हरियाणात मतदान दिनांक बदलणार?
निवडणूक आयोग मंगळवारी निर्णय जाहीर करणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान 1 ऑक्टोबरला निर्धारित करण्यात आले आहे. मात्र, या वेळापत्रकात बदल करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे नेते अभय चौताला यांनीही हीच मागणी केली आहे. निवडणूक आयोग या मागणीवर गंभीरपणे विचार करत असून 1 ऑक्टोबरच्या स्थानी 6 ऑक्टोबरला मतदान घेतले जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
30 सप्टेंबर आणि 2 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी हरियाणात सरकारी सुटी आहे. 1 ऑक्टोबरला मतदान घेतल्यास मतदानाची टक्केवारी घसरण्याची शक्यता आहे, कारण मतदानाच्या दिवसाच्या आदल्या आणि पुढच्या दिवशी सुटी आहे. अशी सलग तीन दिवस सुटी आल्याने अनेक लोक आपली गावे किंवा शहरे सोडून प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. याचा विपरीत परिणाम मतांच्या टक्केवारीवर होऊ शकतो, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय लोकदल यांनी केले आहे. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ही परिस्थिती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आयोगानेही ही अडचण असल्याचे मान्य केले होते. त्यामुळे सरकारी सुटीच्या आदल्या किंवा दुसऱ्या दिवशी मतदान असू नये, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे आता हरियाणाच्या संदर्भात हीच परिस्थिती ओढवल्याने मतदानाच्या वेळापत्रकात योग्य ते परिवर्तन करण्याच्या विचारात आयोग असल्याची माहिती देण्यात आली.