आंबेडकरांच्या उल्लेखावरून राजकारण तापले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात, अमित शहांच्या विधानावर काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सतत अपमान केला आहे. अनेक पापे या पक्षाने या महामानवाविरोधात केली आहेत. आज पराभव झाल्यानंतर त्यांना आंबेडकरांची आठवण येते. त्यांचे आंबेडकरांवरचे आणि दलितांवरचे प्रेम बेगडी आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत पेलेल्या एका विधानावर काँग्रेसने गदारोळ माजविण्यास प्रारंभ केला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला धारेवर धरले आहे. काँग्रेसने अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून देशभरात निदर्शने करण्याची तयारी सुरू केली आहे. तर अमित शहा यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळून लावत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काँग्रेसचे लोक आज 100 वेळा आंबेडकरांचे नाव घेतात. आज त्यांना त्यांची आठवण येत आहे. एवढ्या वेळा काँग्रेस नेत्यांनी देवाचे नाव घेतले असते, तर ते सात वेळा स्वर्गाला गेले असते, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत घटनेवरील चर्चेला उत्तर देताना केले होते. या त्यांच्या विधानावर काँग्रेसने गदारोळ माजविला आहे. अमित शहा यांनी आंबेडकरांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. काँग्रेसच्या खासदारांनी संसदेबाहेर आंबेडकरांची छायाचित्रे हाती घेऊन निदर्शनेही केली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने आंबेडकरांवर कसा आणि कोणत्या प्रसंगांमध्ये अन्याय केला, त्याची सूचीच देऊन काँग्रेसची या संदर्भात दुटप्पी चाल असल्याचे प्रतिपादन केले.
संसदेचे कामकाज स्थगित
अमित शहा यांच्या विधानावरून काँग्रेसने संसदेत बुधवारी मोठा गोंधळ घातला. इतर विरोधी पक्षांनीही शहा यांच्या विधानाचा निषेध केला. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज प्रथम दुपारी 2 पर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. राज्यसभेत काँग्रेसच्या वर्तणुकीसंबंधी अध्यक्ष जगदीप धनखड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भारतीय जनता पक्षानेही काँग्रेस सभागृहाचे कामकाज बंद पाडण्यासाठी खोटी निमित्ते शोधत असल्याची टीका केली. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर अनेक आरोप-प्रत्यारोप केले.
काँग्रेसचा आंबेडकरविरोध
काँग्रेसने सातत्याने डॉ. आंबेडकरांवर अन्याय केला. दोन वेळा काँग्रेसने त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी कारस्थाने केली. काँग्रेसच्या या कारस्थानांमुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कधीही भारताच्या संसदेचे सदस्य होऊ शकले नाहीत. काँग्रेसने त्यांचा पराभव केला नसता तर घटनाकार आंबेडकरांना संसदेचे लोकांमधून निवडून आलेले सदस्य होण्याचा मान मिळाला असता. काँग्रेसने त्यांना ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कारही दिला नाही. त्यांची लोकप्रियता वाढू नये, यासाठी काँग्रेसने सातत्याने प्रयत्न केले. आज मतांची आवश्यकता भासू लागल्यानंतर त्यांची या पक्षाला आठवण होत आहे. पण लोकांनी काँग्रेसचा हा कावा ओळखला आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
किरण रिजीजू यांचाही हल्लाबोल
भारतीय जनता पक्षाने नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केला आहे. मी स्वत: भारताचा पहिला नवबौद्ध कायदामंत्री आहे. या पदावर माझी नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आज काँग्रेसचा सर्वत्र सातत्याने पराभव होत असल्याने हा पक्ष मतांसाठी आंबेडकरांच्या नावाचा दुरुपयोग करीत आहे. त्यांच्या नावाचा उपयोग करुन काँग्रेसने सातत्याने लोकांची फसवणूक केली. आंबेडकरांचा समावेश 1947 मध्ये स्थापन झालेल्या नियुक्त सरकारमध्ये करण्यात आला होता. तथापि काँग्रेसच्या धोरणांना विरोध करत त्यांनी 1951 मध्ये पदत्याग केला. या घटनेनंतर तब्बल 71 वर्षांनी माझ्या रुपाने एका नवबौद्ध खासदाराची नियुक्ती कायदामंत्रीपदी करण्यात आली आहे. काँग्रेसने कधीच हा सन्मान दिला नाही, अशी बोचरी टीका केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजीजू यांनी केली.
काँग्रेसचे सवंग राजकारण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पुढे करुन काँग्रेस सवंग राजकारण करीत आहे, अशी टीका संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी केली आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात काँग्रेसने सतत त्यांची बदनामी केली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा सतत सन्मान केला. आम्ही त्यांचे महत्व ओळखले आहे. भारताच्या जडणघडणीत त्यांचे योगदान किती मोलाचे आहे, हे काँग्रेसने कधीच अधोरेखित केले नाही. राजकारण आणि सत्ताकारण त्यासाठी आडवे आले. तथापि, भारतीय जनता पक्षाने त्यांचा यथोचित सन्मान केला, असे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रकरण नेमके काय आहे...
मंगळवारी राज्यसभेत घटनेवरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकरांची प्रशंसा करणारी आणि काँग्रेसने त्यांना नेहमीच कसे अपमानित केले, याची अनेक उदाहरणे दिली होती. याच ओघात त्यांनी आज काँग्रेस जितक्यावेळा सत्तास्वार्थासाठी आंबेडकरांचे नाव घेते, तितके देवाचे घेतले असते काँग्रेस नेत्यांना स्वर्गप्राप्ती झाली असती, असे विधान केले. हे विधान डॉ. आंबेडकरांचा आणि त्यांनी लिहिलेल्या घटनेचा अवमान करणारे आहे, असा काँग्रेसचा आरोप आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाने हा आरोप फेटाळला आहे.
शहांच्या राजीनाम्याची खर्गेंकडून मागणी
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे गृहमंत्री अमित शहा यांना मध्यरात्री 12 पूर्वी बडतर्फ करण्याची मागणी केली. शहा यांनी राजीनामा द्यायला हवा असे ते म्हणाले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघेही एकमेकांच्या पापांचा आणि शब्दांचा बचाव करतात, असा आरोप त्यांनी केला.
अमित शहांचा खर्गेंवर प्रतिहल्ला
गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत राज्यसभेत आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. ‘संसदेतील चर्चा तथ्य आणि सत्यावर आधारित असावी. भाजपच्या सदस्यांनीही तेच केले. काँग्रेस हा आंबेडकरविरोधी, आरक्षणविरोधी, संविधानविरोधी आहे, हे सिद्ध झाल्यावर काँग्रेसने जुनीच रणनीती स्वीकारून विधानांचा विपर्यास सुरू केला’, असे ते म्हणाले. खर्गेजी राजीनामा मागत आहेत, त्यांना आनंद होत आहे म्हणून कदाचित मी देईन पण त्याचा फायदा होणार नाही. आता 15 वर्षे ते जिथे आहेत तिथेच बसावे लागेल, माझ्या राजीनाम्याने त्यांना काही फायदा होणार नाही, असेही ते म्हणाले.