ही परंपरा यावेळी बदलेल, अशी आशा काँग्रेसला आहे.

काँग्रेस आणि भाजपने अनेक निवडणूक आश्वासने दिली आहेत. सात हमीभावांची घोषणा करून काँग्रेसने अशोक गेहलोत सरकारची कामे आणि त्याद्वारे चालवलेल्या योजना आणि कार्यक्रमांकडे जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळी, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या निवडणूक प्रचारात महिलांवरील गुन्हे, तुष्टीकरण, भ्रष्टाचार आणि पेपरफुटी या मुद्यांवरून गेहलोत सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. आता मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून निकालासाठी 3 डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Advertisement
Tags :

.