For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara politics | साताऱ्यात राजकीय खळबळ; महेश शिंदे यांचे पालकमंत्र्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर

12:34 PM Mar 22, 2026 IST | NEETA POTDAR
satara politics   साताऱ्यात राजकीय खळबळ  महेश शिंदे यांचे पालकमंत्र्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर
Advertisement

         सातारा जिल्हा परिषद निवडीवरून आरोप-प्रत्यारोप;

Advertisement

सातारा - सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीदरम्यान झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी अखेर मौन सोडत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या आरोपांचे खंडन केले. विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी घडलेल्या घटनांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. जिल्ह्याचे नेतृत्व पालकमंत्री करत असताना त्यांनी मांडलेल्या घटनांबाबत शंका व्यक्त करत शिंदे म्हणाले की, “काल जे घडल्याचे सांगितले जात आहे, तसे प्रत्यक्षात घडले असे वाटत नाही. याबाबत मला आश्चर्य वाटत आहे.” जिल्हा परिषद सदस्यांच्या अपहरणाच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी हा गुन्हा विरोधकांकडून झाल्याचा दावा केला. तसेच अटक झालेल्या सदस्यांनी अटकपूर्व जामीन घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री यांनी पोलिसांवर केलेल्या आरोपांवरही शिंदे यांनी टीका केली. “पोलिसांवर चिडचिड करून चालणार नाही. सदस्यांना कैद्यांप्रमाणे आणण्यात आले, दीड महिना त्यांना रोखून ठेवले तरी ते टिकले नाहीत,” असे ते म्हणाले.राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, भविष्यात संघर्ष टाळला जाईल आणि आगामी निवडणुका एकत्र लढवल्या जातील. दरम्यान, शशिकांत शिंदे यांच्यावरही त्यांनी टीका करत त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले. राष्ट्रवादीतील काही सदस्य फुटण्यामागे त्यांची भूमिका असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Advertisement

याशिवाय, झटापटीदरम्यान पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांच्या पेनमुळे त्यांना दुखापत झाल्याचा उल्लेख करत शिंदे यांनी परिस्थितीवर भाष्य केले. “आम्ही कोणालाही डांबून ठेवले नाही, गुंड आणले नाहीत किंवा पोलिसांवर हात उचलला नाही. संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास सत्य समोर येईल,” असे ते म्हणाले. या प्रकरणामुळे सातारा जिल्ह्यातील राजकारण पुन्हा तापले असून पुढील काही दिवसांत यावर आणखी घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Tags :

.