राजकीय पक्षांकडून प्रचाराच्या हालचालींना वेग! निवडणुका जाहीर होताच विजयासाठी रणनीती आखण्यावर भर
निवडणुका जाहीर होताच विजयासाठी रणनीती आखण्यात मग्न
प्रतिनिधी/ बेंगळूर
केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची तारीख निश्चित करताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजकीय पक्ष विजयासाठी रणनीती आखण्यात मग्न झाले आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी काय केले पाहिजे, कोणती आश्वासने द्यावीत, प्रचार कसा असावा याबाबत भाजप, काँग्रेस आणि निजद या तिन्ही राजकीय पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांची मालिका सुरू झाली आहे.
राज्यातील लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुका 26 एप्रिल आणि 7 मे रोजी दोन टप्प्यात होणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवार निवडीसह राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे राज्यात लोकसभा निवडणुकीला रंग चढला आहे. या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-काँग्रेस पक्षांनी यापूर्वीच अनेक मतदारसंघांसाठी उमेदवारांची निवड केली असून उर्वरित मतदारसंघांसाठी उमेदवार निवडीची कसरत सुरू झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसात भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष सर्व मतदारसंघातील उमेदवार निश्चित करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपसोबत युती केलेल्या निजदला भाजपने मंड्या, हासन आणि कोलार हे मतदारसंघ दिले आहेत. माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी शनिवारी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेऊन निवडणूक रणनीतीवर चर्चा केली. 25 मार्चनंतर निजद आपले उमेदवार जाहीर करेल, असे कुमारस्वामींनी सांगितले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने यापूर्वीच दहा गॅरंटी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तर भाजपनेही आपला स्वत:चा जाहीरनामा तयार करण्यावर भर दिला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी लोकप्रिय कार्यक्रम राबविण्याच्या आश्वासनांसह भाजप स्वत:चा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या तयारीत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिमोग्यात
लोकसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांनी जोरात प्रचार करण्याचा निर्णय घेतला असून प्रत्येक मतदारसंघात जाहीर सभा आणि मेळावे आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. शनिवारी पंतप्रधान मोदी यांनी कलबुर्गी येथून राज्यात भाजपच्या प्रचाराला सुऊवात केली असून काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदी आज शिमोगा येथील जाहीर सभेलाही उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसनेही गॅरंटी मेळावे आयोजित करून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे.
पक्षातील प्रमुख नेत्यांकडून प्रचार
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-भाजप दोन्ही पक्षांनी जोरदार प्रचारसाठी अनेक कार्यक्रम आयोजित करण्याचा पुढाकार घेतला आहे. भाजपच्यावतीने पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा यांच्यासह अनेक केंद्रीय नेते येणार आहेत. काँग्रेसनेही आपल्या केंद्रीय नेत्यांना राज्यात प्रचारासाठी पाचारण करण्याचा निर्णय घेतला असून राहुल गांधी, प्रियांका वधेरा-गांधी यांच्यासह अनेक केंद्रीय नेते काँग्रेसच्यावतीने राज्यात प्रचार करणार आहेत. निजदनेही आपले उमेदवार असलेल्या मतदारसंघात आपापल्या पद्धतीने प्रचाराची तयारी केली आहे. निजदचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी पंतप्रधान देवेगौडा निजद उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.