प्रशासकांचे वाहन दोन तास रोखले...पोलीस गाडीतून जाण्याची वेळ ! बिंदू चौकात गणेश मंडप उभारण्यावरुन आंदोलन
संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आक्रमक; बिंदू चौकातील तरुण मंडळावर गुन्हा दाखल
कोल्हापूर प्रतिनिधी
बिंदू चौक येथे कोणताही राजकीय, धार्मिक कार्यक्रमास बंदी असताना, एका मंडळाने गणेशमुर्ती प्रतिष्ठापनेसाठी मंडप घातला आहे. या विरोधात संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मंगळवारी सायंकाळी आक्रमक झाले. या कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांचे वाहन तब्बल दोन तास रोखून धरले. यानंतर प्रशासक मंजूलक्ष्मी यांना पोलीस गराड्यात अग्नीशमन वाहनाच्या दरवाज्यातून बाहेर काढत पोलीस वाहनातून बैठकीसाठी सोडण्यात आले. दरम्यान कमांडो फ्रेंड्स सर्कल या मंडळाचे अध्यक्ष अशोक भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
बिंदू चौक येथे कोणताही धार्मिक व राजकीय कार्यक्रम करण्यास महापालिकेने बंदी घातली आहे. याबाबत 16 डिसेंबर 2013 महापालिकेच्या सभागृहाने ठराव क्रमांक 197 केला आहे. असा ठराव असतानाही बिंदू चौक येथे कमांडो फ्रेंड्स सर्कल या मंडळाने गणेशमुर्ती प्रतिष्ठापनेसाठी विनापरवाना मंडपाची उभारणी केली आहे. हा मंडप काढण्यात यावा यासाठी संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. सुमारे अर्धा तास आंदोलन केल्यानंतर कार्यकर्ते महापालिकेत घुसले. यानंतर प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्यासोबत शिष्ठमंडळाची बैठकीस सुरुवात झाली. दरम्यान प्रशासक मंजुलक्ष्मी यांना अन्य एका बैठकीसाठी जायचे असल्याने त्या बाहेर पडल्या, यानंतर शिष्ठमंडळाने अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याशी चर्चा करावी अशी सुचना केली. मात्र शिष्ठमंडळाने प्रशासकांसोबतच चर्चा करण्यासाठी आग्रह धरला. प्रशासक के. मंजुलक्ष्मी बैठकीस जाण्यासाठी दालनातून बाहेर पडल्यानंतर काही कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागून आले. प्रशासक मंजूलक्ष्मी या वाहनात बसत असताना काही कार्यकर्त्यांनी त्यांना रोखून धरले. यावेळी पोलीस आणि अग्नीशमनच्या कर्मचाऱ्यांनी प्रशासकांना बाजूला करत एका अधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये थांबविले. मात्र कार्यकर्त्यांनी प्रशासकांचे वाहन रोखून धरल्याने प्रशासकांना मिटींगसाठी बाहेर पडता येत नव्हते. यामुळे प्रशासक के. मंजूलक्ष्मी अर्धा तास एका अधिकाऱ्यांच्या दालनात थांबून होत्या.
अतिरिक्त बंदोबस्त
यानंतर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बोलविण्यात आला. पोलीस लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह कुमक महापालिका चौकात दाखल झाली. यानंतर पोलीस अधीकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत अग्नीशमन दलाच्या जवानांनी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. प्रशासक के. मंजूलक्ष्मी वाहनात बसत असताना कार्यकर्ते आक्रमक होवून वाहनाच्या आडवे पडून वाहन रोखून धरले.
अग्नीशमन दलाच्या गेटमधून बाहेर
महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांना बाहेर जाण्यासाठी अग्नीशमन दलाच्या गेटचा वापर करण्यात आला. पोलीस आणि अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा सुरक्षा कडे करुन प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांना अग्नीशमन दलाच्या गेटमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पुन्हा कार्यकर्ते आक्रमक होवून घोषणाबाजी करु लागले. तसेच पुन्हा प्रशासकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदोबस्तामध्ये प्रशासक मंजूलक्ष्मी यांना पोलीस वाहनात बसविण्यात आले. यानंतर काही कार्यकर्ते मुख्य रस्त्यावर येवून त्यांनी पोलीस वाहनही रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी या कार्यकर्त्यांना उचलून बाजूला केले. यानंतर प्रशासक मार्गस्थ झाल्या. दरम्यानच्या मुदतीत महापालीका प्रशासकांच्या वाहनासमोर अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता यांचीही वाहने कार्यकर्त्यांनी रोखून धरली. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांच्याबरोबर झालेल्या समाधानकारक चर्चेनंतर वाहन सोडण्यात आली.
कमांडो फ्रेंड्स सर्कल मंडळावर गुन्हा
या प्रकरणी मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद अतिक्रमण विभागाचे लिपिक सजन महाजन नागलोत (वय 33) यांनी दिली. यानुसार कमांडो फ्रेंड्स सर्कलचे अध्यक्ष अशोक भोसले यांच्यावर विनापरवाना मंडप उभारल्याप्रकरणी तसेच शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण करणे या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.