For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नात्यांपेक्षा राजकारण ठरले वरचढ

05:08 AM Nov 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
नात्यांपेक्षा राजकारण ठरले वरचढ
Advertisement

पती-पत्नी अन् पिता-कन्येदरम्यान लढत

Advertisement

राजस्थान निवडणुकीत राजकारण हे नात्यांपेक्षा वरचढ ठरत असल्याचे चित्र आहे. कुठे पती विरोधात पत्नी निवडणूक लढवत आहे. तर काही ठिकाणी काका-पुतणी अशी लढत होणार आहे. एका मतदारसंघात तर मुलीने स्वत:च्या वडिलांच्या विरोधातच अर्ज भरला आहे. तर दुसऱ्या ठिकाणी पित्याने स्वत:च्या मुलाच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे पाऊल उचलले आहे.

दांतारामगढ : पती विरोधात पत्नी

Advertisement

राजस्थान निवडणुकीत सर्वात रंजक लढत दांतारामगढ मतदारसंघात होणार आहे. येथे काँग्रेस उमेदवार वीरेंद्र सिंह विरोधात त्यांची पत्नी रीटा चौधरी या जननायक जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर भाजपने गजानंद कुमावत यांना उमेदवारी दिली आहे. वीरेंद्र सिंह यांचे वडिल नारायण सिंह हे काँग्रेसचे मातब्बर नेते आहेत. 2018 मध्ये त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घेत स्वत:चे पुत्र वीरेंद्रला आमदार म्हणून निवडून आणले होते. यावेळी वीरेंद्र हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर मागील एक वर्षांपासून वेगळी राहणारी त्यांची पत्नी रीटा देखील निवडणूक लढवत आहेत.

धौलपूर मतदारसंघ :   मेहुणीच विरोधात उभी

धौलपूर मतदारसंघात काँग्रेसने शोभाराणी कुशवाह यांना उमेदवारी दिली आहे. शोभाराणी यांच्यासमोर स्वत:च्या बहिणीचे पती तसेच भाजप उमेदवार शिवचरण कुशवाह यांचे आव्हान आहे.

भादरा मतदारसंघ : काका-पुतण्यांमध्ये संघर्ष

भादरा मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या अशी लढत आहे. येथे भाजपने संजीव बेनीवाल यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसच्या तिकिटावर त्यांचे पुतणे अजीत बेनीवाल हे निवडणूक लढवत आहेत.

अलवर ग्रामीण :

पिता-मुलीमध्ये चुरस

अलवर ग्रामीण मतदारसंघात भाजप उमेदवार जयराम जाटव यांच्याविरोधात त्यांची कन्या मीना कुमारी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

खेतडी मतदारसंघ : पुतणी विरुद्ध काका

खेतडी मतदारसंघात मनीषा गुर्जर काँग्रेसच्या उमेदवार आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपने धर्मपाल यांना उमेदवारी दिली आहे. धर्मपाल हे गुर्जर यांचे काका आहेत.

नागौर मतदारसंघ : काकासमोर पुतणीचे आव्हान

नागौर मतदारसंघात भाजपकडून ज्योति मिर्धा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसने मिर्धा यांचे काका हरेंद्र मिर्धा यांना उमेदवारी देत निवडणुकीतील रंगत वाढविली आहे.

सोजत, बस्सी मतदारसंघ : नातेवाईकांमध्ये लढत

सोजत मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार निरंजन आर्य आहेत. तर विरोधात त्यांच्या नातेवाई शोभा चौहान यांना भाजपने तिकीट दिले आहे. बस्सी मतदारसंघात माजी आयएएस चंद्रमोहन मीणा हे भाजपच्या तर माजी आयपीएस अधिकारी लक्ष्मण मीणा हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. दोघेही परस्परांचे नातलग आहेत.

दोन्ही पक्षांसाठी मतयाचना

दिग्गज जाट नेते रीछपाल मिर्धा हे डेगाना मतदारसंघात स्वत:चे पुत्र विजयपाल यांच्यासाठी मतयाचना करत आहेत. तर दुसरीकडे नागौर मतदारसंघात भाजपच्या उमेदवार अन् पुतणी ज्योति मिर्धा यांच्यासाठीही ते प्रचार करत आहेत.

पिता-पुत्र आमनेसामने

खंडार मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अशौक बैरवा यांना त्यांचेच पिता डालचंद यांच्याकडून विरोध होत आहे. कौटुंबिक वादामुळे डालचंद हे कुणालाही मतदान करा, परंतु अशोक बैरवा यांना मत देऊ नका असे लोकांना सांगत आहेत.

Advertisement
Tags :

.