राजकीय वारे फिरले
मकर संक्रांत आता मागे पडली, तीळगुळ वाटणे हा सहजभाव संपून तो आता राजकीय मंडळींनी इव्हेट बनवला आहे. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी मंत्रालयात जाऊन आठ दहा मंत्र्यांना तिळगुळ वाटला व सांगलीचा रखडलेला विकास पक्षविचार बाजूला ठेवून साधावा असे या मंत्र्यांना सांगितले व तसे आश्वासन मिळवले. भाजप हा मुंबई महापालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीवर नजर ठेऊन कामाला लागला आहे. ‘पंचायत से पार्लमेंट तक’ अशी भाजपाची रणनीती आहे आणि भाजपाच्या शिर्डी अधिवेशनात अमित शहा यांनी ती बोलून दाखवली. शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष करत जनतेने निवडून दिलेले युतीचे राज्य या दगाबाज मंडळींनी पाडले व पाठीत खंजीर खुपसला असे म्हटले. शरद पवार यांची सन 78 पासूनचे दगाबाज राजकारण मतदारांनी दोनशे फूट जमिनीत गाडले व महायुतीला महाविजय दिला, यासाठी जनतेचे, कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले व ‘पार्लमेंट से पंचायत तक’ हे टार्गेट बोलून दाखवले या अधिवेशनानंतर राज्यातील राजकारणाचे वारे बदलले आहे. दिशा स्पष्ट झाली आहे. शरद पवार यांचा वाढदिवसानंतर सुरु झालेल्या ठाकरे, पवार भाजपा संघर्षात या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून महाविकास आघाडीत फुटाफूट, वाद दिसू लागले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आपण मुंबई महापालिका स्वतंत्र लढवणार असे म्हटले आहे तर काँग्रेसनेही श•t मारला आहे. शरद पवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गुणगान गाऊ लागले आहेत पण अमित शहा यांची टीका शरद पवारांना चांगलीच झोंबली आहे. तडीपार गृहमंत्री असा उल्लेख करत पवारांनी शहा यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. शहाच्या या घणाघाती टीकेने महाराष्ट्रातील राजकीय वारे पूर्ण बदलले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्याकडे खासदार संख्या बरी आहे हे खासदार ‘एनडीए’मध्ये सामील झाले तर भाजप आघाडी सरकार बळकट होणार आहे. त्यासाठी होत असलेल्या भेटीगाठी आणि अग्रलेखातून स्तुतीसुमने यांची चर्चा होती. शरद पवार संक्रांतीला तीळगुळ वाटणार असे वारे वाहत होते पण अमित शहा यांनी जो राग आळवला तो या सर्व शक्यता मोडीत काढणाऱ्या ठरल्या. राष्ट्रवादी शरद पवार गटातील अंतर्गत चांगले वातावरण नाही, विधानसभा निवडणूक निकाल आणि जयंत पाटील यांचे व्यक्तिमत्त्व याचे दाखले देत नवा प्रदेश अध्यक्ष निवडा तो मराठा नको अशी जाहीर मागणी झाली आहे. शरद पवारांनी निवडणूक प्रचारा दरम्यान जयंत पाटील महत्त्वाचे नेते आहेत, त्यांना मोठी जबाबदारी देणार असे म्हटले होते. तेव्हाच राजकीय अभ्यासकांनी भुवया उंचावल्या होत्या. शरद पवारांना भाकरी फिरवायची आहे. रोहित पवार आणि रोहित आर आर पाटील यासह तरुणांना पक्ष संघटनेत संधी द्यायची आहे. त्यामुळे या गटात राजी-नाराजी सुरू आहे. काही मंडळी अजितदादा पवार यांच्या संपर्कात आहेत. पण म्हैस पाण्यात आहे. काँग्रेसची आणि इंडी आघाडीत बरे वातावरण नाही. इंडी आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी यांचेकडे सोपवावे अशी मागणी होते आहे. ठाकरेची शिवसेनाही अस्तित्वाची लढाई लढताना दिसते आहे. मुंबई महापालिका ताब्यातून गेली तर ठाकरे व त्यांचा पक्ष अडचणीत येणार हे वेगळे सांगायला नको. अजितदादा धनंजय मुंडेमुळे राजकीय अडचणीत आहेत तर एकनाथ शिंदे शांत असले तरी गप्प नाहीत. बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीवरून उद्धव ठाकरे यांना दूर करा अशी त्यांनी मागणी केली आहे. जरांगे विधानसभा निवडणुकीत महायुतीचा महाविजय बघून पुन्हा अॅक्टिव्ह झाले आहेत. मोर्चे, आंदोलन, इशारे, फडणवीस यांच्यावर चिखलफेक पुन्हा सुरु झाली आहे. एकुणच भक्कम सरकार येऊनही राजकारणात संयम, सहकार्य, संवाद आणि लोककल्याणासाठी पावले पडताना दिसत नाहीत. फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाला हिरवा कंदील दाखवला आहे. या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून विरोधी सूर आळवला जातो आहे. संपादित जमिनीला रेडी रेकनर पेक्षा तिप्पट भरपाई देणेस शासन तयार आहे पण रेडी रेकनर दर कमी आहे, शेती आणि शेतकरी यांचे वाटोळे करुन नको असलेले महामार्ग उभारु देणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे. शक्ती पिठ महामार्गामुळे डाव्या व कडव्या विचारांच्या नेत्यांना एक विषय मिळाला आहे. सरकारने हा महामार्ग नको असेल तर थोडा बाजूने पुढं नेण्याची तयारी सुरू केली आहे. हा विषय तापणार असे संकेत आहेत. थोडक्यात संक्रांत झाली. तीळगुळ वाटला पण राजकीय घोडी जागच्या जागी दुडक्याचालीने लाथा झाडतांना दिसत आहेत. संजय राऊत यांची ब्रेकफास्ट पत्रकार परिषद पुन्हा सुरु झाली आहे. रुपया आणि शेअर बाजार घसरतो आहे आणि सरकारला आता केंद्रीय बजेटचे वेध लागले आहेत. तूर्त शहा यांच्या शिर्डी भाषणाने तीळगुळ वाटप गोड झाले असे दिसत नाही. मुंबई महापालिका निवडणुकांच्या हालचाली सुरु झाल्या असून त्याचे वेध आता महाआघाडी व महायुती यांना लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मुंबईत एकट्याने लढणार असल्याचे वक्तव्य केले आहे. त्याचे काय होते, हे पाहावे लागेल. याबाबतीत काँग्रेस, शरद पवार यांची भूमिका काय असेल हेही कालानुरुप कळेल. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी घमासान होणार, रुसवे राग-लोभ उफाळून येणार, हेही ओघाने आलेच. उद्धव ठाकरे यांची शिवसेना अस्तित्वासाठी शर्थीचे प्रयत्न करणार आहे. या दरम्यान फोडाफोडीचे राजकारण बहरात येणार, हे उघड आहे. देवाभाऊ पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार, सर्व हिशोब पूर्ण करण्यासाठी खेळी खेळणार हे वेगळे सांगायला नको. नव्हे त्यासाठी पावले पडू लागली आहेत. पवार ठाकरे भाजपाच्या संपर्कात मंत्रीमंडळातील एक महत्त्वाची खुर्ची त्यासाठी राखून ठेवली जाते. या व अशा वार्ता शक्यता पूर्णपणे मागे पडल्या आहेत आणि महाराष्ट्राचे राजकीय वारे पूर्णांशाने फिरले आहे.