For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवीन वर्षात राजकीय उलथापालथ?

06:17 AM Dec 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
नवीन वर्षात राजकीय उलथापालथ
Advertisement

नवीन वर्षाची चाहूल होत असतानाच देशातील आणि विविध राज्यातील राजकारण हळूहळू बदलू लागले आहे. नवनवीन प्यादी पुढे केली जात आहेत. कोण सोंगट्या आहेत, कोण सोंगाडे आणि कोण खरोखरीचे नेते बनतील ते येत्या काळात दिसेल. राजकारणात फसव्या चाली बऱ्याच. जायचे एकीकडे असते पण गाडी दुसरीकडे चालली आहे असे दाखवले जाते. कोणाकोणाकरता नवीन वर्ष हे दिवाळी ठरणार आणि कोणाकरता शिमगा याविषयी उलटसुलट चर्चा सुरु आहे.

Advertisement

जर राजकीय वर्तुळातील चर्चा खरी मानली तर घाऊक स्वरूपाचे बदल होणार आहेत. भल्याभल्याना नारळ दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवीन वर्षात कोणाकोणाचा ‘कार्यक्रम’ करायचा हे पद्धतीशीरपणे ठरवले जात आहे/ गेलेले आहे. भाजपमधील सर्वात ज्येष्ठ असलेले संघटन सचिव बी. एल. संतोष यांचे स्थान डळमळीत झाले आहे तसेच पंतप्रधान कार्यालयात काही महत्त्वाचे बदल घडवले जाणार आहेत, असे बोलले जात आहे.

नितीन नबीन या एका तरुण नेत्याला भाजपचा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनवून सत्ताधारी पक्षाने एक खेळी खेळलेली आहे. बिहारबाहेर फारसे माहित नसलेले नबीन यांना जे. पी. न•ा यांचा वारस बनवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी संघटनेवर आपली मांड पक्की आहे, असे दाखवले आहे. जे. पी. न•ा यांच्यासारखे नबीन देखील पंतप्रधानांचे पूर्वीपासूनचे भक्त म्हणून ओळखले जातात अशी पाटण्याहून वृत्ते आहेत.

Advertisement

लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत न मिळाल्याने काहीसा आक्रमक झालेला संघ मोदी यांच्या बिहारमधील विजयाने थंड झालेला आहे, असे दिसत आहे. संघावर विसंबून आपल्याला पुढे नेण्याची स्वप्ने बघत असलेल्या काही नेत्यांचा त्यामुळे केवळ हिरेमोडच होणार नसून त्यातील काहींना मार्गदर्शक मंडळात पाठवण्याची तयारी सुरु झालेली आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केलेला आणि संघाशी जोडलेल्या परिवारातून आलेल्या नितीन नबीनची निवड करून नागपूरला देखील शांत करण्याचे राजकारण केले गेलेले आहे, असे दिसत आहे. कायस्थ समाजातील असलेले नितीन नबीन हे 45 वर्षाचे असल्याने त्यांना पक्षात अग्रेसर करून मोदी-शाह हे नवीन पिढीला पुढे आणू इच्छितात, असा दावा केला जात आहे आणि तो खरा मानला तर पक्षात आणि सरकारात बरेच शिरकाण होऊ शकते, असे मानणे चुकीचे ठरणार नाही. बिहारमधील रवी शंकर प्रसाद यांच्यासारख्या जुन्या नेत्यांना मग कठीण दिवस येणार, असे बोलले जात आहे. याउलट पंतप्रधानांच्या जवळचे समजले जाणारे माहिती आणि नभोवाणी मंत्री अश्विनी वैष्णव यांचे महत्त्व वाढणार आहे.

भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष असला तरी त्याच्या अंतर्गत काय चालले आहे त्याचे पक्षातल्या तसेच बाहेरच्यांना फारसे ज्ञान नसते आणि हे ज्ञान होऊही दिले जात नाही. जोपर्यंत गृहमंत्री अथवा त्यांच्या विश्वासातील कोणी अनौपचारिकपणे मीडियातील ठराविक लोकांशी बोलत नाहीत तोवर सगळेच अंधारात असतात. नवीन भाजप कार्यकारी अध्यक्ष आणून भाजपने एकीकडे उत्तरेकडील उच्च जातींना खूष केलेले आहे. आमच्याकडे नवीन नेतृत्व आणि ते देखील बिहारचे आहे असे सांगून नितीश कुमार यांना देखील एक संदेश दिला गेलेला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केलेला आणि संघाशी जोडलेल्या परिवारातून आलेल्या या नेत्याची निवड करून नागपूरलादेखील शांत करण्याचे राजकारण केले गेलेले आहे. ही निवड कोणी आणि कशी केली हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे आणि ते तसेच राहणार आहे. मोदी आणि शाह यांची पक्षावरील पकड ही अजिबात कमी झालेली नाही, असे ही नेमणूक दाखवते. मोदींचे कट्टर विरोधक समजले जाणारे संजय जोशी यांचा वनवास संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.

राजस्थानात वसुंधरा राजे यांना बाद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राजे यांच्या प्रभावक्षेत्रात झालेल्या एका पोटनिवडणुकीत भाजपचा झालेल्या पराभवाचा परिणाम मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचे स्थान मजबूत करण्यात झालेला आहे, असे बोलले जात आहे. मध्यप्रदेशात शिवराज सिंग चौहान यांना कमजोर करण्याचे काम सुरु झालेले आहे. महाराष्ट्रातील राजकारणात नितीन गडकरी यांचे स्थान केवळ नागपूरपर्यंत मर्यादित राहील याची खबरदारी घेतली जात आहे.

येतं नवं वर्ष उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकरता देखील आव्हानाचे जाणार आहे. उत्तरप्रदेशमध्ये 2027च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री योगी यांना नवीन डोकेदुखी निर्माण करण्यात आलेली आहे, योगींचे विरोधक म्हणून उत्तर प्रदेशच्या राजकारणात जाणले गेलेले केंद्रीय मंत्री पंकज चौधरी यांना राज्यातील नवीन भाजप अध्यक्ष बनवून मुख्यमंत्र्यांवर चाप लावण्याचे राजकारण सुरु केले गेलेले आहे. ‘विहिरीतल्या एका बेडकाला समुद्रात सोडण्यात आले आहे’, अशा प्रकारची एका योगी समर्थकाची जळजळीत प्रतिक्रिया खूप काही बोलून जाते. योगी हे अतिशय महत्वकांक्षी असल्याने त्यांना आत्ताच रोखले नाही तर त्यांची मजल नवी दिल्लीपर्यंत जाईल ही भीती मोदी-शाह यांना वाटते.

नवीन वर्षात सरकार आणि विरोधी पक्षातील संघर्षांत वाढ होणार, अशी चिन्हे देखील दिसू लागली आहेत. ज्याप्रकारे नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काही वादग्रस्त विधेयके सरकारने एक प्रकारे जोर जबरदस्तीने पारित करून घेतली आहेत त्याने भाजप आणि विरोधक यातील तणाव केवळ वाढणारच नव्हे तर विरोधी पक्ष रस्त्यावर उतरण्याची देखील शक्यता आहे. मनरेगाच्या ऐवजी जे नवीन जी राम जी विधेयक पारीत करण्यात आलेले आहे त्याने राज्य सरकारांना ती योजना राबवण्याकरता जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. अगोदरच केंद्राच्या भूमिकेमुळे राज्यांकडे संसाधने कमी होत आहेत, अशी विरोधकांची ओरड सुरु आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकने विरोधात घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. काँग्रेसमधील एक गट तर हा मुद्दा व्होट चोरीपेक्षा जास्त लोकांना भिडणारा आहे, असे सांगतआहे.

भाजपमध्ये प्रचंड उलथापालथ होणार अशी वृत्ते असताना विरोधी पक्षात देखील नवीन हालचाली सुरु झालेल्या आहेत. दिल्ली, हरियाणा आणि बिहारमध्ये हारले असले तरी ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ या त्वेषाने परत काम सुरु झालेले आहे. गेल्या आठवड्यात प्रशांत किशोर यांनी प्रियंका गांधी यांची घेतलेली भेट याकरता महत्त्वाची आहे. या भेटीबाबत उलटसुलट वृत्ते आहेत. बिहारमध्ये त्यांच्या जनसुराज पक्षाचे झालेले पानिपत बघून काँग्रेसला साथ देत प्रशांत हे नवीन राजकारण खेळू इच्छित आहेत, असे भासते आहे.

नुकतीच राजधानीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर काँग्रेसने व्होट चोरीच्या मुद्यांवर मोठी रॅली करून आपले घर नीट लावण्याचा प्रयत्न सुरु केला आहे, असे भासवले. पंजाबमधील माजी प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंग सिद्धू यांच्या वाचाळ बायकोला एका वादग्रस्त वक्तव्यानंतर ताबडतोब निलंबित करून काँग्रेस श्रेष्ठींनी बेशिस्तीवर बडगा उचलला जाईल याचे स्पष्ट संकेत दिले. या कारवाईनंतर नवलच घडले. काँग्रेस श्रेष्ठींचे कौतुक भाजपमध्ये गेलेल्या माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी ‘काँग्रेसमध्ये जे स्वातंत्र्य आहे ते भाजपमध्ये नाही. भाजपमध्ये फारशी चर्चाच होत नाही आणि निर्णय होतात’, असे जाहीरपणे सांगून अमरिंदर यांनी भाजपची कानउघाडणी केली. पंजाबमध्ये वारे बदलत आहे याचेच हे प्रतीक होय.

लवकरच अमेरिकेत एक अतिशय वादग्रस्त आणि बदनाम झालेला मोठा उद्योजक जेफरे एपस्टाईनच्या संबंधीची फाईल अधिकृतरीत्या रिलीज केली जाणार आहे. त्याने केवळ अमेरिकेच्या नव्हे तर बऱ्याच देशांच्या राजकारणात वादळ माजू शकते अशी जोरदार चर्चा ऐकू येत आहे, या फाईलचे राजकीय पडसाद भारतातदेखील उमटू शकतात असे देखील दावे केले जात आहेत. थोडक्यात काय तर नवीन वर्ष उजाडण्यापूर्वी ‘या टोपीखाली दडलंय काय?’ प्रमाणे ‘या फाईलमध्ये दडलंय काय?’ याबाबत चर्वितचर्वण सुरु झालेले आहे. घोडामैदान जवळच आहे.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.