रवी नंतरचे राजकारण...!
फोंडा मतदारसंघाचे आमदार व कृषीमंत्री रवी नाईक यांना जाऊन वीस दिवस झाले. त्यांची रिक्त जागा भरण्यासाठी सध्या फोंड्यात जोरदार सत्तास्पर्धा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीला जेमतेम दीड वर्षांचा कालावधी असताना त्यांनी अचानक एक्झिट घेतली. रवी नाईक हे गेली चाळीस वर्षे गोव्याच्या राजकारणात सक्रियपणे आपला प्रभाव राखून होते. आमदार, माजी मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री अशी सर्वोच्च राजकीय पदे त्यांनी भूषविली. राजकीय डावपेच आखताना भल्याभल्यांना चकवा दिला. मनातील राजकीय आराखड्यांचा कधीच कुणाला थांगपत्ता लागू दिला नाही. शेवटच्या क्षणीही अशीच सर्वांना हुलकावणी दिली. शहरातील सर्व गोंगाट शांत झालेला असताना, प्रसार माध्यमांचे दिवसाचे काम आटोपलेले व सोशल मीडियाही निवांत असताना त्यांनी सर्वांना गाफिल ठेवत अखेरचा श्वास घेतला.
रवी नाईक यांच्यासारख्या दिलखुलास नेत्यामुळे गोव्याच्या राजकारणात वेगळी रंगत होती. त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रातीलही रया गेल्याची भावना व्यक्त होत आहे. भंडारी समाजाचे आधारस्तंभ आणि बहुजन समाजाचे लोकनेते म्हणून त्यांना वेगळे स्थान व महत्त्व होते. त्यांच्या जाण्याने फोंड्यातील आमदारकीची जागाच रिक्त झाली नसून गोव्याच्या राजकीय क्षेत्रातही एक मोठे अवकाश रिते झाले आहे.
राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानंतर बहुजनांचा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. ही जागा त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या आणि व्यापक लोकसंपर्काच्या बळावर मिळविली होती. योगायोग म्हणजे स्व. भाऊसाहेब बांदोडकर, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, रापणकारांचे आवाज असलेले माजी मंत्री माथानी साल्ढाणा व मंत्री रवी नाईक हे नेते सत्तास्थानी असताना निधन पावले. राजकारणात होते म्हणून ते नेते नव्हते तर लोकनेते म्हणून त्यांना जनाधार होता. भाऊसाहेब बांदोडकरानंतर राज्यातील कष्टकरी व खालच्या स्तरातील जनतेसाठी कुळ-मुंडकारांचे प्रश्न घेऊन लढलेल्या रवी नाईक यांनी भाटकारशाहीपुढे आव्हान उभे केले. त्यामुळेच अनेक पिढ्यांपासून सोसत आलेल्या सामाजिक अन्यायाविरोधात उभे ठाकलेले रवी नाईक सर्वसामान्यांना आपले वाटले. लोकांना सहज जवळ करणारे व लोकांची भाषा बोलणारे तळागाळातील जनेतेचे ते आवाज बनले. त्यांचे हे नेतृत्व तत्कालीन सामाजिक संघर्षातून उभे राहिले म्हणून सर्वसमावेशक व सर्वमान्य ठरले.
रवी नाईक यांच्या जाण्याने एका राजकीय पर्वाचा अस्त झालेला आहे. हे केवळ बोलण्यापुरते नसून ते परिस्थितीशी सुसंगत आहे. तब्बल 50 वर्षे राजकारणात असलेले रवी नाईक आमदार व मंत्री म्हणून साधारण 40 वर्षे सक्रिय होते. फोंड्याच्या विकासाचा पाया घालतानाच त्यावर कळस चढविण्याचे कामही त्यांनी या राजकीय कारकिर्दीत केले. त्यांच्याशिवाय येथील राजकारणाचा विचारच होऊ शकत नव्हता, एवढे अढळस्थान त्यांनी निर्माण केले होते. आज त्यांच्यानंतर फोंड्यातील राजकारण कूस बदलण्याच्या निर्णायक टप्प्यावर आले आहे.
गोव्याच्या राजकारणावरही त्याचे परिणाम दिसून येतील. ज्या भाजपाचे आमदार म्हणून ते या कार्यकाळात सत्तेवर होते, त्याच पक्षातून त्यांचे राजकीय वारसदार व पुढील आमदार म्हणून सर्वांत मोठी सत्ता स्पर्धा सुरू झाली आहे. त्याची नांदी अंत्ययात्रेच्यावेळीच सुरू झाल्याचे दबक्या आवाजात कानावर पडत होती. अंत्ययात्रेच्या शोकसभेत भंडारी समाजातील काही नेत्यांनी रवी नाईक यांच्या मुलांना पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्याची जाहीर मागणी करीत, या चर्चेला तोंड फोडले. आता इतर इच्छुकांनीही आपली दावेदारी जाहीरपणे मांडली आहे. भाजपानंतर अन्य प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्यांनीही आपली महत्त्वकांक्षा गुंडाळून ठेवण्यास अजिबात वेळ केला नाही. पोटनिवडणुकीला अजून वेळ आहे पण रवी नाईक यांच्या राजकीय वारशासाठी राजकीय डावपेच जोरात सुरू आहेत.
रवी नाईक यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत विविध राजकीय पक्षांमधून कार्य केले. मागील निवडणुकीत अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करीत निसटता विजय मिळविला आणि फोंडा मतदारसंघात पहिल्यांदा कमळ फुलले मात्र उतारवयाकडे झुकताना भाजपमध्ये येण्याची त्यांची अपरिहार्यता दिसत होती. ही तडजोड आपले राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी किंवा राजकीय क्षेत्रात आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी असावी. 40 वर्षे रवी नाईक यांच्याभोवतीच फिरणारे फोंड्यातील राजकारणात नवीन नेतृत्वाला संधी देणारा एक बदल होऊ घातलेला आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांचा उत्तराधिकारी म्हणून मुलाला संधी न देता डावलण्यात आले. माथानी साल्ढाणा यांच्यावेळची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी पर्रीकर हयात होते व त्यांनी स्वत:च पुढाकार घेऊन माथानी यांच्या पत्नी एलिना साल्ढाणा यांना उमेदवारी दिली व बिनविरोध निवडूनही आणले. आज भाजपामाध्ये सर्व निर्णय केंद्रीय स्तरावर होतात. त्यात रवी नाईक यांच्या मुलांना कितपत संधी आहे? एका मोठ्या समाजाला बगल देऊन भाजपा अन्य पर्याय निवडणार काय? पर्रीकरांच्या मुलाला उमेदवारी नाकारण्यामागे विविध कारणे होती. शिवाय पर्रीकर व रवी यांच्या नेतृत्वाची पार्श्वभूमीही पूर्णपणे वेगळी आहे. त्यामागे एका मोठ्या समाजाच्या भावनेला आणि मतांच्या गणितालाही वेगळे राजकीय महत्त्व आहे.
इच्छुकांची महत्त्वकांक्षा वाढत आहे. रिक्त जागेमध्ये केवळ एका आमदाराची निवड करायची नसून एका नेतृत्वाला संधी देण्याची ही वेळ आहे. रिक्त असलेले आमदारकीचे पद भरून काढणे सहज शक्य आहे पण तेवढ्या उंचीचा व सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या एका नेत्याची जागा भरून काढणे शक्य आहे का....? फोंड्यातील जनतेला एका ‘पात्रांव’ची आणि बहुजनांना लोकनेत्याची गरज आहे!
सदानंद सतरकर