भोंदुबाबा खरात प्रकरणात राजकीय गौप्यस्फोट होणार
नाशिकमधील भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष ऊपाली चाकणकर यांची रविवारी विशेष तपास पथकापुढे (एसआयटी) चार तास चौकशी झाल्यानंतर आता काँग्रेसचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खरात प्रकरणात राज्यातील चार मंत्री अडकले असल्याचा दावा केला आहे. यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यमंत्रीमंडळातील 9 मंत्री संपर्कात होते आणि मार्गदर्शनासाठी भोंदुबाबा खरात यांच्याकडे जात असल्याचा दावा केल्यानंतर, आता चाकणकर यांची चौकशी झाल्यानंतर काही राजकीय कनेक्शन उघड होण्याची शक्यता आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कोणालाही सोडणार नसल्याची कठोर भूमिका घेतल्याने आता पटोले, संजय राऊत, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले आरोप, खरात यांचे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी असलेले संबंध लक्षात घेता खरात प्रकरणात सहभाग असलेल्या नेत्यांना अभय मिळणार की चौकशी होणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. नाशिकचा बहुचर्चित भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणात केवळ महिलांचे शोषण केलेले नसून, जमिनीचे फसवणूकीचे व्यवहार, काळा पैसा पांढरा करणे, तसेच ब्लॅकमेलींगचे गुन्हे दाखल केल्यानंतर आता या प्रकरणात चौकशीला सुरूवात झाली आहे. खरात प्रकरणात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे संबंध असल्याचे उघड झाले आहे.
नुकतेच विधानपरिषदेवर आमदारकी मिळालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या निलम गोऱ्हे आणि बच्चु कडू यांच्यावर खरात प्रकरणात शिंतोडे उडाले होते, तर माजी मंत्री दीपक केसरकर यांनीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरात यांच्याशी भेट केल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. राज्य सरकारमधील केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर या प्रकरणात आरोप झाले आहेत. या प्रकरणात सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील यांच्यासोबतच अनेक तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी खरातला फोन केल्याचा दावा दमानिया यांनी केला होता, मात्र दमानियांच्या सीडीआरमध्ये भाजपचा एकही मंत्री नसल्याने दमानियांच्या आरोपावरच संशय निर्माण करताना, त्यांच्या हेतुबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. राजकीय नेत्यांच्या चौकशीला सुरूवात झाल्यानंतर आता अनेक राजकीय नेत्यांचे धाबे नक्कीच दणाणले आहेत. भाजपच्या चंद्रकांत पाटील वगळता कोणाचेही नाव या प्रकरणात आलेले नाही, खरात प्रकरणाचा पुरेपुर वापर हा राजकारणासाठी केला जात असल्याचे सध्या तरी दिसत आहे.
राष्ट्रवादीच्या मंत्रीमंडळातील आत्तापर्यंत धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचा तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ऊपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. चाकणकर यांचा राजीनामा झाल्यानंतर मात्र या प्रकरणात आक्रमक असलेले अनेक नेते हे शांत झाले आहेत. अजित दादांच्या निधनानंतर होणाऱ्या पहिल्याच विधानपरिषद निवडणूकीत ऊपाली चाकणकर यांची वर्णी लावण्याची काही नेत्यांनी तयारी केली होती. पण त्या अगोदरच ऊपाली ताईंचा गेम झाला, तर उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी गंभीर आरोप केल्यानंतरही निलम ताईंना एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेवर पाठविले, तर बच्चु कडू यांनी देखील खरात यांचा आशिर्वाद घेतला होता. त्यावेळी खरात बाबांनी त्यांना पुन्हा मंत्री होऊन या असा आशिर्वाद दिला होता. आता गेल्या दोन वर्षापासून राजकीय विजनवासात गेलेल्या कडू यांना मात्र विधानपरिषदेची लॉटरी लागली. त्यामुळे मंत्रीपद नाही पण खरात यांच्या आशिर्वादाने कडू यांची राजकीय साडेसाती संपली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
शिवसेना पक्षाचे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही सहकारी यांचे नाव खरात प्रकरणात आल्याने, ठाकरे गटाने एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चांगलेच टार्गेट केले होते. संजय राऊत यांनी तर केसरकर यांनी सावंतवाडीतील जंगलात जाऊन विधी केल्याचा आरोप केला होता. केसरकर शिक्षणमंत्री असताना त्यांचे खाते खरातच चालवत असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला होता. राऊतांच्या आणि अंधारेंच्या आरोपाला उत्तर देताना केसरकर यांनी भोंदू खरातला 39 आमदार भेटले होते, मग मलाच टार्गेट का केले जात आहे, असा आरोप करताना सरकारलाच अप्रत्यक्ष अडचणीत आणले. आता हे 39 आमदार कोण तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 38 आमदारांनी करंगळ्या कापल्याचा आरोप केला होता, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पायउतार व्हावेत यासाठी स्वत: चंद्रकांत पाटील यांनी खरात यांच्या मंदिरात पुजा केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला होता. खरात भोंदुबाबा प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. आता विरोधीपक्षाकडून तसेच सत्ताधारी पक्षाकडून ज्या ज्या नेत्यांवर आरोप करण्यात आले आहेत, त्यांची चौकशी होणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. खरात प्रकरणात ऊपाली चाकणकर यांच्यावर आरोप झाल्यानंतर काही दिवसातच नरहरी झिरवाळ यांचा तृतीयपंथीयासोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
या निमित्ताने राष्ट्रवादी पक्षांर्तगत असलेले वाद देखील चव्हाट्यावर आले होते. अशा पध्दतीने शह कटशाहचे राजकारण होत असल्याने खरात प्रकरणात लवकरच नवीन काही गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. खरात गेल्या 52 दिवसांपासून पोलीस कोठडीत असून त्याच्यावर आत्तापर्यंत नाशिकमधील नऊ गुह्यांचा तपास एसआयटीने पूर्ण केल्यानंतर शिर्डीतील दहाव्या गुह्यात त्याला 4 मे रोजी ताब्यात घेतल्यानंतर, आता या गुह्याचा तपास प्राथमिक स्तरावर पूर्ण झाल्याने त्याला नाशिकला पुन्हा हलविण्यात आले आहे. आता लवकरच अकराव्या गुह्यासाठी एसआयटी त्याला पुन्हा अटक करण्याची शक्यता आहे. खरातचा कोठडी ते न्यायालय आणि तुरूंग असा प्रवास आणखी 20 ते 25 दिवस सुरू राहणार असतानाच दुसरीकडे आता चौकशीचे सत्र सुरू झाले आहे.
प्रवीण काळे