For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंग्लंडमध्ये राजकीय चक्रीवादळ

06:22 AM Jul 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
इंग्लंडमध्ये राजकीय चक्रीवादळ
Advertisement

इंग्लंडला संपूर्ण जगातील संसदीय लोकशाहीची जननी म्हटले जाते. त्याचे कारण म्हणजे तेथे लिखित राज्यघटना नाही परंतु प्रथा आणि परंपरांचा एवढा समृद्ध वारसा आहे की त्यामुळे तेथील राजकारण हे विवेकाच्या उच्च पातळीवर कार्यरत असते. गेल्या दशकामध्ये इंग्लंडला अस्थिरतेच्या राहुकेतुनी ग्रासले आहे. दहा वर्षांमध्ये सहा पंतप्रधानांनी राजीनामा दिला. किर स्टार्मर यांच्या राजीनाम्याने जगाला धक्का बसला परंतु पाच-सहा महिन्यांपासून त्यांच्या विरोधात चक्रीवादळ धुमसत होते. अखेर या वादळाने कहर केला आणि स्टार्मर यांना राजीनामा देऊन पायउतार व्हावे लागले. अशी कोणती कारणे घडली की स्टार्मर पदत्याग करून मोकळे झाले. त्याची मिमासा प्रस्तुत लेखात केली आहे. 

Advertisement

पंतप्रधान किर स्टार्मर यांचा राजीनामा हा अनेक कारणांचा सामुदायिक परिपाक म्हटला पाहिजे. विशेषत: त्यांची घटत असलेली लोकप्रियता आणि जनमानसातील त्यांच्या प्रतिमेला पडत असलेला तडा तसेच स्थानिक आणि प्रादेशिक निवडणुकांचे निराशाजनक निकाल हेही कारणीभूत ठरले आहेत. इंग्लंडमध्ये कायदा व सुव्यवस्था पातळी घसरली आहे. गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. त्यातही काही वादांनी आगित तेल टाकल्यासारखे झाले. राजकीय भेट वस्तू स्वीकारण्यावरून झालेले काही वाद सुद्धा वादळी ठरले होते. फ्री बीजगेट या नावाने हे प्रकरण गाजले तसेच प्रत्येक वेळी वादग्रस्त धोरणाच्या प्रसंगी त्यांनी दबाव वाढताच यू टर्न घेतला आणि आपल्या भूमिका बदलल्या. त्यामुळेही त्यांच्या धोरणातील कणखरपणा टिकला नाही यावर राजकीय पंडितांनी टीका केली. अमेरिकेतील इंग्लंडचे राजदूत

लॉर्ड पीटर मेंडेलसन हे त्यांचे मित्र या वादळी व्यक्तीची राजदूत पदावर झालेली नियुक्ती हे एक तात्कालीक कारण ठरले. त्यांच्यामागे असलेल्या काही प्रकरणांचा ससेमिरा हा या निंदनीय नियुक्तीचे कारण ठरला. त्यांना परत बोलवावे लागले. त्यामुळे मेंडेलसन प्रकरण स्टार्मर यांना चांगलेच भोवले आणि ते आणखी कमकुवत झाले.

Advertisement

मागील दोन वर्षांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांनी हुजूर पक्षाचा पराभव करून प्रचंड विजय संपादन केला पण अवघ्या दोन वर्षात त्यांना अकाली राजीनामा का द्यावा लागला ही मोठी चिंतनीय बाब आहे. दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत जनतेने दिले, त्यामागे हेतू असा होता की सरकार स्थिर राहील पण झाले नेमके उलटे. आर्थिक संकटामुळे सत्ताधारी पक्षाविरुद्ध दबाव वाढत होता शिवाय ब्रेक्झिटच्या परिणामामुळे ब्रिटनमधील नेत्यांच्या प्रथम ब्रिटनची बिघडलेली आर्थिक प्रकृती सुधारली पाहिजे तरच मग सरकार स्थिर राहील. केवळ बहुमताने प्रश्न सुटणार नाहीत असा या घटनेचा संदेश आहे.

निवडणूक निकालांचा धक्का

किर स्टार्मर यांच्या प्रचंड विजयामुळे दृष्ट लागली आणि त्यांना आर्थिक प्रश्नांची मालिका सोडविता आली नाही. अलीकडे झालेल्या वेल्स आणि स्कॉटिश मतदार संघातील संसदेच्या निवडणुकीत पक्षाची निराशाजनक कामगिरी ही चिंता वाढविणारी ठरली शिवाय स्थानिक निवडणुकीतील पक्षाचा पराभव म्हणजे त्यांच्या नेतृत्वावरील लोकांचा विश्वास पूर्णपणे डळमळीत झाला आहे, असे निरीक्षक टीका करू लागले. कुठल्याही देशांमध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुका या राजकीय तापमान व त्याचा पारा किती उंच किंवा खाली गेला आहे, हे दर्शवित असतात. त्यामुळे या निवडणूकीमध्ये लेबर पक्षाला बसलेला फटका हा स्टार्मर यांना व्यथित करणारा ठरला आणि पुढील निवडणुकीत जर आपल्या नेतृत्वाखाली लढाई केली तर पराभव अटळ आहे असे पाहून त्यांनी पक्ष व देश वाचविण्यासाठी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला तो खरोखर यथायोग्य म्हटला पाहिजे.

मोफत भेटीचे वादळ

किर स्टार्मर आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील काही सदस्यांनी संगीत मैफिली आणि फुटबॉल सामन्यासाठी हजारो पौंडांची मोफत तिकिटे स्वीकारल्याबद्दल मोठा वाद झाला आणि सार्वजनिक जीवनातील साधन सुचिता पाळली नाही म्हणून टीकेची झोड उठली. ब्रिटनमध्ये वृत्तपत्रांनी व प्रसारमाध्यमांनी टीका टिपण्या करून कमालीचा संताप व्यक्त केला. त्यामुळे स्टार्मर व्यथित झाले. इंग्लंडमध्ये नैतिक आचारसंहितेला महत्त्वाचे स्थान असून त्यांचे पालन जर प्रमुख नेत्याने व त्यांच्या सहकाऱ्याने केले नाही तर लोक कमालीचे नाराज होतात आणि त्या पक्षाविषयी आपल्या प्रक्षुब्ध भावना ते विविध मार्गाने प्रकट करतात. ही गोष्ट जेव्हा स्टार्मर यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांना पश्चाताप झाला आणि आपण आता पायउतार झाले पाहिजे, असा त्यांच्या मनाने निश्चय केला.

अलोकप्रिय निर्णय

राजकारणात धोरणांची गुणवत्ता किती यापेक्षाही नेता लोकप्रिय निर्णय किती व कसे घेऊ शकतो यावर त्याचे भविष्य अवलंबून असते. परंतु स्टार्मर यांनी कोणताही धडा न घेता एकानंतर एक अनेक जनविरोधी लोकप्रिय निर्णय घेण्याचा सपाटाच लावला होता. त्यामुळे जनमत नाराज होणे ही गोष्ट साहजिक होती. त्यांच्या धोरणाविरुद्ध असंतोष म्हणून अनेक निवडणुकातून पक्षाचा सुधारणावादी विरोधकांनी पराभव केला. निवृत्तीधारकांच्या हिवाळी इंधन भत्त्यात कपात करण्याचा त्यांचा निर्णय हा ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाराजी ओढवणारा ठरला तसेच त्यांनी ब्रिटन मधील कारागृह प्रणालीतील क्षमता व समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्याचा जो निर्णय घेतला तो सुद्धा वादग्रस्त ठरला. अशा लोकप्रिय उपाययोजनांमुळे स्वपक्षीय खासदार आणि मतदार जनतेकडून तीव्र विरोध प्रकट होऊ लागला होता. या विरोधाची चाहूल लक्षात घेऊन धोरणात बदल करण्याऐवजी स्टार्मर यांनी त्याचा शोध व बोध घेतला नाही. धोरणे तशीच चालू राहिली त्यामुळे त्यांच्या पक्षाला त्याचा फटका बसला.

विश्वासाचा अभाव हा धोका

लेबर पार्टीचे महानायक ठरलेले किर स्टार्मर यांनी निवडणूक प्रचारकाळात राणा भीमदेवी थाटात जोरदार भाषणे केली होती आणि ब्रिटनचे अर्थकारण सुधारू, शिक्षण व्यवस्थेत बदल करू, आरोग्य व्यवस्था पुन्हा बहाल करू, कायदा व सुव्यवस्था सुरळीत करू अशी गोंडस आश्वासने दिली होती परंतु सत्तेवर आल्यानंतर पहिल्या सहा महिन्यानंतर त्यांच्या धोरणातील मुक्ती व कृती यांच्यातील विसंगती लक्षात येऊ लागली. ग्रेटर मँचेस्टरचे महापौर अँडी बर्नहॅम यांच्यासारखे पक्षातील ज्येष्ठ नेते पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारण्याच्या तयारीत आहेत. काही मंत्र्यांनी सूचकपणे भावी नुकसान टाळण्यासाठी मोठ्या चतुराईने राजीनामे दिले. त्यामुळेसुद्धा स्टार्मर यांना धक्का बसला. त्यांचे संसदीय पाठबळ घटू लागले. पक्षातील सुमारे 100 खासदारांनी उघड उघड त्यांच्याविरुद्ध बंडच केले. त्यामुळे पक्षातील विश्वासाचा अभाव हे त्यांच्या राजीनाम्याचे प्रमुख कारण म्हटले पाहिजे.

राजकीय समाजशास्त्र दृष्टी

पंतप्रधान किर स्टार्मर यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर त्यांनी आपल्या पंतप्रधान निवासस्थानात केलेले भाषण अत्यंत भावनिक आणि हृदयस्पर्शी होते. आपण आपल्या पक्षाच्या व देशाच्या हितासाठी राजीनामा देत आहोत, असे सांगताना त्यांनी पत्नी आणि मुलांना वेळ देण्यासाठी परतत असल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या भाषणात आत्मपरीक्षणे केली आहेत आणि शिवाय आपल्या चुकामुळे त्यांना वाटलेली खंतही या भाषणातून त्यांनी प्रकट केली आहे. पक्षांतर्गत बंडांचा प्रसार माध्यमात प्रकट झालेला तपशील अभ्यासला असता ही बंडखोरीची लागण सहा महिन्यापासूनच झाली होती असे लक्षात येते शिवाय लेबर पार्टीला एवढे प्रचंड बहुमत मिळूनसुद्धा स्टार्मर यांना राजीनामा का द्यावा लागला, या प्रश्नाचे उत्तर असे की त्यांनी प्रथम ब्रिटनचे अर्थकारण सुधारण्यावर भर देणे आवश्यक होते तसेच स्थलांतर प्रश्नावर लेबर पार्टीने मवाळ भूमिका घेतली. त्यामुळे अल्पसंख्यांक समाज ब्रिटनमधील मुली व महिलांवर अत्याचार करू लागला. त्याची अनेक प्रकरणे धक्कादायक आणि लोकशाहीला कलंक लावणारी

ठरली. या सर्व चर्चेचे सार असे आहे की ब्रिटनमध्ये आर्थिक प्रश्नांचा गुंता वाढला. कायदा व सुव्यवस्था यंत्रणेचा कडेलोट झाला. स्थलांतर करून आलेले अल्पसंख्यांक डोकेदुखी बनले. महिलांवरील वाढते अत्याचार, रात्री नऊ नंतर रस्त्यावर फिरणे कठीण झाले. अशावेळी पंतप्रधानांनी कणखर राहणे आवश्यक होते. पण तसे घडले नाही. त्यामुळे बिचारे स्टार्मर बहुमत असतानाही राजीनामा देऊन मोकळे झाले.

प्रा.डॉ.वि.ल.धारूरकर

Advertisement

.