For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजकारण पुन्हा 2014 ते 19 च्या चक्रव्युहात!

06:54 AM Feb 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
राजकारण पुन्हा 2014 ते 19 च्या चक्रव्युहात
Advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर घडत असलेल्या घटनांचा मागोवा घेतला तर एकीकडे भाजप सक्षम होत असतानाच राष्ट्रवादी, काँग्रेसची दुर्बळ अवस्था, त्यात शिवसेनेची झालेली गोची आणि 2014 ते 19 या काळात अनेक गिरक्या घेतलेले राजकारण हा सगळा प्रवास भाजप सोडून सर्व राजकीय पक्षांना केवळ पाहत बसावा लागला होता. 2026 मध्ये सुद्धा तेच चक्रव्यूह  निर्माण झाले आहे. केवळ पक्षांची संख्या वाढली आहे, त्यात भाजपचे तीन अवतार (मूळ भाजप, शिवसेना, अ.प. राष्ट्रवादी) मतदारांसमोर आहेत. अशात काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि शरद पवार राष्ट्रवादी पुढील साडेतीन वर्षे कशी तग धरतात यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल.

Advertisement

महाराष्ट्राचे राजकारण नेहमीच देशाच्या राजकीय पटलावर केंद्रबिंदू राहिले आहे. 2014 ते 2019 या काळात ज्या अस्थिरता आणि समीकरणांच्या खेळाने राज्याला वेढले, त्याची पुनरावृत्ती 2026 मध्ये दिसत आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमटलेल्या तरंगाने, महाविकास आघाडी आणि महायुतीच्या खेळात नवे वळण आले आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपच्या वर्चस्वाने 2014 च्या मोदी लाटेची आठवण करून दिली, तर सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाने राजकीय घराण्यांच्या स्वकियांना सोडून जाणाऱ्या राजकारणाची पुनरावृत्ती घडली.

2014-19: युतीचे खेळ आणि फुटीचे डाव

Advertisement

2014 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात असेच वळण आले होते. लोकसभेत भाजपने 23 जागा जिंकल्या, तर विधानसभेत 122 जागांसह ते सर्वात मोठा पक्ष ठरले. निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजप युती तुटली होती, सत्तेसाठी आवश्यक जागा सेनेकडे होत्या मात्र त्यांचा दबदबा वाढू नये म्हणून स्थिरतेच्या बहाण्याने राष्ट्रवादीने भाजप सत्तेला बाहेरून पाठिंबा देऊन सेनेची ताकद कमी केली. त्यावेळचे राजकारण राष्ट्रवादीला आतापर्यंत डाचत आहे. ते इतके की प्रत्येक पावलावर त्यांना त्या निर्णयाचा पश्चात्ताप व्हावा! पण नंतर सेना भाजप नैसर्गिक मित्र म्हणवत एकत्र येत देवेंद्र फडणवीस मजबूत मुख्यमंत्री झाले. हे सरकार विकासाच्या मुद्यावर चालले, पण अंतर्गत कलह, सेनेचे ब्लॅकमेलिंग आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधाने ते अस्थिर राहिले. 2014 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 15 वर्षांच्या सत्तेनंतर हे बदललेले चित्र होते. काँग्रेस 42 जागांवर, राष्ट्रवादी 41 जागांवर घसरली पण दोन्हीतील शत्रुत्व संपले नाही. युतीच्या ब्रेकअपने मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला, ज्याने शिवसेनेची भूमिका केंद्रित झाली. 2019 पर्यंत राजकारण आणखी गुंतागुंतीचे झाले. काँग्रेस, राष्ट्रवादीला अनेक स्वकीय सोडून गेले.  अमित शाहांच्या मध्यस्थीने मातोश्रीच्या बंद खोलीत सत्तेच्या समान विभागणीचे गणित ठरले आणि लोकसभेत भाजप-शिवसेना युतीने 41 जागा जिंकल्या, पण विधानसभेनंतर युती तुटली. भाजप 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी 54, काँग्रेसने 44 जागा जिंकल्या. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी बनवली, ज्याने फडणवीसांचे सरकार गेले. ठाकरे मुख्यमंत्री झाले. हे मविआ सरकार कोविड काळात स्थिर राहिले, पण शिंदे फुटीने ते कोसळले.  नंतर अजित पवारांच्या बंडाने विरोधकांचा पाय आणखी खोलात गेला. 2014-19 मध्ये राजकारण गिरक्या घेतले, युती ते फूट, फूट ते नव्या आघाड्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दुर्बळ झाल्या, तर भाजपने शहरी भागात पकड मजबूत केली. शिवसेनेची गोची आणि मनसेच्या राज ठाकरेंचा प्रभाव कमी होत गेला. या काळात पक्षांची संख्या वाढली, पण मतदारांचा विश्वास डळमळला.

अजित पवारांचा अपघाती अंत आणि राजकीय भूकंप

28 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळ अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला, ज्यात त्यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. दाट धुके आणि तांत्रिक बिघाड कारण सांगितले जात आहे, पण अमोल मिटकरी आणि बजरंग सोनवणे यांनी शंका उपस्थित केल्या. पायलट बद्दल, मृतदेहांची संख्या आणि बॉम्बची शक्यता अशा चर्चेमुळे  चौकशी सुरू झाली. अजित पवार हे राष्ट्रवादीचे किंगमेकर होते; त्यांच्या फुटीने 2023 मध्ये महायुती मजबूत झाली. त्यांच्या मृत्यूने पक्षात पोकळी निर्माण झाली, ज्याने शरद पवार गट आणि अजित गटात विलीनीकरणाच्या चर्चा थांबल्या.  सुनेत्रा पवारांच्या शपथविधीने त्या चर्चा वादात सापडल्या तर अजित पवार पक्षाच्या भाजप जवळच्या नेत्यांच्या दृष्टीने त्या अफवा आहेत.

अजित पवारांच्या मृत्यूने 2014-19 च्या अस्थिरतेची आठवण करून दिली. याकाळात काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) दुर्बळ झाल्या, तर भाजपने महापालिकांमध्ये सत्ता काबीज केली. अजितदादांच्या अनुपस्थितीत दोन्ही राष्ट्रवादीत असलेल्या अनेक मंडळींचा आधार तुटला. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली राजकारण करणारे नेते त्यांना सांभाळून घेतील का? हा प्रश्नच आहे. सुनेत्रा पवारांची निवड ही घराणेशाहीची पुनरावृत्ती आहे पण ती भाजपने मान्य केली आहे.  महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्या प्रसिद्ध झाल्या. राष्ट्रवादीच्या 30 आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला, ज्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदही त्यांच्याकडे येण्याची शक्यता वाढली. पाटलांच्या पक्षात पटेल अध्यक्ष होऊ नयेत हा राज ठाकरेंचा भीम टोला राष्ट्रवादीतील भाजपप्रेमी पटेल, तटकरेंना कायम शह देत राहील.  प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, ज्याने पक्षात एकजूट दाखवली. पण, प्रमुख नेता जिवंत नसताना शरद पवारांना भाजपसोबत येण्याची ठेवलेली अट यामुळे कार्यकर्ते, आमदार मात्र नाराज दिसत आहेत. मात्र त्यांचे ऐकण्या इतका तोही प्रबळ आवाज नाही. दुसरा विरोधही दुर्बळ ठरला तो अंजली दमानियांनी शपथ अवैध असल्याचा दावा केल्याचा. तटकरेंनी त्याला खोडून काढले.

सुनेत्रा पवारांची भूमिका

2014-19 मध्ये  पवार कुटुंबाने राष्ट्रवादी सांभाळली, आता सुनेत्रा पवार  अजितदादांचा वारसा चालवत आहेत. रोहित पवारांनी घेतलेली भेट, शरद पवार आणि अजित पवारांच्या पुत्रांची भेट, सहयोग सोसायटीत कुटुंबाची एकजूट दाखवली. या कुटुंबाला वेगळे केल्याबद्दल जयंत पाटलांनी भाजपला दोष दिला. तर सुनेत्रा पवारांनी विदीप जाधवांच्या कुटुंबाला तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला भेट देऊन आपण आजही त्याच विचाराचे असल्याचे दाखवले. मात्र ही भूमिका त्या किती काळ सांभाळणार हा प्रश्नच आहे.  तरीही या कृतीने त्यांची प्रतिमा मजबूत झाली.

भाजपचा स्वयं घोषित ‘महाविजय’

15 जानेवारीला राज्यात 29 महापालिकांसाठी मतदान झाले, 16 जानेवारीला निकाल लागले. भाजपने 1400 जागा जिंकल्या, महायुतीने 24 महापालिकांमध्ये सत्ता मिळवली. मुंबईत भाजप 89, शिंदे सेना 29, उद्धव सेना 65 जागा. पुणे, ठाणे, नाशिकमध्येही महायुतीचे वर्चस्व. काँग्रेसने चंद्रपूर, लातूर जिंकले,  मुंबईत मनसे 6 जागांवर विजयी झाला. हे निकाल 2014 च्या विधानसभेसारखे आहेत. पण भाजपचा हा कथित महाविजय त्यांना शंभर टक्के यश मिळालेले नाही हे स्पष्ट दाखवतो. तरीही भाजपने शहरी भाग काबीज केलाय याचे यश देवेंद्र फडणवीस यांना आहेच. पण 2014 ला त्यांची जी स्थिती होती तशीच या निकालाचीही आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी अधिक घसरलेत. 2019 च्या  सारखी आघाडी 2026 मध्ये दिसली नाही; उलट भाजपचे तीन ‘अवतार’ (भाजप, शिंदे सेना, अजित राष्ट्रवादी) मतदारांसमोर आलेत. त्यामुळे यांच्यातील कोणाची मते कमी होणार की ते विरोधकांना फोडून त्यांची मते खाणार हे साडेतीन वर्षांनीच दिसेल. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), मनसे आणि शरद पवार राष्ट्रवादी हेही पुढची साडेतीन वर्षे कशी काढतात, हे महत्त्वाचे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवारांनी पक्ष सांभाळला, पण महापालिका निकालाने भाजपचा वरचष्मा दाखवला. जिल्हा परिषद निकालात काय होते ते पाहायचे. 2026 मध्ये 2014-19 सारखी परिस्थिती आहे. भाजप मजबूत, इतर पक्ष दुर्बळ. सुनेत्रा पवारांच्या भूमिकेने राष्ट्रवादी टिकेल, पण शरद पवार गटाशी विलीनीकरणाच्या चर्चाच थांबल्या. काँग्रेस आणि शिवसेनेची गोची कायम आहे. मनसे कमी प्रभावी झाली आहे. साडेतीन वर्षांत हे पक्ष पुनरुज्जीवित होऊ शकतील का? हे पाहावे लागेल.

शिवराज काटकर

Advertisement
Tags :

.