मणिपूरच्या समस्येवर राजकीय तोडगा आवश्यक
सैन्याच्या पूर्व कमांडच्या प्रमुखांचे वक्तव्य : लुटण्यात आलेली शस्त्रास्त्र परत मिळविण्याची गरज
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
मणिपूरची समस्या राजकीय असल्याने याचा तोडगा देखील राजकीय असायला हवा असे भारतीय सैन्याच्या पूर्व कमांडचे प्रमुख राणा प्रताप कलीता यांनी म्हटले आहे. गुवाहाटी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. हिंसा थांबावी असा आमचा प्रयत्न आहे. राजकीय समस्येवर शांततापूर्ण तोडगा काढावा लागेल, याकरता दोन्ही गटांना (कुकी आणि मैतेई) प्रेरित करावे लागणार आहे. हिंसा नियंत्रणात आणण्यास आम्हाला व्यापक स्तरावर यश मिळाले आहे. परंतु कुकी आणि मैतेई यांच्यात ध्रूवीकरण झाले असल्याने किरकोळ घटना घडत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
राज्याच्या सुरक्षादलांकडून लुटून नेण्यात आलेली 4 हजार शस्त्रास्त्रs अद्याप देखील लोकांच्या हातात असून हिंसेकरता वापरली जात आहे. जोपर्यंत ही शस्त्रास्त्रs लोकांकडून परत मिळविण्यात येत नाहीत, तोवर मणिपूरमधील हिंसा थांबविता येणार नाही. सुमारे 5 हजार शस्त्रास्त्र लुटण्यात आली होती, ज्यातील केवळ 1500 शस्त्रास्त्रs हस्तगत झाली असल्याचे कलीता यांनी सांगितले आहे.
मणिपूरमध्ये प्रामुख्याने कुकी, मैतेई आणि नागा समुदायाचे लोक राहतात. या समुदायांदरम्यान वांशिक मुद्दा आहे. 1990 च्या दशकात कुकी आणि नागा यांच्यात लढाई झाली होती आणि तेव्हा सुमारे एक हजार लोक मारले गेले होते. भारतात म्यानमारमधून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आश्रय मिळाला आहे. मग भले तो सामान्य नागरिक असो किंवा सैन्य किंवा पोलीस दलाचा कर्मचारी. परंतु आम्ही उग्रवादी गट आणि अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित व्यक्तीला कधीच आश्रय दिला नसल्याचे कलीता यांनी स्पष्ट केले आहे.
स्वत:च्या घरांमधून विस्थापित झालेल्या लोकांसाठी बचाव आणि मदतकार्य राबविणे हा भारतीय सैन्याचा उद्देश होता. यानंतर आम्ही आता हिंसा रोखण्याचा प्रयत्न करत आहोत, याप्रकरणी आम्ही बऱ्याचअंशी यशस्वी ठरलो आहोत. भारत-म्यानमार सीमेच्या माध्यमातून अमली पदार्थांसोबत शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यास यश आले आहे, परंतु 4 हजार शस्त्रास्त्र यापूर्वीच लोकांकडे असल्याने खबरदारी घ्यावी लागत असल्याचे ते म्हणाले.
म्यानमार सीमेसंबंधी चिंता
आमच्या शेजारी देशातील कुठल्याही प्रकारची अस्थिरता भारताच्या हिताची नाही. निश्चितपणे म्यानमारमधील अनिश्चिता भारतावर प्रभाव पाडते, कारण दोन्ही देशांदरम्यान मोठी भूसीमा आहे. प्रतिकूल भौगोकि स्थिती तसेच विकासाच्या अभावामुळे भारत-म्यानमार सीमासंबंधी समस्या वाढत आहेत. सीमेच्या दोन्ही बाजूला एकाच समुदायाचे लोक आहेत. यामुळे दोन्ही बाजूने लोकांची ये-जा सुरू असते. यामुळे सीमांचे व्यवस्थापन करणाऱ्या सुरक्षा दलांना कोणता व्यक्ती भारतीय आहे आणि कोणता म्यानमारचा नागरिक हे ओळखणे अवघड ठरत असल्याचे कलीता यांनी सांगितले आहे.
म्यानमारशी साधतो संपर्क
आश्रय इच्छिणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला आम्ही आश्रय देत आहोत. परंतु याकरता एका योग्य प्रक्रियेचे पालन केले जाते. शेजारी देशाकडून येणाऱ्या लोकांना भारतात दाखल व्हायचे असल्यास शस्त्रास्त्रs खाली ठेवावी लागतात. याचबरोबर आम्ही समाजकंटकांची ओळख पटवून त्यांना आश्रय देण्यास नकार देत आहोत. तसेच विदेश मंत्रालय आणि म्यानमारच्या दूतावासाशी संपर्क साधत आहोत. म्यानमारच्या सैनिकांना मोरेहमध्ये (मणिपूर) नेण्यात येईल आणि मग म्यानमारच्या सैन्याच्या हवाली करण्यात येणार असल्याचे कलीता यांनी सांगितले आहे.