प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कुरघोड्यांचे राजकारण
कोल्हापूर / कृष्णात चौगले :
जि.प. आरोग्य विभागांतर्गत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जिह्याच्या आरोग्य सेवेचा डोलारा यशस्वीपणे सांभाळला जात आहे. पण याच आरोग्य सेवेला काही आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनामुळे गालबोट लागत आहे. अनेक वैद्यकीय अधिकारी रुग्णसेवेबाबत संवेदनशील आहेत. त्यामुळे कामात गलथानपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडून वेळोवेळी कानपिचक्या दिल्या जातात. पण अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांवर काही कर्मचाऱ्यांकडून राजकीय दबाव आणला जात असून थेट त्यांच्या बदलीची मागणी केली जात आहे. कुरघोडीचे राजकारण करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांना प्रशासनाने वेळीच धडा शिकवण्याची गरज आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये मिळणारी आरोग्य सेवा सर्वसामान्य जनतेला आधारवड ठरते. दहा रूपयांच्या केसपेपरमध्ये संपूर्ण आरोग्य सेवा मोफत मिळत असल्यामुळे कोणताही रूग्ण वैद्यकीय सेवेपासून वंचित राहत नाही. त्यामुळेच कोल्हापूर जि.प.ची आरोग्य सेवा वेळोवेळी राज्यात आदर्शवत ठरली आहे. 8 ते 9 प्रकारचे लसिकरण, आपत्कालिन परिस्थितीत पुरविली जाणारी सुविधा आणि साथीच्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राबविले जाणारे विविध कार्यक्रम यामध्ये जि.प.ची आरोग्य सेवा अग्रेसर आहे. पण काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी रूग्णसेवेपेक्षा वैद्यकिय अधिकाऱ्यांविरोधात कुरघोड्या करण्यातच व्यस्त आहेत. अशा कर्मचाऱ्यांविरोधात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच सबुरीने घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे कामचुकार आणि कुरघोड्या करणारे कर्मचारी ‘हम करेसो कायदा’ अशा अविर्भावात वावरत आहे. प्रशासनाकडूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत आहे. कामचुकारपणाबद्दल होत असलेली कारवाई टाळण्यासाठी अशा कर्मचाऱ्यांकडून अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांकडूनही दबाव आणला जात आहे. साहजिकच संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होत आहे.
- कुरघोड्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिकवायला हवा धडा
जिह्यात 76 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 416 आरोग्य उपकेंद्रे आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिक्रायांसह सुमारे दोन हजार आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील एखादा कर्मचारी जर व्यवस्थित काम करत नसेल, सतत वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात भूमिका घेत असेल तर त्या कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत आणि त्याच्या वर्तणुकीबद्दलची तक्रार आरोग्य विभागाकडे दिली जाते. अशा कर्मचाऱ्यांवर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कारवाईची भूमिका घेतल्यास त्यांच्यावर आरोग्य कर्मचारी संघटनेसह राजकीय दबाव आणला जात आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अशा कर्मचाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज आहे. तसेच चुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला आरोग्य कर्मचारी संघटनेने देखील पाठीशी घालू नये अशी स्थानिक ग्रामपंचायतींची मागणी आहे.
- अनेक वैद्यकीय अधिकारीही बेलगाम
आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच काही प्रा.आ. केंद्रातील वैद्यकीय अधिकारीही बेलगाम आहेत. प्रा.आ. केंद्रातून दुपारीच गायब होत असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्राना दिलेल्या अचानक भेटीमध्ये असे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. तसेच काही दुर्गम तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी महिला आरोग्य कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारी देखील संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या आहेत. तरीही त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.
- टिमवर्क म्हणून काम करणे आवश्यक
आरोग्य विभागाचे काम हे टिमवर्क म्हणून करणे अपेक्षित आहे. एकटा अधिकारी अथवा कर्मचारी हे काम करू शकत नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपले वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून एकत्रितपणे चांगले काम करणे गरजेचे आहे. तरच सर्वसामान्य रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळेल आणि जि.प.तील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावेल.
अनिरुद्ध पिंपळै, जिल्हा आरोग्य अधिकारी,जि.प.कोल्हापूर