For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्नाटकात राजकीय वादळ

06:03 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटकात राजकीय वादळ
Advertisement

लोकसभा निवडणुका आता तिसऱ्या टप्प्यात पोहोचत आहेत आणि उन्हाळ्यातील तापत्या वातावरणाबरोबरच राजकीय वातावरणाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड्स मोडलेले आहेत. कर्नाटकातील प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कँडलने देशातील सारी यंत्रणाच हादरली. एखाद्या व्यक्तीने किती महिलांवर अत्याचार करावेत? आणि या प्रकरणातील जो खलनायक आहे, तो केवळ 33 वर्षांचा युवा संसद सदस्य. एवढेच नव्हे तर माजी पंतप्रधान हरदनहळ्ळी दो•sगौडा देवेगौडा यांचा तो नातू. कर्नाटकाचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व आमदार एच. डी. रेवण्णा यांचा पुत्र असलेल्या व देशातील तिसऱ्या अत्यंत हुशार व युवा खासदार म्हणून ज्याची नोंद आहे, अशा उच्च विद्याविभूषित व्यक्तीने अत्यंत लज्जास्पद असे प्रकार करावे! आणि हे सर्व माहीत असून देखील देवेगौडा यांच्या पक्षाने प्रकरण बाहेर आल्यानंतर देखील त्याला उमेदवारी द्यावी, हे खरोखरंच दुर्दैवच. ज्या हासन मतदारसंघातून प्रज्ज्वल निवडणूक लढवित आहे, त्या मतदारसंघात बोलावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्यासाठी हासन येथे जाहीर सभा घ्यावी, खरेतर हा मतदारांसाठी फार मोठा धक्का आहे आणि धोका देखील. ‘देव देतो व कर्म नेते’ म्हणतात, ते चुकीचे नाहीच मुळी. आपण माजी पंतप्रधानांचा नातू, आपले वडील हे माजी मंत्री आहेत व आपण स्वत: खासदार आहे. आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे जनतेमध्ये कसे राहावे, जनतेशी कसे वागावे, याची तमा बाळगायला नको? असले संसद सदस्य म्हणजे भारतीय लोकशाहीची मान शरमेने खाली झुकायला लावण्याचा प्रकार तर आहेच शिवाय देशाची इभ्रत त्यातून निघण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील रेवण्णा याच्या या प्रकरणाने केवळ कर्नाटकच नव्हे तर सारा देश हादरला. एक वर्षांपूर्वी यातील अनेक व्हिडिओ सार्वजनिक होऊ लागताच प्रज्ज्वलने न्यायालयात धाव घेऊन त्यावर स्थगिती मिळविली होती. तथापि, ऐन लोकसभा निवडणुकीत उमेदवारी भरण्यास गेलेल्या प्रज्ज्वलच्या अनेक भानगडी कर्नाटकातील समाजसेवक वा राजकीय कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर उघड केल्या आणि त्यातून किमान पाचशे महिलांवर या व्यक्तीने अत्याचार केल्याचे उघड होते. यातील सत्य सत्यता पडताळून पाहण्याचे कोणी पाहिले नाही. परंतु कर्नाटकातील काँग्रेस सरकारसाठी त्यांच्या जाळ्यात आलेली ही आयतीच शिकार. एवढा मोठा विषय ते का सोडतील? त्यांनी विशेष तपास यंत्रणा (एसआयटी) स्थापन केली. तोपर्यंत हे घबाड बाहेर येताच प्रज्ज्वलने जर्मनीत पलायन केलेले आहे. देशातील सर्वच राजकीय पक्षांसाठी हा विषय अत्यंत गंभीर ठरलेला तर आहेच मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेवण्णाच्या मतदारसंघात सभेसाठी गेले, त्यामुळेच साहजिकच पंतप्रधानांची अडचण वाढली. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षही फार अडचणीत आलेला आहे. कारण भाजपने कर्नाटकातील काँग्रेस सरकारला अडचणीत आणण्यासाठी देवेगौडा यांच्या जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षासोबत युती केली होती व एकत्रित प्रचार कार्य सुरू केले होते. आता कोणत्या तोंडाने या पक्षाबरोबर भाजपचे नेते जातील? कर्नाटकातील काँग्रेस सरकार अडचणीत आलेले होते. लोकसभा निवडणुकीचा निकाल काँग्रेसच्या विरोधात जाणार होता. आता प्रज्ज्वल रेवण्णा प्रकरणाने संपूर्ण कर्नाटकातील वातावरण ढवळून निघाले आहे. यामध्ये जनता दल आणि त्यांच्या नेत्यांवर आरोप होण्याऐवजी भाजप व पंतप्रधानांना टार्गेट करण्यात काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे. म्हणजेच कर्नाटकात ‘जेडीएस’सोबत आघाडी करून भाजपने अकारण महासंकट ओढवून घेतले. या एकंदरीत प्रकरणाचे निमित्त साधून काँग्रेस आणि भाजप दरम्यान भयानक शाद्बिक युद्ध चालू झाले आहे. निवडणूक लोकसभेची. विकासकामे हा मुद्दा गौण बनला असून वैयक्तिक चारित्र्यहनन हा विषय बहुतांश राजकीय नेत्यांसाठी महत्त्वाचा ठरलेला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना कोणीही मर्यादा पाळत नाहीत. ‘इंडी’ आघाडीच्या नेत्यांनी ‘राम’ व ‘शंकर’ या देवतांना देखील त्यातून सोडले नाही. राजकीय लाभ उठविताना केवळ हिंदू धर्माच्या देवतांनाच टार्गेट का केले जातेय! काँग्रेसने याबाबत गंभीरपणे विचार करावा. कारण इतर धर्मातील देवतांवर टीका करून दाखवा, तुमची अवस्था ती माणसे अत्यंत बिकट करून टाकतील. सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्यांनी मग ती व्यक्ती कोणत्याही पक्षाची वा धर्माची असू द्या, त्यांनी जनतेच्या भावनांचा आदर राखला पाहिजे. निवडणुका आल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्ष एकमेकांच्या भानगडी उपसायला लागतात. अनेकजण तर त्याच्या मुळापर्यंत जाऊन पोहोचतात व त्यातून राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. तथापि, एकमेकांच्या भावनांचा आदर राखणे आवश्यक आहे. कोणत्याही देवदेवतांवर टीका केली जाऊ नये, याचे भान तरी ‘इंडी’ आघाडीचे सदस्य राखतील का? लोकसभा निवडणुकीच्या या पुढील टप्प्यात 80 पेक्षा जास्त मतदारसंघात मतदान होईल. तिथले वातावरण बरेच तापलेले आहे.  सत्ताधारी भाजपने रेवण्णा याच्या जनता दल (एस) सोबत आघाडी केलेली आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी परवा कित्येक पत्रकारांसमोर आपली भावना व्यक्त करताना वारंवार या प्रकरणाशी आपले नाव जोडले जातेय, याचा खेद व्यक्त केला. वारंवार ‘देवेगौडा यांचा नातू’ असा उल्लेख करून तुम्हाला काय मिळणार? असा सवाल केला. या वयामध्ये त्यांना मोठा धक्का सध्या सहन करावा लागतोय. त्यांची व त्यांच्या पक्षाची एकच चूक होती, ती अत्यंत महत्त्वाची. गेल्यावर्षी जेव्हा हे प्रकरण उघडकीस आले, त्यानंतर हळूहळू प्रज्ज्वलशी संबंध मर्यादित ठेवून या लोकसभा निवडणुकीपासून त्याला दूर ठेवणे आवश्यक होते. आता कर्नाटकातील काँग्रेस सरकार आयतीच राजकीय शिकार हाती आल्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या थोडेच गप्प बसणार? काँग्रेससाठी भाजपला अडचणीत आणण्यासाठी ही एक मोठी संधी आहे. हा एकंदरीत राजकीय विचार आहे. तथापि, या प्रकरणाने फार मोठी बदनामी होऊ शकते. देवेगौडा यांचे घराणेच पूर्णत: सध्या अडचणीत आलेले आहे. एवढ्या वर्षांची त्यांची राजकीय कारकीर्द क्षणार्धात संकटांच्या खाईत सापडली. मात्र यात ज्या ज्या महिलांचा छळ केला, त्या त्या महिलांची मोठ्या प्रमाणात बदनामी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे केवळ राजकीय लाभासाठी या प्रकरणाचा हत्यार म्हणून वापर करताना  राजकीय पक्षांनी काही मर्यादा पाळाव्यात. त्यातून महिला वर्गाची बदनामी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. एका व्यक्तीच्या पाचशेपेक्षाही जास्त भानगडी व त्याची व्हिडिओ टेप सर्वत्र पोहोचतेय, याचा अर्थ ही विकृती करणारा दुसरा तिसरा कोणी नसून आरोपी स्वत:च ते करीत असावा. मात्र चुकून व्हिडिओचे हे चित्रण कुठून तरी बाहेर पडले आणि ते सर्वत्र पसरलेले आहे. कोणीतरी प्रज्ज्वलचा राजकीय काटा काढण्यासाठी हे उघड करीत असावा.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.