Kolhapur Breaking : जयसिंगपूर-शिरोळमध्ये राजकीय भू-चाल ; काँग्रेस-भाजप युतीने दिला धक्का
जयसिंगपूरात राजकीय सत्तासंघर्षाची सुरुवात
शिरोळ : जयसिंगपूर- शिरोळ आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर आणि शिरोळ तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. पूर्वी कट्टर विरोधक मानले जाणारे नेते आता एकत्र येत असल्यामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण खळबळले आहे.
कागल तालुक्यातील समरजीत घाटगे ( राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट ) आणि मंत्री हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस ) यांनी अचानक युती जाहीर केली आहे. पूर्वी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले हे नेते आता एकत्र काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे, ज्यामुळे संपूर्ण तालुक्यात आणि राज्यात आश्चर्याची लाट पसरली असतानाच आता . खासदार धनंजय महाडिक गट (भाजप) आणि आमदार सतेज पाटील गट (काँग्रेस) यांनी जयसिंगपूर नगरपालिकेत आघाडी तयार केली आहे. माजी खासदार राजू शेट्टी देखील या आघाडीत सामील झाले आहेत. यामुळे भाजप-काँग्रेस युतीतून नगरपालिकेत महत्त्वपूर्ण ताकद निर्माण झाली आहे.
मागील निवडणुकीत ‘राजर्षी शाहू आघाडी’च्या माध्यमातून जयसिंगपूर नगरपालिकेवर सत्ता स्थापन केलेले महायुतीचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना आता विरोधकांची एकत्रित ताकद पाहायला मिळणार आहे. स्थानिक भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष असल्यामुळे तेही या विरोधी आघाडीसोबत मैदानात उतरले आहेत.
या युतीमुळे जयसिंगपूर आणि शिरोळ तालुक्यातील राजकारण अजून अधिक प्रतिस्पर्धात्मक बनले आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत ही आघाडी महायुतीसाठी मोठा आव्हान ठरू शकते. राज्यस्तरीय राजकीय परिणाम देखील यामुळे पाहायला मिळू शकतात.