पाकिस्तानात राजकीय चढाओढ
नवाझ शरीफ यांच्यासह इम्रान खानही सत्तास्थापनेच्या प्रयत्नात : सार्वत्रिक निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत नाही
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 265 नॅशनल असेंब्लीच्या जागांपैकी 244 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यापैकी 96 जागा माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयने समर्थित अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या आहेत. निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करण्यास उशीर केल्याने निवडणुकीत हेराफेरीचे आरोप होत आहेत. इम्रान खान यांच्या पक्षाने पीपीपी, पीएमएल-एन यांच्याशी युती नाकारली आहे. त्यामुळे आता पीपीपी आणि पीएमएल-एन यांची युती होऊन नवाझ शरीफ यांच्याकडे देशाचे नेतृत्त्व जाण्याचे संकेत मिळत आहेत. तथापि, कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने राजकीय चढाओढ कायम आहे.
हेराफेरी, तुरळक हिंसाचार आणि मोबाईल इंटरनेट बंद अशा आरोपांच्या पार्श्वभूमीवर गुऊवारी पाकिस्तानात निवडणूक पार पडली होती. अतिशय चुरशीने झालेल्या या निवडणुकीनंतर तुऊंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) यांच्याशी युती करण्याची शक्मयता नाकारली आहे.
अपक्ष उमेदवारांना सर्वाधिक जागा
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानुसार, नॅशनल असेंब्लीच्या 250 जागांवर मतमोजणी पूर्ण झाली असून अपक्ष उमेदवारांनी सर्वाधिक 99 जागा जिंकल्या आहेत. यातील बहुतांश उमेदवारांना माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘तेहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्षाचा पाठिंबा आहे. त्याव्यतिरिक्त पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (पीएमएल-एन) 71 जागा, पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) 53 जागा आणि मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट 17 जागा जिंकल्या आहेत. पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकांनंतर कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. तरीही येत्या एक-दोन दिवसात प्राथमिक पातळीवरील राजकीय चित्र स्पष्ट होऊ शकते.