‘बटाट्या’वरुन राजकारण, अनेक राज्यांमध्ये प्रभाव
ममता बॅनर्जींचा आदेश : झारखंड, ओडिशा, बिहार, आसाममध्ये संकट
वृत्तसंस्था/ रांची, भुवनेश्वर
पश्चिम बंगालने अन्य राज्यांसाठीच्या आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर बंदी घातली आहे. यामुळे बटाट्याची वाहतूक करणारे शेकडो ट्रक ओडिशा-बंगाल सीमेवर उभे आहेत. वाहनांना आंतरराज्य सीमा ओलांडण्याची अनुमती देणे नाकारले जात आहे. तर अनेक ट्रक यामुळे स्वत:च्या मूळ स्थानी परतल्याने बटाटे खराब होत आहेत. तर दुसरीकडे ओडिशा आणि झारखंडमध्ये बटाट्यांचा पुरवठा बंद झाल्याने दर वाढले आहेत.
ओडिशाच्या बाजारपेठांमध्ये पूर्वी 33 रुपये प्रतिकिलो दराने विकला जाणारा बटाटा आता 45 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. पुरवठा पूर्ववत न झाल्यास बटाट्याच्या किमती आणखी वाढू शकतात असे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. ओडिशा सरकारने हस्तक्षेप करत राज्यात बटाट्यांच्या ट्रक्सना प्रवेश देण्याची अनुमती देण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारसोबत चर्चा करावी असे आवाहन ऑल ओडिशा ट्रेडर्स असोसिएशनचे सचिव सुधाकर पांडा यांनी केले आहे. पश्चिम बंगालमधून होणारा बटाट्यांचा पुरवठा थांबला आहे. ओडिशाला प्रतिदिन सुमारे 4500 टन बटाट्यांची आवश्यकता असते. राज्य याकरता बऱ्याचअंशी पश्चिम बंगालवर निर्भर असल्याचे राज्याचे अन्नपुरवठा आणि ग्राहक कल्याणमंत्री कृष्णचंद्र पात्रा यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगाल सरकारने 5 दिवसांपूर्वी बटाट्यांचा पुरवठा रोखला आहे. यानंतर बंगालमधून बटाट्याची अन्य राज्यांसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनांना तपासणी नाक्यांवर रोखण्यात आले आहे. झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्ह्याला लागून असलेल्या बंगालच्या सीमेवरील डिबूडीह तपासणी नाक्यावर मागील 5 दिवसांपर्यंत बटाट्यांची वाहतूक करणाऱ्या 200 हून अधिक ट्रक्सना रोखण्यात आले आहे. अनेक ट्रक अद्याप सीमेवर उभे असून त्यातील बटाट्यांना परत कोल्ड स्टोरेज किंवा पश्चिम बंगाल होलसेलर्सकडे पाठविण्यात आले आहे.
झारखंड सरकार करणार चर्चा
पश्चिम बंगालमध्ये बटाट्यांचे दर नियंत्रणात ठेवण्यासठी तेथील सरकारने अन्य राज्यांचा पुरवठा रोखण्याचा आदेश जारी केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांनी लवकरच एक समिती स्थापन करत बटाट्यांच्या पुरवठ्याशी संबंधित विषयावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असल्याचा दावा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला आहे. झारखंड आणि बंगाल दोन्ही राज्यांदरम्यान भाज्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होत असते. पश्चिम बंगाल पूर्ण वर्षात झारखंडची बटाट्याची 60 टक्के मागणी पूर्ण करतो. तर उर्वरित मागणी उत्तरप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि स्थानिक स्वरुपात पूर्ण होते.
उत्तरप्रदेशकडून ओडिशाला पुरवठा
उत्तरप्रदेशातून सोमवारी बटाट्यांनी भरलेले 300 ट्रक ओडिशासाठी रवाना झाले आहेत. यामुळे ओडिशातील बटाट्याचे दर स्थिर होण्याची शक्यता आहे. बटाट्याची खेप ओडिशात पोहोचली आहे. राज्य सरकारने आता उत्तरप्रदेशातून बटाटे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. किरकोळ बाजारात बटाट्याचे दर 35 रुपये प्रतिकिलोपर्यंत नियंत्रित करण्यात आल्याचा दावा ओडिशाच्या मंत्र्याने केला आहे.
बटाटा व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी
राज्य सरकारने अन्य राज्यांना बटाट्यांची विक्री करण्याची अनुमती दिली नाही तर मंगळवारपासून आम्ही संपावर जाऊ असा इशारा पश्चिम बंगालमधील व्यापाऱ्यांनी दिला आहे. पश्चिम बंगाल सरकारने अलिकडेच स्थानिक बाजारांमध्ये किमती नियंत्रित करण्यासाठी शेजारी राज्यांना बटाट्यांचा पुरवठा करण्यावर बंदी घातली आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर पोलिसांनी राज्यातून होणारी बटाट्यांची वाहतूक रोखण्यासाठी आंतरराज्य सीमांवरील देखरेख वाढविली आहे. राज्य सरकारने अचानक निर्णय घेतल्याने आमचे मोठे नुकसान झाले असल्याचा दावा पश्चिम बंगालमधील प्रगतिशील आलू व्यापारी संघाचे सचिव लालू मुखर्जी यांनी केला आहे.
बटाटा ठरला राजकारणाचा विषय
ममता बॅनर्जी सरकार बटाट्याच्या पुरवठ्यावरून राजकारण करत आहे. राज्य सरकार पश्चिम बंगालला बटाट्यांचा पुरवठा पूर्ववत करण्याची विनंती करणार नाही. परंतु पश्चिम बंगालने स्वत:हून बटाट्यांचा पुरवठा केला तर ओडिशा त्याचा स्वीकार करणार आहे. आम्ही बटाट्यासंबंधी ममता बॅनर्जी सरकारशी कुठलीच चर्चा करणार नाही. ममतांनी यापूर्वीच ओडिशाकरता बटाटे पाठविणार नसल्याचे सांगितले आहे, यामुळे त्यांच्याशी चर्चा करणे निरर्थक आहे. कुठल्याही राज्याने भाजी किंवा सामग्रीचा पुरवठा रोखणे योग्य नाही, कारण सर्व राज्ये एका देशाचा हिस्सा आहेत असे ओडिशाच्या मंत्र्याने म्हटले आहे.