For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अयोध्या बलात्कार प्रकरणी राजकारण

06:07 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
अयोध्या बलात्कार प्रकरणी राजकारण
Advertisement

वृत्तसंस्था / अयोध्या

Advertisement

अयोध्येत एका 12 वर्षांच्या बालिकेवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणावर आता राजकारणाला प्रारंभ झाला आहे. या प्रकरणातील आरोपी समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते असून त्यांची नावे मोईद खान आणि राजू खान अशी आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे. मोईद खान हा पूर्वी धार्मिक दंगली भडकविण्याच्या प्रकरणातही आरोपी होता. या आरोपींची डीएनए चाचणी केली जावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्षाने यादव यांच्यावर आरोपींना छुपे समर्थन दिल्याचा आरोप करतानाच, मुस्लीमांच्या लांगुलचालनाचाही आरोप केला आहे.

ही भीषण घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. या आरोपींनी या बालिकेशी दुष्कर्म करताना त्याची व्हिडीओग्राफीही केली. या व्हिडीओच्या साहाय्याने बालिकेला ब्लॅकमेल करण्यात येत होते. दोन महिन्यांनी ही बालिका गर्भवती झाल्यामुळे आरोपींचे बिंग बाहेर पडले. बालिकेने आणि तिच्या आईने आरोपींविरोधात तक्रार सादर केल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

Advertisement

मुख्यमंत्र्यांची घोषणा

या कूर घटनेचे पडसाद उत्तर प्रदेश विधानसभेतही उमटले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरोपींना धडा शिकविण्याची घोषणा केली. या आरोपींवर आर्थिक भ्रष्टाचार केल्याचीही प्रकरणे असून त्यांची मालमत्तेवर बुलडोझर चालविला जाईल, असे वक्तव्य त्यांनी विधानसभेत केले. भारतीय जनता पक्षाचे मंत्री संजय राजभर यांनी आरोपींवर त्वरित अभियोग चालवावा अशी मागणी केली.

मायावती संतप्त

या बलात्कार प्रकरणावर बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या आरोपीविरोधात त्वरीत अभियोग सादर करुन त्यांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी उत्तर प्रदेश सरकारकडे केली. मतपेटीचे महत्व लक्षात घेऊन समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी या प्रकरणी सौम्य धोरण स्वीकारल्याचे दिसून येते, असा आरोपही त्यांनी केला.

किती आरोपींची डीएनए घेतली?

आरोपींची डीएनए चाचणी करावी या अखिलेश यादव यांच्या सूचनेवर भारतीय जनता पक्षाने जोरदार टीका केली आहे. 2012 ते 2017 या काळात अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळात अनेक बलात्कार प्रकरणे घडली. त्यावेळी किती आरोपींची डीएनए चाचणी झाली होती ? असा खोचक प्रश्न या पक्षाने विचारला आहे. यादव या प्रकरणात आरोपींसंबंधी बोटचेपे धोरण स्वीकारीत आहेत, कारण त्यांचे एकगठ्ठा मतांवर प्रेम आहे. काँग्रेसनेही या प्रकरणी मीठाची गुळणी धरली आहे, असा हल्लाबोल या पक्षाने सोमवारी केला.

Advertisement
Tags :

.