For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमदार गोविंद गावडे यांच्याशी राजकीय संबंध? शक्यच नाही!

08:18 AM Dec 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
आमदार गोविंद गावडे यांच्याशी  राजकीय संबंध  शक्यच नाही
Advertisement

मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी फेटाळली शक्यता

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

मगो पक्षाचे चिन्ह सिंहाविऊद्ध अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या आणि पक्ष नेत्यांच्या पालकांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणारे आमदार गोविंद गावडे यांच्याशी भविष्यात कोणतेही राजकीय संबंध ठेवण्याची शक्यता मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी फेटाळून लावली आहे.

Advertisement

नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत मगोच्या कार्यकर्त्यांनी आघाडीतील उमेदवाराला पाठिंबा देणे किंवा न देणे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार व मत होते. त्यात पक्षाची कोणतीही भूमिका नाही व ती चूकही नाही, असे ढवळीकर म्हणाले. हे प्रकरण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला आधीच कळवण्यात आले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अशावेळी गावडे यांनी मगोचे चिन्ह सिंहाविऊद्ध अपमानास्पद भाषा वापरणे तसेच पक्ष नेत्यांच्या पालकांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणे ही मात्र चूक होती. त्यामुळे असे वर्तन असणाऱ्या नेत्यासोबत भविष्यात कधी संबंध ठेवणे शक्यच नाही, असे ढवळीकर ठामपणे म्हणाले.

आगामी मनपा निवडणुकीवर बोलताना त्यांनी, मगो हा प्रादेशिक पक्ष म्हणून मर्यादित आहे. त्यामुळे सदर निवडणूक लढवायची की नाही यासंबंधी योग्यवेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल. त्यासंदंर्भात अद्याप कोणतीही आघाडी बैठकही झालेली नाही. मगो हा एनडीए आघाडीचा भाग आहे आणि त्याच्या चौकटीत काम करेल, असे ते म्हणाले.

आरजीपी दिशाहीन, योगदानशून्य पक्ष

आरजीपी वर तीव्र हल्ला चढवताना ढवळीकर यांनी, या पक्षाचे गोव्यासाठी योगदान शून्य असल्याचा दावा केला. त्यांच्याकडे स्पष्ट कोणताही अजेंडा नाही. हा पक्ष कोणत्याही स्पष्ट कार्यसूचीशिवाय काम करतो आणि केवळ इतरांच्या सांगण्यावरून वागतो. ते सतत विकासप्रकल्पांना विरोध करत असतात व त्यांना केवळ विरोधच करता येतो. त्यांनी गोव्यासाठी कोणतेही विधायक काम केलेले नाही, असा आरोप ढवळीकर यांनी केला व या पक्षाची कार्यपद्धती अशीच राहिल्यास भवितव्य त्यांचीही स्थिती ‘आप‘सारखीच होऊ शकते, असे ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.